प्लॅस्टिकची सर्जरी! भस्मासुर मेलाच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 03:43 AM2018-04-15T03:43:09+5:302018-04-15T03:43:09+5:30
२६ जुलै रोजी मुंबई पाण्यात बुडली होती. आम्ही त्यात मरता-मरता वाचलो. हेच दर वर्षी मुंबईत, भारतात सर्वत्र होते. कारण? नदी-नाले प्लॅस्टिकने तुंबतात. आपण बुडतो, मरतो. हे टाळायला प्लॅस्टिकवर बंदीच हवी.
- डॉ. हेमंत जोशी
२६ जुलै रोजी मुंबई पाण्यात बुडली होती. आम्ही त्यात मरता-मरता वाचलो. हेच दर वर्षी मुंबईत, भारतात सर्वत्र होते. कारण? नदी-नाले प्लॅस्टिकने तुंबतात. आपण बुडतो, मरतो. हे टाळायला प्लॅस्टिकवर बंदीच हवी. २००२ साली दोन तृतीयांश बांगलादेश पाण्याखाली बुडाला. त्याचे कारण नदी-नाले प्लॅस्टिकने तुंबले होते. त्यांनी प्लॅस्टिकवर बंदी घातली. यातून आपण शिकले पाहिजे.
१३० कोटी लोकांनी प्लॅस्टिक, घाण सगळीकडे टाकून खराब केलेला देश स्वच्छ कसा राहील? हा प्रश्न आहे. १३० कोटी लोकांनी सतत स्वच्छ ठेवलेला देश घाण कसा होईल? याचा विचार होणे गरजेचे आहे. आपण यासाठी बरेच काही करू शकतो? प्लॅस्टिक शक्यतो टाळू. सोबत एक कापडाची पिशवी नेहमी ठेवू. प्लॅस्टिकने कर्करोग म्हणजे कॅन्सर होतो, हे सर्वांना सांगू. जमेल तेवढा प्लॅस्टिकचा वापर कमी करू. सर्वच कचरा व प्लॅस्टिक कचरा कचरापेटीत टाकू. जमेल तेव्हा नष्ट होणारे प्लॅस्टिक वापरू, हे सर्वांना सांगू. प्लॅस्टिक पिशवीने नाक बंद झाल्यास मूल गुदमरते, मरू शकते. प्लॅस्टिकने जगच गुदमरते. प्लॅस्टिक पाचशे वर्षे जसे आहे तसे राहते. प्लॅस्टिकचा तुकडा जेथे जमिनीवर जेथे पडतो, तेथे गवत उगवत नाही. झाड उगवत नाही. तेथे अति लहान, नॅनो वाळवंट तयार होते. झाड आपल्याला अन्न व शुद्ध हवा देते. झाड नाही, तर आपण नाही. प्लॅस्टिकने आपण मरणार, हे आज होत आहे. आजच प्रदूषणामुळे तीस टक्के महासागरातील जीवन संपुष्टात आले आहे. त्यात प्लॅस्टिकचा सहभाग आहेच. या गतीने पृथ्वी व आपण नष्ट होऊ. आपण पुढच्या पिढीला जास्त चांगली पृथ्वी देऊ या.
सरकार लोकहितासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, अभ्यास करून, प्लॅस्टिकवर बंदी घालते. काही लोक त्यांना त्रास होतो, म्हणून कोर्टात जातात. हितोपदेश वा पंचतंत्रमध्ये एक श्लोक आहे. तो सांगतो, आपण घरासाठी, घराने गावासाठी, समूहासाठी व समूहाने देशासाठी त्याग करायला पाहिजे. प्लॅस्टिक बंदीमुळे सर्व लोकांना थोडा व काही लोकांना खूप जास्त त्रास होईल. देश व जग वाचवायचे असेल, तर आपण हा त्रास सहन करायला पाहिजे. हे माहिती नसल्यामुळे लोक कोर्टामध्ये जातात. त्यांना थांबवू या. जगायला अन्न जरूरी आहे, पण मोठ्यांनी नेहमी अर्धपोटीच राहायला हवे. जे पोटभर खातात, त्यांचे रोज नकळत वजन वाढते. रक्तातली साखर वाढते. मधुमेह होतो. उच्च रक्तदाब होतो. आपण तरुण मरतो. असेच प्लॅस्टिकचे आहे.
प्लॅस्टिक उपयोगी आहे, पण प्लॅस्टिकचा भस्मासुर आपल्याला नष्ट करेल. आपणच त्याला मारला पाहिजे. आफ्रिकेतील केनिया व रवांडाचा धडा घ्या. रवांडा हा केनियाजवळचा आफ्रिकेतला छोटा देश. या देशाने २००८ मध्ये प्लॅस्टिकवर बंदी घातली. त्याला काही लोकांनी विरोध केला. रवांडाच्या नेत्यांनी लोकांना शिकविले. आज त्यांच्या देशातील सर्व शहरे स्वच्छ आहेत. भारतातील सर्व घाण पाहिल्यावर ते जास्तच जाणवते. पूर्वी त्यांची नाले-नद्या प्लॅस्टिकने तुंबत. ते आता होत नाही. रवांडामध्ये दर वर्षी एक दिवस सर्व लोक इतर सर्व काम सोडून फक्त स्वच्छतेचे काम करतात. त्यात सर्व नेते सहभागी होतात, असे आपण करू या. केनिया, अमेरिका, आॅस्ट्रेलिया (काही प्रांत), मेक्सिको यांनी प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. खप कमी व्हावा, यासाठी डेन्मार्क, इटली, आयर्लंड, इंग्लड, फ्रान्स, बेल्जियम यांनी प्लॅस्टिक वर ज्यादा कर/शुल्क लावले आहेत आणि आता आपण हे करण्याची गरज आहे.