वेध - बारामतीची साखर खाल्लेला पाऊस ! बिनभरवशाचा पाहुणा. पाऊसही हल्ली राजकीय झालाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:13 AM2017-08-21T00:13:41+5:302017-08-21T00:16:03+5:30
हल्ली माणसांचा अंदाज लागत नाही, तिथे पावसाचा तरी कसा लागेल? तो तर बिनभरवशाचा पाहुणा. पाऊसही हल्ली राजकीय झालाय...कुणी म्हणतं, तो बारामतीवर गेलाय!
- नंदकिशोर पाटील
बरं झालं हवामान खात्यानं वर्तविलेलं भाकीत खरं ठरलं आणि दिलेल्या तारखेला वरुणराजाचं आगमन होऊन अवघा महाराष्टÑ चिंब झाल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. या खात्याचा अंदाज चुकला असता तर आरोपीचा पिंजरा लोकांनी तयारच ठेवलेला होता. भारतीय हवामान खाते हल्ली टिंगलचा विषय बनले आहे. अजाणतेपणातून होणारी टीका एकवेळ समजून घेता येईल, पण जाणती माणसंही जेव्हा तोच सूर आळवतात, तेव्हा भारतीय हवामान शास्त्रज्ञांच्या सर्व मेहनतीवर आणि त्यांनी प्राप्त केलेल्या प्राविण्यावर पाणी फेरले जाते.
भारतीय हवामानशास्त्र हे जगात सर्वात प्राचीन आणि तितकेच अद्ययावत आहे, यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही. पण जगातील प्रागतिक अशा हवामानशास्त्राचा मूळ पायाच भारताने रचला आहे. महान गणिती आणि आद्य खगोलतज्ज्ञ वराहमिहीर लिखित ‘बृहद्संहिता’, कौटिल्यप्रणित अर्थशास्त्रीय मीमांसा आणि सातव्या शतकातील कालिदासाच्या ‘मेघदूत’मध्ये हवामानाचा अचूक वेध घेतला गेला आहे. गेली कित्येक वर्षे मुहूर्तासाठी अनेकजण जे ‘पंचांग’ पाहतात, तिथेही याच शास्त्राच्याआधारे पाऊस आणि दुष्काळासंबंधी अनुमान असते. पुराणातील वांगी म्हणून आपण या गोष्टी सोडून देऊ. पण आधुनिक हवामान शास्त्राचा पाया भारतात कसा रचला गेला ते पाहू...
ऊन, वारा, पाऊस, समुद्रीलाटा, वादळ आणि आकाशगंगेतील बदलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास सतराव्या शतकात सुरू झाला आणि थर्मामीटर, बारोमीटरचा शोध लागला. पण तरीही हवेचा दाब, वाºयाचा वेग आणि सामुद्रिक हालचालींचा हवामानावर होणाºया परिणामांचा अचूक वेध घेता आला नाही. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता (१७८५) येथे पहिले आणि १७९६ साली मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथे दुसरे हवामान अभ्यास केंद्र स्थापन करून आधुनिक हवामान शास्त्राची मुहूर्तमेढ रोवली. पुढे एशियाटिक सोसायटी आॅफ बेंगालची स्थापना करून हवामानाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली. ‘एशियाटिक’च्या जर्नलमध्ये कॅप्टन हॅरी पिड्डिंगटन यांनी लिहिलेल्या लेखात पहिल्यांदा ‘सायक्लॉन’चे भाकीत वर्तविण्यात आले. १८७५ साली ब्रिटिशांनी भारतीय हवामान खात्याची स्थापना करून त्रिस्तरीय वेधशाळेचे नेटवर्क उभे केले. हवामानासाठी स्वतंत्र उपगृह (इन्सॅट) सोडणारा भारत हा पहिला देश होता.
अवकाळी पावसामुळे आपल्याकडच्या क्रिकेट सामन्यांत भलेही व्यत्यय येत असला, तरी जागतिक पातळीवर भारतीय हवामान खात्याचा आजही तितकाच लौकिक आहे. जहाजांवरचे कॅप्टन आणि वैमानिकांसाठी भारतीय हवामान खाते नेहमीच विश्वासार्ह राहिलेले आहे. चुकीच्या अंदाजामुळे अमेरिका, फ्रान्ससारखी हवाई दुर्घटना आपल्याकडे अजून तरी घडलेली नाही.
आपल्याकडचं हवामान खातं, वेधशाळा तितक्याच प्रगत, अत्याधुनिक असतील तर मग पावसाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? मुळात भारतीय उपखंडातील हवामान आणि अरबी समुद्र हे लहरी म्हणून ओळखले जातात. हवामानासंबंधीची शास्त्रीय अनुमानं अनेकदा अचूक असतात, फक्त मोजमापाच्या टक्केवारीत गफलत होते. हे घडते कारण, आपल्याकडची राजकीय व्यवस्था. देशात एखादा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर गुप्तचर खात्याची जशी मापं काढली जातात. ते बालंट अंगावर येऊ नये, अशी वृत्ती अनेक खात्यात बळावत आहे. आजवर कधीही फेब्रुवारी महिन्यात हवामानाचे भाकीत वर्तविले गेले नव्हते. पण यावर्षी ते वर्तविण्यास केंद्र सरकारने भाग पाडले. कारण पाच राज्यांच्या निवडणुका समोर होत्या. चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकीत वर्तवून शेअर बाजाराचा निर्देशांक उसळवला की, सगळीकडे आनंदी वातावरण तयार होऊन त्यावर राजकीय पोळी भाजता येते. हवामान खात्यातील ही ग्यानबाची मेख माहिती असलेले आणि ज्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पचविले ते देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार या खात्याला उगीच बारामतीची साखर खाऊ घालायला निघालेले नाहीत!