वेध - ...आणि ग्रंथोपजीविये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:15 AM2017-08-10T00:15:03+5:302017-08-10T00:15:13+5:30
ग्रंथालय चळवळीचे पितामह असलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने १२ आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा होेतो. त्यानिमित्ताने ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल या त्रिमूर्तींचा विचार एकत्रित होणे गरजेचे आहे.
- विजय बाविस्कर
ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था आहे. समाजाच्या हितासाठी तिचे संवर्धन करणे आवश्यक असते. स्वाभाविकपणेच तिचे जतन करणारा ग्रंथपालही त्यामुळे महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणात वाचकांच्या गरजा वाढत अथवा बदलत जातात. निरनिराळे शोध लागतात आणि साधने उपलब्ध होतात, त्या प्रमाणात ग्रंथपालनाच्या कक्षा वाढत जायला हव्या. मानवाच्या भावभावना, कल्पना, विचार, अनुभव व ज्ञान अक्षरबद्ध करून, ज्यात ग्रंथित केलेले असतात त्याला स्थूलमानाने ग्रंथ संबोधिले जाते. एक काळ असा होता की, ग्रंथालये आणि ग्रंथपाल यांच्या कार्याची पुरेशी कल्पना समाजमाध्यमास नव्हती. आजही या परिस्थितीत फारसा फरक पडला आहे असे नाही. ग्रंथ संग्रहाचे स्थान असलेले ग्रंथालय ही मानवी संस्कृतीशी समांतर अशी संस्था ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या तीन प्रमुख घटकांवर आधारित असते. वाचनसंस्कृती रुजविण्यात ग्रंथ व ते वाचकांपर्यंत पोहोचविणारा ग्रंथपाल हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत. ग्रंथ, वाचक व ग्रंथपाल या त्रिमूर्तींचे एकत्रीकरण म्हणजे खरे ग्रंथालय! भारतात पहिले सार्वजनिक ग्रंथालय १८३५ मध्ये कलकत्ता येथे स्थापन झाले.
जीवनाच्या विविध क्षेत्रात ज्याप्रमाणे यांत्रिकीकरणाचा परिणाम होतोे, त्याप्रमाणे आजमितीला ग्रंथपालन क्षेत्रातही ई-बुक, ई- नियतकालिकांचा वापर सुरू झाला. आजच्या ग्रंथालयात ग्रंथांव्यतिरिक्त हरएक प्रकारची ज्ञानसाधने संग्रहित करावी लागतात; परंतु ग्रंथ, नियतकालिके, पुस्तिका, नकाशे व इतर साहित्याची वाढ इतक्या प्रमाणात होत आहे की, ते कसे जतन करावयाचे व त्याची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करावयाची, हे प्रश्न दिवसेंदिवस ग्र्रंथालयांना भेडसावू लागले आहेत. ग्रंथालय व ग्रंथ हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानलेले व आपले जीवनच ग्रंथमय करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे एस. आर. रंगनाथन. ग्रंथालयांच्याही अभ्यासाची गरज आहे, हे त्यांनी प्रथम जाणले व त्यानंतरचे आयुष्य ग्रंथालयशास्त्रातील नवनवीन प्रयोगात व भारतात ग्रंथालय चळवळ उभी करण्यात व्यतीत केले. भारतात आणि आपल्या महाराष्ट्रातही ग्रंथालयांची परंपरा मोठी आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांची परिस्थिती चांगली असली, तरी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालयांची अवस्था बिकट आहे. ६० ते ६५ टक्के शाळांमध्ये ग्रंथालये व ग्रंथपालच नाहीत. जिथे आहेत तिथे निम्म्याहून अधिक अर्धवेळ नियुक्त केलेले आहेत. ग्रंथ खरेदीसाठी अनुदान मिळत नाही. आहेत त्या पुस्तकांचे जतन करायला पुरेसा निधी नाही. अशात बालवयातच वाचनाची गोडी लावली गेली नाही, तर वाचनसंस्कृतीचा प्रसार होणार तरी कसा? शालेय स्तरावर शाळा तेथे ग्रंथालय व ग्रंथालय तेथे ग्रंथपाल, अशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात देशातील पहिले पुस्तकांचे गाव झाले; पण तेथेही ग्रंथपाल नियुक्त केलेला नाही. दर वर्षी केवळ मराठीतच दोन हजारहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतात. दिवाळी अंकांची वेगळी परंपरा आहे. ५०० हून अधिक नियतकालिके प्रकाशित होतात; पण या सर्वांचे जतन करणारा व ती वाचक अभ्यासकांपर्यंत पोहोचविणारा ग्रंथपाल मात्र अद्यापही दुर्लक्षित आहे. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक व प्रत्येक वाचकाला हवा तो ग्रंथ उपलब्ध झाला पाहिजे. या विचारांची पूर्तता करण्यासाठी ग्रंथालये व ग्रंथपालांनी आजच्या काळात वाचकांना पुन्हा मोठ्या प्रमाणात ग्रंथांकडे वळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या समाजाचा प्रवास ‘वाचाल तर वाचाल’ या मूलभूत मानसिकतेपासून ‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ या प्रगत जाणिवेपर्यंत होतो, त्या समाजाची सांस्कृतिक समृद्धी वृद्धिंगत होत जाते हे निश्चित; परंतु हे प्रत्यक्षात साकारायचे तर ग्रंथपालासही सक्षम केले पाहिजे. स्वातंत्र्याला ७० वर्षे होऊनही तो मात्र उपेक्षित आहे.
त्यामुळेच ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ साजरा करताना या गोष्टींची दखल घेतली जाणे हे ग्रंथालय चळवळीचे पितामह असलेल्या डॉ. रंगनाथन यांचे कृतिशील स्मरण ठरणार आहे.