वेध - दुष्काळाचे पुन्हा आव्हान उभे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:05 AM2017-08-11T00:05:11+5:302017-08-11T00:05:39+5:30
- वसंत भोसले
सह्याद्री पर्वतरांगांना लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. परिणामी खरीप हंगामावर गंभीर परिणाम होत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात कायम पाणीटंचाई भासत असते. या दहा तालुक्यांत सरासरी ५० टक्केही खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. आता पाऊस झाला तरी फेरपेरण्या होऊ शकत नाहीत. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या पूर्व भागात खरिपाचा हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम भागात बागायती क्षेत्र आहे. याच परिसरात २० धरणे आहेत. या धरणांच्या पाण्यावर येथील ऊ स, भात, आदी पिके येतात. या पट्ट्यातही पावसाचे सरासरी प्रमाण कमी आहे. खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी पिकांची वाढ चांगली नाही. उसाला आवश्यक असणारा मान्सून पाऊस न झाल्याने वाढ कमी आहे. त्याचा परिणाम येणाºया गळीत हंगामात उसाच्या उताºयावर होणार आहे. उन्हाळी पाऊ स आणि मान्सूनचा पाऊस वेळेवर झाला नाही तर उसाची वाढ होत नाही. नद्यांवर धरणे आहेत आणि पाण्याची उपलब्धता होत असली तरी उसाची वाढ कमी होऊन उतारा कमी येतो. शिवाय मान्सूनचा पाऊस न झाल्यास हुमणीचा प्रादुर्भाव होतो. ज्याला आता ऊसकरी तोंड देत आहे.
दरम्यान, गेल्या दीड महिन्याच्या मान्सूनच्या हंगामात केवळ आठ ते दहा दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातील २० धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. ही एवढीच चालू हंगामातील जमेची बाजू आहे. या पावसामुळे धरणे जवळपास ९० टक्के भरली आहेत. सर्वांत मोठे धरण असलेल्या कोयनेतून ३० जुलै रोजीच पाणी सोडण्यात आले. कोयना धरणातून जुलैमध्येच पाणी सोडण्याची वेळ फार कमी वेळा येते. याचे कारण १०८ टीएमसीचे हे धरण भरण्यास किमान आॅगस्टचा शेवटचा आठवडा उजाडावा लागतो. मात्र, जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून झालेल्या दहा दिवसांतील पावसाने कोयना धरणात सुमारे ३० टीएमसी पाणीसाठा वाढला होता. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पुरेसा किंवा अपेक्षित पाऊस नसताना पाणलोट क्षेत्रात मात्र पचंड अतिवृष्टी होत होती. कोयनेप्रमाणेच चांदोली, उरमोडी, धोम, राधानगरी, दूधगंगा या छोट्या धरणांची पाणी पातळी ही या दहा दिवसांत भराभरा वाढत राहिली. पण, ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत.
राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणातून पाण्याचा अद्याप नैसर्गिक विसर्ग झालेला नाही. या धरणाची पाणी साठवण क्षमता ८.३६ टीएमसी आहे. त्याच्या वीजनिर्मितीगृहातून थोडे पाणी जाते आहे. पण, धरणातील साठा अद्याप ८.१३ टीएमसी आहे. पूर्ण क्षमतेने धरण भरल्यावर स्वयंचलित सात दरवाजे उघडतात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. दरवर्षी जुलैच्या तिसºया किंवा चौथ्या आठवड्यात हे दरवाजे आपोआप उघडले जातात. पाण्याचा क्षमतेइतका विसर्ग झाल्यावर बंद होतात. मान्सूनच्या हंगामात सातत्य राहिले तरी किमान तीन ते चारवेळा तरी हे दरवाजे उघडतात. यावर्षी आश्चर्य म्हणजे आॅगस्टचा दुसरा आठवडा चालू असतानाही एकदाही दरवाजे उघडलेले नाहीत. पावसाचे हे प्रमाण राहिले तर राधानगरी धरणाच्या इतिहासात चालू वर्षी स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार नाहीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मान्सूनचा एक महिन्याचा पाऊ स अद्याप अपेक्षित आहे, त्यावर पेरण्या होणार नाहीत; पण उभ्या पिकांना वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागातील खरीप हंगाम वाया गेला आहे. मान्सूनच्या परतीचा पाऊस झाला तर यात दुष्काळी पट्ट्यातील रब्बीचा हंगाम साधेल, अन्यथा पुन्हा यावर्षीही टंचाई किंवा दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.