भारतीय विद्यापीठांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
By रवी टाले | Published: September 29, 2018 07:53 PM2018-09-29T19:53:46+5:302018-09-29T19:57:49+5:30
जगभरातील विद्यापीठांची ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. अपेक्षेनुरुप यावर्षीही पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनचाच दबदबा आहे. भारताच्या मात्र एकाही विद्यापीठाला पहिल्या २५० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही.
जगभरातील विद्यापीठांची ताजी क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. अपेक्षेनुरुप यावर्षीही पहिल्या दहा क्रमांकांवर अमेरिका आणि ब्रिटनचाच दबदबा आहे. पहिल्या दहात अमेरिकेची सात, तर ब्रिटनची आठ विद्यापीठे आहेत. आशियापुरता विचार करायचा झाल्यास, चीनच्या सिंघ्वा विद्यापीठाने पहिल्या २५ विद्यापीठांच्या यादीत मुसंडी मारली असून, बाविसाव्या क्रमांकानिशी हे विद्यापीठ आशिया खंडातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले आहे. पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये चीनच्या चार विद्यापीठांना स्थान मिळाले आहे. भारताच्या मात्र एकाही विद्यापीठाला पहिल्या २५० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही. बेंगळुरूस्थित इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स (आयआयएससी) हे भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले असले तरी, जागतिक क्रमवारीत मात्र या विद्यापीठाचा क्रमांक २५१ ते ३०० या गटात आहे. भारतातील इतर विद्यापीठांना तर पहिल्या ३०० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता आलेले नाही.
भारतीय शिक्षण प्रणालीच्या दर्जावर नेहमीच टीका होत असते. ताजी जागतिक क्रमवारीही त्यावर शिक्कामोर्तबच करते. तक्षशीला, नालंदासारख्या विद्यापीठांच्या माध्यमातून जगाला विद्यापीठ या संकल्पनेचा परिचय घडविलेल्या भारताच्या एकाही विद्यापीठाला पहिल्या २५० विद्यापीठांमध्येही स्थान मिळविता येऊ नये, ही बाब निश्चितच भुषणास्पद नाही. महान देशांची बांधणी त्या देशांमधील महान विद्यापीठांमध्ये होत असते, असे म्हणतात. हा निकष लावायचा झाल्यास, ‘मेरा भारत महान’ ही घोषणा बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी ठरते!
विद्येविना मती गेली!
मतिविना नीती गेली!
नीतिविना गती गेली!
गतिविना वित्त गेले!
वित्ताविना शुद्र खचले!
इतके अनर्थ एका अविद्येने केले!
महात्मा जोतिबा फुले यांनी उपरोक्त सहा ओळीत अत्यंत समर्पकपणे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले होते. दुर्दैवाने हा महात्मा ज्या देशात जन्मला त्या देशातच आज शिक्षणाचा निव्वळ बाजार झाला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळेच आज आमच्या देशातील एकही विद्यापीठ अथवा संशोधन संस्था जगतील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळवू शकत नाही. सर्वांगीण विकास घडतो तेव्हाच कोणताही देश मजबुतीने उभा राहतो आणि कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षण अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करीत असते. त्यामुळेच आज जगातील सर्वाधिक विकसित देशांमधील विद्यापीठेच जगातील आघाडीच्या विद्यापीठांच्या यादीत अग्रक्रम राखून आहेत. किंबहुना त्या देशांमधील विद्यापीठे जगातील आघाडीची विद्यापीठे आहेत म्हणूनच ते देश जगातील सर्वाधिक विकसित देश आहेत.
दर्जेदार शिक्षणामुळे मनुष्यात त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठीचा सुयोग्य मार्ग निश्चित करण्याची क्षमता निर्माण होते. जेव्हा एखाद्या देशातील बहुसंख्य लोक त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात यशस्वी होतात तेव्हा तो देश आपोआपच प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होतो. दुर्दैवाने काही थोडके अपवाद वगळता, आपल्या देशातील शिक्षण प्रणालीला कीड लागली आहे. गरिबीमुळे बहुसंख्य लोक त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी मजबूर आहेत. शिक्षणाकडे सुविद्य, सुसंस्कारित, सुजाण नागरिक घडविण्याचे माध्यम म्हणून न बघता, केवळ अर्थार्जनासाठी आवश्यक पदव्यांची भेंडोळी मिळविण्याचे साधन म्हणून बघितल्या जात आहे. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचाही व्यापार झाला आहे. पदव्या विकल्या जात आहेत, विकत घेतल्या जात आहेत. आचार्य (पीएच. डी) ही सर्वोच्च पदवी मिळविण्यासाठी मुलभूत संशोधन करण्याऐवजी प्रबंधांची चोरी, नक्कल केली जात आहे. राजकीय नेत्यांनी शिक्षण संस्थांना अर्थार्जनाचे साधन बनवून ठेवले आहे. विद्यापीठ हे केवळ इमारती आणि विस्तीर्ण आवारामुळे उभे राहत नसते, तर त्या विद्यापीठात ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना ज्ञानदान करणारे शिक्षक यांच्या दर्जावरून विद्यापीठाचा दर्जा ठरत असतो. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांमध्येही गुणवत्तेचा, दर्जाचा अभाव असेल, तर जागतिक कीर्तीची विद्यापीठे निर्माण होणे कठीणच असते.
ही परिस्थिती बदलायची असल्यास आपली संपूर्ण शिक्षण प्रणाली खालपासून वरपर्यंत दुरुस्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचे बाजारीकरण बंद करावे लागेल. शिक्षणाकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून न बघता नवी पिढी आणि देश घडविण्याचे पवित्र कार्य म्हणून बघणाऱ्या सोनम वांगचूकसारख्या लोकांचा शोध घेऊन, हे क्षेत्र त्यांच्या हाती सोपवावे लागेल. कालबाह्य झालेली व्यवस्था आणि अभ्यासक्रम बदलावे लागतील. नवी आव्हाने, नव्या संधी, नवी क्षेत्रे डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल घडवावे लागतील. हे काम सोपे नाही. त्यासाठी झोकून देऊन काम करणाºया एक-दोन पिढ्या खपाव्या लागतील. हे करू शकलो तरच आम्ही जागतिक दर्जाची विद्यापीठे उभी करू शकू आणि त्या विद्यापीठांमधून तयार होणारे विद्यार्थी भविष्यातील समर्थ भारत घडवू शकतील.
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com