ये तो सिर्फ झाँकी है...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 10:15 AM2018-04-14T10:15:46+5:302018-04-14T10:15:46+5:30
आपल्या संवेदनशील, पराकोटीच्या सहिष्णू, परमविज्ञानी, अतिप्रगत, जगद्गुरूपदाला पोहोचलेली आध्यात्मिक महासत्ता असलेल्या अतीव संस्कारी देशात असं काही घडणं शक्य तरी आहे का?
- मुकेश माचकर
प्रसंग पहिला
स्थळ : पोलीस स्टेशन
सामान्य माणूस : साहेब साहेब... वाचवा वाचवा...
हवालदार : काय रे वाचवा वाचवा म्हणून कोकलतोयस? दिसत नाही का आम्ही किती कामात आहोत. साहेब हप्त्याचा हिशोब करतायत, आमच्यापैकी काही आमदारसाहेबांच्या बुटांना पॉलिश करतोय, दोनजण खासदारांच्या म्हशीला चारा घालायला गेलेत. एकजण मंत्रीसाहेबांच्या अंडरपँट धुवायला बसलाय... इथे तुला वाचवायला वेळ आहे कुणाला?
सा. मा. : साहेब, मला नाही, माझ्या मुलीला वाचवा...
हवालदार : मुलीला? तुझा अवतार काय, तुझी औकात काय आणि मुलगी जन्माला घातलीस? आपल्या देशात? आमच्यासारख्या लोकांच्या देशात? मग आता भोग आपल्या कर्माची फळं... काय रे, दुपारचे चार वाजलेत? अजून तीन तासांनी अंधार होईल. इतक्या उशिरापर्यंत कुठे उंडगायला गेली होती तुझी पोरगी? (डोळा मिचकावून) दिसायला आयटमाय काय? म्हंजे डायरेक रेपची केस करायला घेऊ...
सा. मा. : साहेब, असं अभद्र बोलू नका हो. लवकर चला. तिला काही गुंडांनी उचलून नेलंय. वेळीच हालचाल केली नाही तर ते खरोखरच बलात्कार करतील हो तिच्यावर...
हवालदार : अरे पण आता त्यांनी उचलून नेलीच आहे, तर तशीच सोडतील का? तशीच सोडली तर त्यांच्या समाजात त्यांची काय अब्रू राहील? काय बलात्कार, बलात्कार करतोस. या तुमच्यासारख्या फटिचरांच्या पोरींनाच जास्त हौस असते. आधी खेटायला जातात, मग रेटा मिळाला की ओरडतात. उफाड्याच्या पोरींना सोडता कशाला घराबाहेर? त्यांना बघून फुकट बाप्यांना त्रास होणार, त्यांच्या भावना चाळवणार, मग ते काय भजन म्हणत बसतील का?
सा. मा. (हवालदाराच्या पायावर कोसळत) : माझी मुलगी फक्त आठ वर्षांची आहे हो साहेब... आठ वर्षांची...
.......................................
प्रसंग दुसरा
स्थळ : आमदारसाहेबांचं ऑफिस.
सेक्रेटरी (फोनवर) : अच्छा... अरे बापरे... काय सांगता... बरं बरं... मला अपडेट देत राहा... मी साहेबांना कळवतो... हो हो निवेदन तयार करायला घेतो... संध्याकाळी साहेब बाइट देतील प्रेसला... (फोन बंद झाल्यावर) साहेब, रेप केस झालीये...
आमदार : डिक्टेशन घ्या...
सेक्रेटरी : साहेब अजून डिटेल्स यायचेत...
आमदार : ते आल्यावर त्यानुसार अपडेट करा, आता डिक्टेशन घेऊन ठेवा, म्हणजे नंतर घाई होणार नाही... लिहा... हे अतिशय नीच प्रवृत्तीचं दर्शन घडवणारं आणि माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य आहे. माझ्या मतदारसंघात अशा प्रवृत्तींना थारा मिळता कामा नये, यासाठी मी कठोर प्रयत्न करीन आणि दोषींना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करीन. त्या दुर्दैवी मुलीच्या कुटुंबाला माझं सांगणं आहे की तिचा हा भाऊ जिवंत असेपर्यंत तिला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही...
