उंदीर आणि चहा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 12:36 PM2018-03-31T12:36:26+5:302018-03-31T12:36:26+5:30
सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार अभागी आहे खरं.
- मुकेश माचकर
सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार अभागी आहे खरं. बघा ना, मी लाभार्थी म्हणून इतकी माणसं इतक्या जाहिराती करतायत, इतके महामित्र नेमतायत, गेल्या ७५ हजार वर्षांत मिळाले नव्हते, इतके स्वच्छ मुख्यमंत्री आणि गेल्या एक लाख वर्षांत पाहिलं नव्हतं, अशा सचोटीचं सरकार लाभलं, याबद्दल शब्दफुलांचा अभिषेक सुरू असतो सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांचे अग्रलेखक सरकारवर अधूनमधून नेमस्त टीका करताना मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळ होईल असा प्रयत्न करत असतात (त्यांनाही चमचा लिंबू स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे हवे असतात), तरीही काही नतद्रष्ट मंडळी मात्र सरकारचं जराही कौतुक करत नाहीत, सतत खुसपटं काढत असतात.
आता काँग्रेसी फेक्युलर सोडा, नाथाभाऊ तर आपले; आपण त्यांची खाट टाकण्याचे एवढे प्रयत्न केले, त्यांना चहूबाजूंनी घेरून त्यांचे पंख कापले तरी अजूनही त्यांना पक्षाने वाऱ्यावर सोडलेलं नाही (म्हणजे काय ते भुजबळांना विचारा). त्यांनीही असं वागावं. राज्य सरकारच्या ज्या कामगिरीचा राज्यालाच नव्हे, तर देशाला अभिमान वाटायला हवा, त्या कामगिरीची अशी थट्टा करावी?
सात दिवसांत मंत्रालयातले तीन लाखापेक्षा जास्त उंदीर मारणं आणि तेही मंत्रालयाच्या कामकाजात कुठेही अडथळा न आणता, हा काय जोक आहे का? त्यासाठी काय प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं असेल, याचा एव्हाना अमेरिकेपासून ते इस्रायलपर्यंत अनेक देशांचे वैज्ञानिक शोध घेत असतील. रशिया, चीन, जर्मनीत दोनपाच उच्चपदांवरच्या वैज्ञानिकांच्या नोकऱ्या गेल्या असतील, जे भारताला जमलं ते तुम्हाला का जमलं नाही, म्हणून. बाकीचे लोक आधुनिक बुद्धिमत्ता आणि विज्ञानात असतील पुढे, पण, वेदांचा तो अर्थ आम्हासचि ठावा, येरांनी फक्त आधुनिक तोकड्या विज्ञानाचा भार वाहावा. आपल्याकडच्या प्राचीन ऋषीमुनींनी सिद्ध केलेल्या दिव्य औषधींच्या साह्यानेच हा चमत्कार घडून आला असणार यात शंका नाही. ट्रिपलश्री, रामदेव, बापू, महाराज, स्वघोषित शंकराचार्य अशा पैशाला पासरी बुजबुजलेल्या आधुनिक ऋषींपैकी एखाद्या ऋषीने तपसामर्थ्याच्या बळावर मनोमन शापवाणी उच्चारून हे उंदीर अदृश्य केले असले तरी तरी त्यात आश्चर्य वाटून घ्यायला नको.
आपल्या देशातलं पुरातन विज्ञान आपण भोळेपणाने इंग्रजांच्या हाती देऊन फार मोठी चूक केली होती. त्यातलेच सगळे शोध एडिसन, न्यूटन, राइट बंधूंच्या नावावर खपवले या पाश्चिमात्यांनी. त्यामुळे कितीही टीका झाली तरी उंदरांना नष्ट करण्याची प्रक्रिया सरकार जाहीर करणार नाही किंवा काहीतरी थातूरमातूर माहिती सांगितली जाईल, यात शंका नाही. त्यामागचा अर्थ आपण समजून घ्यायला हवं. लगेच उंदरांचं काय झालं, तुम्ही खोटं सांगताय, दर चौरस फुटामागे किती उंदीर होते, वगैरे देशद्रोही चीं चीं करायची गरज नाही.
