प्लास्टिकबंदी: आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!

By रवी टाले | Published: June 27, 2018 01:42 PM2018-06-27T13:42:11+5:302018-06-27T13:48:32+5:30

अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल.

plastic ban: not a proper solution | प्लास्टिकबंदी: आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!

प्लास्टिकबंदी: आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!

ठळक मुद्देआज प्लास्टिकच्या विरोधात जी ओरड होत आहे, त्यामागे प्लास्टिकचे विघटनशील नसणे प्रामुख्याने कारणीभूत आहे.चीन, तैवानसारख्या देशांनी प्लास्टिक बॅगच्या वापरासाठी जबर दंड आकारणे सुरू केले आहे. प्लास्टिकच्या वापरावर बंदीची मागणी करताना एका महत्त्वाच्या मुद्याकडे मात्र जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्ष होत आहे.

 - रवी टाले 
अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल. या निमित्ताने प्रसारमाध्यमांना एक नवा विषय चघळायला मिळाला आहे, तर समाजमाध्यमांवर प्लास्टिकबंदीवरील विनोदांचा अक्षरश: पूर आला आहे; परंतु प्लास्टिकमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर बंदी हाच एकमेव उपाय होता का, या अंगाने कुठेही चर्चा होताना दिसत नाही.
कोणतेही नवे तंत्रज्ञान, पदार्थ किंवा वस्तु लोकप्रिय होते ती उपयुक्ततेमुळे! एखादे तंत्रज्ञान, पदार्थ किंवा वस्तु कितीही चांगली असली आणि उपयुक्त नसली तर ती लोकप्रिय होणे शक्यच नसते. गत अनेक दशकांपासून प्लास्टिक जगभर प्रचंड लोकप्रिय आहे, ते त्याच्या उपयुक्ततेच्या जोरावरच! एवढ्या वर्षात उपयुक्तता, सुटसुटीतपणा, टिकाऊपणा, किंमत यांसारख्या निकषांवर प्लास्टिकला पर्याय ठरू शकणाऱ्या पदार्थाचा शोध न लागल्यामुळेच प्लास्टिकचे वर्चस्व एवढ्या वर्षांनंतरही टिकून आहे. उद्या या निकषांवर प्लास्टिकपेक्षा सरस असलेल्या पदार्थाचा शोध लागल्यास प्लास्टिकची सद्दी संपायला अजिबात वेळ लागणार नाही.
आज प्लास्टिकच्या विरोधात जी ओरड होत आहे, त्यामागे प्लास्टिकचे विघटनशील नसणे प्रामुख्याने कारणीभूत आहे. प्लास्टिक विघटनशील नसल्याने ते शेकडो वर्षे नष्ट होऊ शकत नाही आणि परिणामी ते जमीन, तसेच जलस्रोत दूषित करीत आहे. त्याशिवाय प्लास्टिक जाळल्यास निर्माण होणारे वायू वातावरणदेखील प्रदूषित करतात. या कारणांमुळे प्लास्टिकवर सर्वंकष बंदी आणण्याची मागणी जगभरातील पर्यावरणवादी सातत्याने करीत आहेत. चीन, तैवानसारख्या देशांनी प्लास्टिक बॅगच्या वापरासाठी जबर दंड आकारणे सुरू केले आहे. आपल्या महाराष्ट्रानेदेखील तीच री ओढली आहे. प्लास्टिकचा वापर थांबविणे हाच जबर दंड आकारण्यामागील हेतू आहे.
प्लास्टिकच्या वापरावर बंदीची मागणी करताना एका महत्त्वाच्या मुद्याकडे मात्र जाणते-अजाणतेपणाने दुर्लक्ष होत आहे. आक्षेप प्लास्टिकच्या अस्तित्वावर नव्हे, तर ज्या प्रकारे प्लास्टिकचा वापर होतो आणि त्याची विल्हेवाट लावली जाते त्यावर असायला हवा! प्लास्टिक इतस्तत: फेकले जाते आणि त्यामुळे ते जमिनीत किंवा जलसाठ्यांमध्ये पोहोचून प्रदूषण निर्माण करते. पशु-पक्ष्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण करते. जर प्लास्टिकची नीट विल्हेवाट लावली, तर ना प्लास्टिक जमिनीत वा जलसाठ्यांमध्ये पोहोचेल, ना पशु-पक्ष्यांच्या पोटात जाईल! मग कोणतीही समस्याच उद्भवणार नाही. त्यामुळे प्लास्टिकवर बंदी घालणे, प्लास्टिकच्या वापरासाठी जबर दंड आकारणे, हा ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ असाच प्रकार म्हणायला हवा!