सेक्रेटरी : छान, नीट साफसूफ करून घेतो...
आमदार : आता दुसरा कागद घ्या... लिहा... माझ्या तोंडाकडे बघता काय? ती पोरगी ‘आपल्या’पैकी असेल, तर हे निवेदन द्यायचं आहे... ती त्यांच्यापैकी असली तर हे कसं चालेल? लिहा... झाला प्रकार दुर्दैवी आहे, पण, त्याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. यामागे निर्दोष व्यक्तींवर दोषारोप करून त्यांना गुंतवण्याचं विरोधी पक्षांचं काही कारस्थान आहे का याचाही विचार व्हायला हवा... अर्थात पीडितेची तक्रार खरी असेल, तर आम्ही सर्वशक्तिनिशी तिची पाठराखण करू, त्यात आम्ही मतपेढीचं, जातीपातीचं राजकारण आणणार नाही, याचीही ग्वाही देतो.
सेक्रेटरी : चांगला गुगली आहे... हेही घेतो...
आमदार : थांबा, अजून एक सांगून ठेवतो... असं प्रश्नार्थक पाहू नका... तुम्ही, मी, आमचे बंधुराज, चिरंजीव सगळेच चमचा दोन चमच्यांपासून कधीकधी पाटीभर शेण खात असतो कुठे ना कुठे... त्यातलंच आज अंगावर उडणार असेल तर तीही तयारी ठेवायला हवी... घ्या लिहून... हा मला राजकारणातून संपवण्याचा विरोधकांचा कट आहे. आम्ही सकारात्मक राजकारण करत असल्यामुळे विरोधक इतक्या नीच पातळीवर उतरतील, याचा विचारही केला नव्हता. पण, असली बालंटं आणून ते मला संपवू पाहतील तर मी त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. आमच्याही अंगात स्वत:च स्वत:ला महापराक्रमी वगैरे म्हणवून घेणाऱ्या जातीचं रक्त सळसळतं आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं... आमच्यावरचे आरोप सिद्ध झाले, तर सार्वजनिक जीवनातून कायमचा बाहेर पडेन, अशी माझी प्रतिज्ञा आहे.
सेक्रेटरी : हेही फस्क्लास झालं... एक सांगायचं राहिलं साहेब... पीडिता आठ वर्षांची आहे...
आमदार : अस्सं... त्याने कशात काय फरक पडतो?
.......................................
प्रसंग तिसरा
(खासदारसाहेबांचं ऑफिस)
सेक्रेटरी (फोन संपवून) : सर...
खासदार : अरे बाबा, आता बास झाली उद्घाटनं... नको आता नवीन उद्घाटन...
सेक्रेटरी : नाही सर, बलात्काराची केस आहे...
खासदार : म्हणजे उद्घाटन आधीच झालं म्हणा की (प्रचंड सकस आणि हास्यस्फोटक विनोद केल्याच्या थाटात स्वत:च हसतात). किरकोळ गोष्टी आमदार बघून घेतील रे. तो पोपट कशाला ठेवलाय तिथे?
सेक्रेटरी : सर, पीडिता अल्पवयीन आहे. खूप ब्रुटॅलिटी झालीये. नंतर खून करून टाकलाय. नॅशनल न्यूज बनतेय...
खासदार : कोण उद्घाटक कोण आहेत?
सेक्रेटरी : सर, आपले लोक आहेत...
खासदार : आणि वस्तू?
सेक्रेटरी : लहान मुलगी आहे... त्यांच्यातली...
खासदार : मग सरळ लिहून टाका, हा पाकिस्तानचा कट आहे. इथे दोन समाज गुण्यागोविंद्याने नांदतात हे त्यांना बघवत नाही. त्यांच्याच चिथावणीने या मुलीच्या समाजातल्या काही तरुणांनी हे घृणास्पद कृत्य करून सीमेपलीकडे पळ काढला आहे. अश्राप बहुसंख्याकांवर आळ यावा आणि दंगली पेटाव्यात, असा पाकिस्तानचा डाव आहे. हा डाव अयशस्वी करण्यासाठी माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही समाजाच्या लोकांनी शांतता पाळावी आणि कायद्याला आपलं काम करू द्यावं, असं मी आवाहन करतो.
