पुतना मावशीचा पान्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:17 PM2018-02-07T19:17:04+5:302018-02-07T19:18:31+5:30
गेली तीन-साडेतीन वर्षे या सरकारच्या कृती आणि धोरणावर पवारांनी ब्रदेखील उच्चारला नाही. उलट नरेंद्र मोदींना बारामतीला घेऊन गेले. सेना सत्तेतून बाहेर पडली, तर राष्ट्रवादीचे समर्थन सरकारला मिळेल इतपत संशयाचे वातावरण तयार केले. हे आठवायचे कारण म्हणजे निवडणुकीचा हंगाम पुढे दिसत असल्याने सगळेच राजकीय नेते तोंडाची वाफ गमावत एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अशाच प्रकारची हल्लाबोल यात्रा काढून जोर-बैठका काढायला सुरुवात केली
आमच्या गावाकडे हिवाळ्यात तरुण पोरं आखाड्यात घुमतात, दम जिरवतात. खुराकपाणी घेतात. पुढे चैत्राच्या महिन्यात गावोगावच्या जत्रांचा हंगाम सुरू होतो. तेथे कुस्तीच्या आखाड्यात लंगोट कसून शड्डू ठोकत आव्हान देतात. कधी समोरच्याला चारीमुंड्या चीत केले जाते, तर कधी प्रतिस्पर्धी नाकातोंडात माती भरवतो, कधी कान रगडून सालटे काढतो.
हे आठवायचे कारण म्हणजे निवडणुकीचा हंगाम पुढे दिसत असल्याने सगळेच राजकीय नेते तोंडाची वाफ गमावत एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही अशाच प्रकारची हल्लाबोल यात्रा काढून जोर-बैठका काढायला सुरुवात केली. शरद पवारांनी औरंगाबादेत समारोपाच्या कार्यक्रमात मोदी-फडणवीस सरकारवर टीका केली. कुप्रशासनाचा पाढा वाचला. गेली तीन-साडेतीन वर्षे या सरकारच्या कृती आणि धोरणावर पवारांनी ब्रदेखील उच्चारला नाही. उलट नरेंद्र मोदींना बारामतीला घेऊन गेले. सेना सत्तेतून बाहेर पडली, तर राष्ट्रवादीचे समर्थन सरकारला मिळेल इतपत संशयाचे वातावरण तयार केले.
खरे तर सरकारी धोरणांमुळे शेतीची जी काही वासलात लागली त्याचा पाया तर याच मंडळींनी रचला होता. बोंडअळी हे काही एकमेव संकट शेतीवर आलेले नाही. शरद जोशींच्या मागे शेतकरी उभा राहतो हे हेरून पवार जोशींसोबत गेले होते; पण शरद जोशींच्या मागण्या काही त्यांनी मान्य केल्या नाहीत. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची ओळख केवळ राजकीय नेता नाही, तर त्याहीपेक्षा ते सर्वांचे मार्गदर्शक शोभतात. कर्जमाफी हा शेतक-यांच्या प्रश्नावर तोडगा नाही, असे म्हणणा-या पवारांनीच कृषिमंत्री असताना सर्वात मोठी कर्जमाफी दिली होती. सरकारने सहकार संपवल्याचा आरोप होतो; पण शेतक-यांकडून हजार, पाचशेचे भागभांडवल गोळा करून साखर कारखाने उभे केले ते पवारांनीच. हे कारखाने बुडाले. अवसायनात निघाले. शेतक-यांचे भागभांडवल बुडाले. कारखान्याचा त्यांना काहीही लाभ झाला नाही.
सहकाराच्या नावाखाली कारखाने उभारून दिवाळखोरीत निघाल्यानंतर ते खरेदी करणारी मंडळीही राष्ट्रवादी काँग्रेसचीच. लागवड खर्चाच्या दीडपट भाव शेतमालाला मिळाला पाहिजे, अशी मागणी आता करतात; पण कृषिमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या काळात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी का केली नाही, या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. खरे तर असे एक ना अनेक प्रश्न असून, त्यांची उत्तरे या जाणत्या राजाकडेच आहेत.
परवा अभिनेता नाना पाटेकर ‘लोकमत’च्या कार्यालयात आला होता. सर्वांशी दिलखुलास गप्पा मारताना गाडी सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे वळली. सगळेच पक्ष एका सुरात जनतेवरील अन्यायाचा मुद्दा काढून सरकारवर टीका करताना दिसतात. यावर नाना म्हणाला, ‘या सगळ्यांना जनतेविषयी फार प्रेम आहे का, तर अजिबात नाही; हा तर पुतना मावशीचा पान्हा आहे.’