परदेशातल्या एखाद्या सरकारने अशी कामगिरी केली असती, तर आतापर्यंत त्यावर हॉलिवुडचा एखादा सिनेमा तयार झाला असता. त्याची कथाही छान अॅक्शनपॅक्ड आणि उत्कंठावर्धक पद्धतीने रंगवता आली असती. तातडीचा संदेश आल्यानंतर नायक मुख्यमंत्री आपल्या पत्नीचा गाण्याचा कार्यक्रम अर्ध्यात सोडून (केवढा मोठा जिवावरचा धोका पत्करलाय पाहा आपल्या डेअरिंगबाज हीरोने) मंत्रालयात कर्तव्यबुद्धीने येतो, त्याच्यापुढे कुरतडलेल्या फायलींचा ढिगारा ठेवला जातो. त्याला असं दिसतं की फायलींमध्ये संबंधित मंत्री किंवा अधिकारी यांना गोत्यात आणणारा भागच फक्त कुरतडला गेला आहे, बाकीच्या फायली शाबूत आहेत. ते पाहताच तीक्ष्ण बुद्धीच्या बळावर त्याच्या लक्षात येतं की हे काम प्रशिक्षित उंदरांचंच असणार. यांच्या मेंदूत काही कळीच्या शब्दांचं प्रोग्रामिंग करून ठेवलेलं असणार. तेवढेच शब्द हे खातात, बाकीच्या फायलीला तोंड लावत नाहीत. मग तो तडक आपल्या गुरूंना पाचारण करतो. एव्हाना मंत्रालयाला अशा साधुमहंतांची सवय झालेली असते. हे अंगभर कपडे घालून आलेले असतात, याचंच लोकांना विशेष वाटतं. ते मंत्र्याच्या दालनातच बैठक मारून भोवती फक्की मारून जागा अभिमंत्रित करतात आणि ध्यान लावून बसतात. त्यांना सगळा प्रकार लक्षात येतो आणि ते एका खास यज्ञाचं आयोजन करतात. खाली मंत्रालयाचं कामकाज सुरू असताना वर टेरेसवर गुप्त यज्ञ सुरू असतो. तो कुणाच्या डोळ्यांवर येऊ नये आणि खासकरून पश्चिमी राष्ट्रांच्या उपग्रहांना आपल्या यज्ञाचं गुपित समजू नये, यासाठी वर एक छत आच्छादलं जातं आणि धुराबद्दल शंका येऊ नये म्हणून तिथे धूम्रपान कक्ष किंवा हुक्का बार असल्याचं सांगितलं जातं. ‘मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कृपया याची नोंद घ्यावी की सात दिवस आत्महत्यांसाठी टेरेस खुला नाही, इच्छुकांनी सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करावा अथवा आपापले विष सोबत घेऊन यावे,’ असा बोर्ड लावून यज्ञ सुरू होतो आणि ठिकठिकाणचे अदृश्य उंदीर इच्छेविरुद्ध खेचले जातात आणि यज्ञात येऊन कोसळतात. सात दिवस चाललेल्या यज्ञात तीन लाखापेक्षा जास्त उंदीर मेले, असं ऋषी जाहीर करतात. उंदीर अदृश्य असल्यामुळे आणि त्यांची संख्या तप:सामर्थ्याशिवाय जाणून घेणं अशक्य असल्यामुळे आणि जे वरिष्ठांना पूज्य ते पूज्यबुद्धीच्या (पूज्य = शून्य) कनिष्ठांना अतिपूज्य असल्यामुळे हा आकडा खोटा आहे, उंदीर नव्हतेच, हा घोटाळा आहे, वगैरे कोणी बोलण्याची शक्यताच नसते. हे सगळं सुरू असताना तिकडे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी गातच असतात आणि तिथलेही खरेखुरे उंदीर पळत येऊन स्वेच्छेने होमात उडी मारू लागतात, तेव्हा थोडी गडबड उडते खरी. पण, गाण्याच्या ठिकाणी जागीच गतप्राण झालेल्यांपेक्षा निसटू शकलेल्या भाग्यवंत उंदरांची संख्या कमी असते. त्यामुळे थोडक्यावर प्रसंग निभावतो. तीन लाख अदृष्य उंदीर दाखवण्याचं आव्हान दिग्दर्शकांसमोर उभं करणाऱ्या या थरारक कथेवर हॉलिवुडचा एखादा भव्य सिनेमा तयार झाला असता की नाही? अकारण विव्हळून विव्हळून गायलेली दोनचार असंबंधित गाणी, जुन्या गाण्याचं विडंबन वाटावं असं चित्रित केलेलं एखादं आयटम साँग टाकलं असतं आणि देशभक्तीपर संवादांची खणाखणी भरली असती, तर एखादा हिंदी सिनेमाही तयार झाला असता. पण, म्हणतात ना, पिकतं तिथे विकत नाही, तेच खरं.
हे सिनेमाचं काल्पनिक प्रकरण सोडून द्या. वास्तवात मंत्रालयातल्या उंदरांची कहाणी किती रोमांचक, थरारक आणि प्रेरक आहे. तिचा खरंतर पुढच्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकात समावेश व्हायला हवा. पण, त्याऐवजी इतक्या मोठ्या कामगिरीवर टीका सुरू आहे. टीकाकारांचे आक्षेप तरी किती बालिश! म्हणे मंत्रालयात तीन लाख उंदीर होते, ते कधी मोजले. मोजणीनंतरचे वाढलेले उंदीर गणले गेले का? एक उंदीर दुसऱ्या उंदरापेक्षा वेगळा आहे, हे कसं कळतं? राम कोणता आणि श्याम कोणता, सीता कोणती आणि गीता कोणती, हे कसं समजतं? आता या मंडळींचा आपल्या पूर्वजांच्या ज्ञानावर काहीच विश्वास नाही. मंत्रशक्तीने जिथे सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं अंतरही अचूक मोजलं गेलं होतं, तिथे तीनचार लाख उंदरांची काय कथा!