आज प्लास्टिकने मानवी जीवनात स्वत:साठी असे स्थान निर्माण केले आहे, की प्लास्टिकवर संपूर्ण बंदी लादण्याचा विचारदेखील मनात आणणे शक्य नाही. प्लास्टिकचा एवढ्या ठिकाणी आणि एवढ्या विविध स्वरूपात वापर होतो, की प्लास्टिकविना जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच पर्यावरणवाद्यांचा मुख्य आक्षेप कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर असतो. पर्यावरणाच्या दृष्टीने या पिशव्या खरोखरच डोकेदुखी आहेत. ही वस्तुस्थिती कुणीही अमान्य करू शकणार नाही; पण दोषी कोण आहे? प्लास्टिक पिशव्या, की त्यांचा वापर करून त्या इतस्तत: फेकून देणारे? मुळात अत्यंत पातळ प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादनच केले नाही, जाड पिशव्यांचा पुनर्वापर केला, त्या जीर्ण झाल्यावर इतस्तत: फेकून न देता त्यांची योग्यरीत्या विल्हेवाट लावली आणि अखेर त्यापासून नव्याने प्लास्टिकचे उत्पादन केले (रिसायकलिंग) तर प्रदूषणाची, पर्यावरणास धोका निर्माण होण्याची समस्याच शिल्लक उरणार नाही.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी लादण्याची मागणी करणारे लोक पर्याय म्हणून कागदी पिशव्यांचा वापर करण्याची सूचना करतात. प्रथमदर्शनी ही सूचना अगदी योग्य वाटते; पण खोलात जाऊन विचार केल्यास, तो पर्याय प्लास्टिक पिशव्यांपेक्षाही घातक असल्याचे नजरेस येते. मुळात कागद हा प्लास्टिकच्या तुलनेत जास्त गतीने विघटन पावतो, हाच एक मोठा गैरसमज आहे. कागदाच्या संपूर्ण विघटनासाठी जवळपास प्लास्टिकएवढाच वेळ लागतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पर्यावरण संरक्षण संस्थेच्या अहवालानुसार, कागदी पिशव्या प्लास्टिक पिशव्यांच्या तुलनेत ७० टक्के जादा वायू प्रदूषण आणि ५० टक्के जादा जल प्रदूषण निर्माण करतात; कारण त्यांच्या उत्पादनासाठी आणि पुनर्वापरासाठी प्लास्टिक पिशव्यांच्या तुलनेत किती तरी जास्त ऊर्जा खर्च होते.
प्रत्येक तंत्रज्ञान, पदार्थ वा वस्तुचे काही गुणदोष असतात. त्या गुणदोषांसहच ते स्वीकारावे लागतात. दोषविरहित तंत्रज्ञान, पदार्थ अथवा वस्तु कधीच तयार होऊ शकणार नाही. मोटारींना, विमानांना अपघात होतात म्हणून त्यावर बंदी घालणे हा इलाज होऊ शकत नाही, तर त्यांचे नीट व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. प्लास्टिककडेही त्याच दृष्टिकोनातून बघायला हवे. प्लास्टिक पिशव्यांच्या अनिर्बंध वापराचे नियमन करणे आवश्यक आहेच; पण त्यावर सरसकट बंदी लादणे, हा योग्य पर्याय म्हणता येणार नाही. सरसकट बंदीचा अर्थ प्लास्टिक पिशव्यांची व्यावहारिक उपयुक्तता, टिकाऊपणा, व्यवहार्यता नाकारणे असा होईल, जे सर्वथा चुकीचे आहे. प्लास्टिकला विरोध करणारे पर्यावरणवादीही ते धाडस करू शकणार नाहीत. पर्यावरणाची हानी प्लास्टिकचा वापर करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे होत आहे, प्लास्टिकमुळे नाही. गरज प्लास्टिकवर बंदी आणण्याची नव्हे, तर त्याचा योग्यरीत्या वापर करण्याची आहे, आमची मानसिकता आणि सवयी बदलण्याची आहे. दुर्दैवाने आपल्या देशात ‘सिव्हिक सेन्स’चा प्रचंड अभाव आहे आणि तीच खरी समस्या आहे! थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन एकदा म्हणाले होते, ‘‘दोनच गोष्टी अनंत, अमर्याद आहेत. पहिली ब्रह्मांड व दुसरी मानवी मूर्खपणा आणि पहिलीबद्दल मी साशंक आहे!’’ प्लास्टिकसंदर्भात आईनस्टाईन यांचे हे विधान अगदी चपखल लागू पडते.

ravi.tale@lokmat.com








 

Web Title: plastic ban: not a proper solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.