टीआरपीसाठीच्या घिसाडघाईत विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह!

By रवी ताले | Published: February 28, 2018 02:47 PM2018-02-28T14:47:54+5:302018-02-28T14:51:04+5:30

वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी!

 In the race of TRP question raised on credibility! | टीआरपीसाठीच्या घिसाडघाईत विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह!

टीआरपीसाठीच्या घिसाडघाईत विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह!

ठळक मुद्देशनिवारी उत्तररात्री श्रीदेवीच्या निधनाची धक्कादायक वार्ता येऊन थडकल्यावर, रविवारी सकाळपासूनच वृत्त वाहिन्यांना ‘सबसे तेज’च्या वेडाने झपाटले होते. श्रीदेवी ही अभिनेत्री म्हणून कशी सर्वश्रेष्ठ होती हे दर्शकांच्या मनावर ठसविताना, वृत्त वाहिन्यांनी श्रीदेवीच्या विविध चित्रपटांमधील तिच्या अप्रतिम अभिनयाचे वेगवेगळे पैलू दर्शविणाºया प्रसंगाचा भडीमार केला.पुढे श्रीदेवीचा मृत्यू ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे नव्हे तर बाथरुममधील बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे आणि मृत्यूसमयी तिने मद्याचे सेवन केले असल्याचे निष्पन्न झाले. मग तमाम वृत्त वाहिन्यांवर केवळ ‘चालबाज’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील श्रीदेवीच्या मद्य प्यायलेल्या प्रसंगांशिवाय दुसरे प्रसंगच दिसेनाशे झाले!


भारताबाहेर आम्हा भारतीयांची प्रतिमा सर्वसाधारणत: आळशी, सुस्त, निवांत अशा स्वरुपाची आहे. अशी प्रतिमा मनी बाळगून भारतात आलेल्या एखाद्या विदेशी नागरिकाने, एखाद्या वाहतूक सिग्नलवरील आपले वाहन पुढे दामटण्यासाठी उडणारी धांदल बघितल्यास, भारतीयांएवढे घाईत असलेले, वेळेची किंमत जाणणारे, लोक जगात इतरत्र नाहीतच, अशी त्याची ठाम समजूत होईल. सिग्नल लाल असतानाही आपली दुचाकी वेगात दामटणारा दुचाकीस्वार, चौक पार केल्याबरोबर रस्त्याच्या कडेला असलेल्या पानपट्टीसमोर दुचाकी लावून, अगदी आरामात मावा किंवा खर्रा चघळत गप्पा छाटताना दिसेल, तेव्हा मात्र त्याचा वासलेला जबडा एखादी माशी आत शिरेपर्यंत तरी नक्कीच बंद होणार नाही! वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी! विख्यात अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाच्या निमित्ताने नुकतीच त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या चिरपरिचित घाईची प्रचिती दिली.
शनिवारी उत्तररात्री श्रीदेवीच्या निधनाची धक्कादायक वार्ता येऊन थडकल्यावर, रविवारी सकाळपासूनच वृत्त वाहिन्यांना ‘सबसे तेज’च्या वेडाने झपाटले होते. केवळ आपल्याकडेच कसे एक्स्क्लुसिव्ह कव्हरेज आहे, हे दाखविण्याच्या नादात मग उपलब्ध असलेल्या ‘फुटेज’सोबत वाट्टेल तसे खेळ करण्यात आले. श्रीदेवी ही अभिनेत्री म्हणून कशी सर्वश्रेष्ठ होती हे दर्शकांच्या मनावर ठसविताना, वृत्त वाहिन्यांनी श्रीदेवीच्या विविध चित्रपटांमधील तिच्या अप्रतिम अभिनयाचे वेगवेगळे पैलू दर्शविणाºया प्रसंगाचा भडीमार केला.
प्रारंभी श्रीदेवीचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव झटक्याने (कार्डिअ‍ॅक अरेस्ट) झाल्याचे समोर आले होते. पुढे श्रीदेवीचा मृत्यू ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे नव्हे तर बाथरुममधील बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे आणि मृत्यूसमयी तिने मद्याचे सेवन केले असल्याचे निष्पन्न झाले. मग तमाम वृत्त वाहिन्यांवर केवळ ‘चालबाज’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील श्रीदेवीच्या मद्य प्यायलेल्या प्रसंगांशिवाय दुसरे प्रसंगच दिसेनाशे झाले! तोपर्यंत श्रीदेवीची अत्यंत आदर्श अभिनेत्री अशी प्रतिमा रंगविण्यात आपण मश्गूल होतो आणि आता ती जणू काही अट्टल दारुडी होती, असा संदेश आपण देत असलेल्या बातम्या व पाशर््वभूमीवर चालत असलेल्या दृश्यांमुळे जात आहे, याचेही भान मग वृत्त वाहिन्यांना उरले नाही. एका वृत्त वाहिनीने तर हद्दच पार केली. फोटोशॉप करामतीचा वापर करून श्रीदेवीचे छायाचित्र चक्क बाथटबमध्ये पेस्ट केले. अन्य एका वृत्त वाहिनीने तशीच करामत करून, श्रीदेवी बाथटबमध्ये मृतावस्थेत तरंगत असल्याचे आणि तिचा पती बोनी कपूर शेजारी उभा असल्याचे दाखविले. टीआरपीसाठी वृत्त वाहिन्या कुठल्या स्तराला जाऊ शकतात, याचे हे आणखी एक उदाहरण या निमित्ताने समोर आले.
वस्तुत:, श्रीदेवीच्या मृत्यूसंदर्भात जी माहिती समोर आली त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. श्रीदेवी विवाह समारंभ आटोपल्यावरही दुबईत का थांबली, बोनी कपूर भारतात का परतले, नंतर पुन्हा दुबईला का गेले, त्यांनीच हॉटेलच्या कर्मचाºयांच्या मदतीने बाथरुमचा दरवाजा तोडला आणि श्रीदेवी बाथटबमध्ये बुडून मृत्युमुखी पडल्याचे बघितले तर मग तब्बल २४ तास ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे मृत्यू झाल्याची चर्चा कशी झाली, प्रारंभीच मृत्यू बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याची माहिती का समोर आली नाही, श्रीदेवीच्या शरिरात आढळलेल्या मद्याची मात्रा नेमकी किती होती, हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळले, श्रीदेवी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास डिनरला जाण्यासाठी तयार होण्यासाठी म्हणून बाथरुममध्ये गेली तर ती मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांना ९ वाजता का कळविण्यात आले, जर श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना ९ वाजताच कळविण्यात आले होते, तर शवचिकित्सा अहवालात मृत्यूची वेळ १०.०१ वाजताची का दाखविण्यात आली, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवून वृत्त वाहिन्या जबाबदारीपूर्वक वार्तांकन करू शकल्या असत्या. त्यासाठी एखादी चमू दुबईला पाठविणे सहजशक्य होते; मात्र एकाही वृत्त वाहिनीने तसे केल्याचे दिसत नाही. त्याऐवजी दुबईतील सूत्रांकडून प्राप्त झालेल्या आणि विश्वसनीयतेचा अभाव असलेल्या अर्धवट माहितीला, श्रीदेवीच्या चित्रपटांमधील दृश्ये व अति उत्साही न्यूज अ‍ँकरच्या वायफळ बडबडीची जोड देऊन अत्यंत घिसाडघाईने वार्तांकन करण्यात आले. त्यामुळे वाहिन्यांना टीआरपी भले लाभला असेल; पण त्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित झाले आहे.










 

Web Title:  In the race of TRP question raised on credibility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.