मंत्रालयात एवढे उंदीर काय करत होते असं विचारतात हे लोक?
उंदीर जास्त करून कुठे असतात?
जिथे त्यांना काही ‘खायला’ मिळतं तिथे?
मग सर्वाधिक उंदीर कुठे सापडायला हवेत?
अर्थातच मंत्रालयात! (तिथे खूप कागदपत्रं असतात म्हणून हो, गैरसमज नको.)
चौथीतल्या पोरालाही हे कळायला हवं की नाही? पण एकदा अनाठायी टीका करायची म्हटलं की माणसं कशाचाही मुद्दा बनवतात.
मुळात मंत्रालयात उंदरांचं येणं हे शेतकऱ्यांशी निगडित आहे. शेतकरी आणि उंदीर यांचं एक विशिष्ट नातं आहे. उंदीर शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या धान्यावर डल्ला मारतो, पिकाचं आणि धान्याचं नुकसान करतो. पण, शेतकरीच काही पिकवू शकत नसेल, कर्जाखाली पिचला असेल, तर शेतकऱ्याला काय मिळणार आणि उंदरांना काय मिळणार? शेतकऱ्याकडे विष खायलाही पैसे उरत नाहीत. सरकार आपल्याला चांगल्या प्रतीचं जीवनमान, शेतमालाला चांगला भाव, चांगलं बियाणं, चांगली खतं देऊ शकलं नसलं तरी चांगल्या प्रतीचं विष मात्र देऊ शकेल, हे त्याला माहिती असतं. त्यामुळे आत्महत्या करायला तो कसातरी मुंबईत येतो. आता शेतकऱ्यावरच ही वेळ आली तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या उंदराला जायला दुसरं कोणतं ठिकाण असेल, सांगा?
शेतकऱ्याने मुंबईत उतरून आत्महत्या करायला आलो असं सांगितल्यावर कोणता ना कोणता टॅक्सीवाला फुकटात त्याला मंत्रालयाच्या दारात नेऊन सोडतो. मरणाऱ्या माणसाला मदत केल्याचं पुण्य त्याला हवं असतं आणि सर्वात लोकप्रिय सुसाइड पॉइंट त्याला माहिती असतो. मग शेतकऱ्याला मंत्रालय परिसरातले फेरीवालेही शेवटचं पोटभर जेऊखाऊ घालतात... अर्थातच फुकट. आत्महत्या करणाऱ्यांसाठीच्या वेगळ्या रांगेतून तो पटकन् आत येतो. त्याला तपासायचेही कष्ट पोलिस घेत नाहीत. फलकावर त्याला मार्गदर्शन केलं जातं, विष पिणाऱ्यांनी या दिशेने जावे, उंचावरून उडी मारणाऱ्यांसाठी उद्वाहन अमुक दिशेला.
दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी जातात. इथे त्यांच्यासाठी एक वेगळा धक्का असतो. मुख्यमंत्र्यांच्या कक्षाला जोडून असलेला अखेरचे चहापान कक्ष. इथे हिमालयातल्या गुंफांमध्ये उगवलेला, तिथल्या हजारो वर्षं वयाच्या साधूंनी अभिमंत्रून दिलेला खास चहा शेतकऱ्यांना प्यायला दिला जातो. हे सरकार आपलं कसलंही भलं करणार नाही, पण, तरीही आपण इथून उडी मारता कामा नये, इथे विष पिता कामा नये, घरी जाऊन तहानभुकेने नैसर्गिकरित्या मरावं, अशी सकारात्मक प्रेरणा या शेतकऱ्यांच्या मनात जागते आणि ते परत निघून जातात. ज्यांना काही कारणाने चहा वर्ज्यच असेल, असे मोजके शेतकरी तो टाळतात आणि मग आत्महत्येचा प्रयत्न करून बसतात.
आता या अतिशय मौल्यवान आणि महागड्या चहाचा नुस्खा हेही आपलं वैदिक गुपित आहे. ते कुणाला कळू नये, म्हणून या चहापान कक्षाची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. पण, कुणातरी नतद्रष्टाने एका वर्षात साडेतीन कोटींचा चहा कसा लागतो, अशी बोंब मारून सरकारच्या याही थोर कार्यावर प्रश्नचिन्हं लावून दाखवलं. अरे, साडे तीन कोटी रुपये तर एखादा तालुका स्तरावरचा अधिकारीही कमावतो रे वर्षभरात. त्या आकड्यात काय अडकून पडलात? मुख्यमंत्र्यांच्या कक्षातला हा स्पेशल चहा प्यायल्यामुळे किती लाख शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त होऊन उपासमारीने मरायला तयार झाले, ते पाहाल की नाही?
श्या! सरकारचं काहीच कौतुक नसलेल्या आणि सतत सरकारविरोधी चीं चीं करून आम्हा सरकारभक्तांचे मेंदू कुरतडणाऱ्या या विरोधकरूपी उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी काही योजना आखलेली आहे की नाही, अध्यक्षमहोदय?