सेक्रेटरी : सर, पाकिस्तान? डायरेक्ट पाकिस्तान...
खासदार : बच्चा, मी जेव्हा इथे वायू सोडतो, तेव्हा चणेही पाकिस्तानने खाल्लेले असतात, हे लक्षात ठेव. (प्रचंड सकस आणि हास्यस्फोटक विनोद केल्याच्या थाटात स्वत:च हसतात).
...................................
प्रसंग चौथा
स्थळ : पंतप्रधान कार्यालय
सेक्रेटरी : सर, लोक विचारतायत तुम्ही गप्प का?
पंतप्रधान : लोक? कोण लोक? ते बोलघेवडे लोक ना? ते काही आपले मतदार नाहीत.
सेक्रेटरी : सर, राजकारणापलीकडे जाऊन एक मानवी घटना म्हणून तुम्ही व्यक्त व्हावं, असं काहीजण सुचवतायत...
पंतप्रधान : राजकारणात राजकारणापलीकडचं असं काहीच नसतं. आज मी इथे बोललो, तर मी बोलावं असं बोलणारे म्हणतील, आधी का नाही बोलले. हे बोलले तीही रंगसफेदीच आहे. मी बोललो म्हणून त्यांच्यातला कोणी माझा मतदार बनणार नाही. जे माझे मतदार आहेत, त्यांना ही घटना किरकोळ वाटते आणि न्याय्यही वाटते. समोरच्यांना धडा शिकवणारा माणूस अशा माझ्या प्रतिमेशी सुसंगत वाटते. त्यांच्या मनातल्या या माझ्या प्रतिमेला तडा गेला, तर ते मात्र माझ्यापासून तुटतील. येणारा काळ किती कठीण आहे, हे तुम्ही जाणता. सगळं काही ईव्हीएमवर सोडता येत नाही. त्यामुळे माझं मौनच पुरेसं बोलकं राहील.
सेक्रेटरी : पण, सर सोशल मीडियावर फारच तीव्र प्रतिक्रिया आहे... हॅशटॅग चालतायत...
पंतप्रधान : मग आपले चुन्नूमुन्नू काय करतायत फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवरचे? पीडितेच्या समाजाची दहशतवादाची परंपरा आहे, गावकऱ्यांनी स्वसंरक्षणासाठी पाऊल उचललं, आपले लोक विस्थापित झाले तेव्हा कुठे होतात, आपल्या स्त्रियांवर बलात्कार झाले, तेव्हा का नाही कणव आली, त्यांच्या माणसांनी केलेल्या बलात्काराच्या बातम्या हायलाइट करा म्हणावं... दोन दिवसांत असा धुरळा उडवा की झाला तो बहुसंख्याकांसाठी न्यायच होता, असं लोकांना वाटलं पाहिजे... अरे, तुमचा चेहरा एकदम पडला का?... काही चिंता करू नका... पुढच्या आठवड्यात मी रेडिओवर सगळं बॅलन्स करेन बरोबर... सामाजिक सौहार्द, विविधतेत एकता, मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा... एकदम हृदयाला हात घालणारं फर्मास भाषण लिहून काढा सवडीनं... मी योग्य जागी हमसाहमशी रडून दाखवेन... बरेच दिवसांत रडायची चांगली संधी मिळाली नव्हतीच नाहीतरी... आता सगळी कसर भरून काढतो.
वि. सू. : वरील प्रसंग संपूर्णपणे काल्पनिक असून त्यातील व्यक्तिरेखा आणि संवाद यांचा वास्तवातील व्यक्तिरेखा आणि संवादांशी काही धागा जुळला, तर तो निव्वळ योगायोग मानावा. आपल्या संवेदनशील, पराकोटीच्या सहिष्णू, परमविज्ञानी, अतिप्रगत, जगद्गुरूपदाला पोहोचलेली आध्यात्मिक महासत्ता असलेल्या अतीव संस्कारी देशात असं काही घडणं शक्य तरी आहे का?