‘चले जाव’च्या पराक्रमपर्वाचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:50 AM2017-08-09T00:50:05+5:302017-08-09T00:50:24+5:30
देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या लोकलढ्यातील सर्वात मोठा व संघर्षमय लढा १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा होता. भारताच्याच नव्हे, तर एकूण जगाच्या इतिहासात तोवर झालेले ते सर्वात मोठे जनआंदोलन होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या लोकलढ्यातील सर्वात मोठा व संघर्षमय लढा १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा होता. भारताच्याच नव्हे, तर एकूण जगाच्या इतिहासात तोवर झालेले ते सर्वात मोठे जनआंदोलन होते. राजा, सेनापती वा धर्मगुरू यातले कोणीही नेतृत्वस्थानी नसताना सामान्य माणसे आपल्या राजकीय अधिकारांसाठी एकत्र येऊन सत्तेशी झुंज द्यायला तयार होतात, ही बाब एवढ्या मोठ्या प्रमाणावर याच आंदोलनात जगाच्या अनुभवाला आली. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य हे की, या लढ्याला प्रत्यक्ष तोंड लागण्यापूर्वी त्याचे सारे नेते ब्रिटिश सरकारने तरुंगात टाकले होते. त्यामुळे हा लढा खºया अर्थाने नेत्यांवाचून झालेला ‘लोकलढा’ होता. ८ आॅगस्टला सेवाग्राममध्ये झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत या लढ्याच्या घोषणेची तयारी पूर्ण झाली आणि पक्षाचे सारे नेते मेलने मुंबईला रवाना झाले. गवालिया टँक या ऐतिहासिक स्थळी या आंदोलनाची घोषणा व्हायची होती. मात्र, या आंदोलनाची पूर्वसूचना असल्याने व त्याची धास्ती सरकारने अगोदरच घेतली असल्याने त्याच्या सर्व नेत्यांची धरपकड पहाटेपासूनच सरकारने सुरू केली. गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये हलविण्यात आले. तर नेहरू, पटेल, आझाद, कृपलानी, राजेंद्रबाबू या नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात डांबले गेले. लढ्याला नेता नसतानाही ते आंदोलन जनतेने ज्या उत्साहाने आणि सामर्थ्याने लढविले त्यालाही इतिहासात तोड नाही. सरकारने लाखो लोकांना तुरुंगात डांबले. सर्वत्र लाठीहल्ला आणि अश्रुधूर यांचा मारा करून आंदोलन मोडीत काढण्याचा आपल्या सामर्थ्यानिशी त्याने प्रयत्न केला. सरकारी आकडेवारीनुसार १९४२च्या लढ्यात ९५० लोक पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडून मृत्यू पावले. त्या काळात अहमदनगरच्या किल्ल्यात बंद असलेल्या नेहरूंचा या आकड्यावर कधी विश्वास बसला नाही. त्यांच्या मते या आंदोलनात किमान दहा हजार स्त्री-पुरुष ठार झाले होते. त्याआधी असहकाराचे आंदोलन, व्यक्तिगत आंदोलन, दांडीचा सत्याग्रह असे अनेक लढे भारतीय जनतेने गांधीजींच्या नेतृत्वात यशस्वी केले होते. १९४२चा लढा हा त्या साºयांत मोठा व जगाचे लक्ष वेधून घेणारा होता. ब्रिटिश साम्राज्य मोडीत काढण्यासाठी मी पंतप्रधान झालो नाही, असे उद्दाम उद्गार काढणाºया विन्स्टन चर्चिल यांच्यावर या आंदोलनाचा झालेला परिणाम हा की ते आंदोलन सुरू असतानाच भारताला कशा तºहेने स्वातंत्र्य देता येईल, याविषयीच्या वाटाघाटी करण्यासाठी त्याने
सर स्ट्रॉफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वात एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवले. या मंडळाने स्वातंत्र्याची जी योजना गांधीजींना ऐकविली ती ऐकताच ‘हेच द्यायचे असेल तर आल्या पावली परत जा’ असे गांधींनी त्यांना ठणकावले होते. १९४२च्या लढ्यातील जनतेच्या प्रचंड व देशव्यापी सहभागाने एक लोकनेता, एका साम्राज्याला कसे वाकवू आणि ऐकवू शकतो, ते यातून स्पष्ट झाले. क्रिप्स मिशन, त्याआधी झालेल्या गोलमेज परिषदा आणि पुढे ब्रिटिश सरकारने पाठविलेले कॅबिनेट मिशन या साºया घटना देशाला स्वातंत्र्याच्या दिशेने नेणाºया ठरल्या. मात्र, या वाटेवरचा देशाचा वेग वाढविणारे आंदोलन ४२चेच होते. या आंदोलनाने अमेरिकेला अस्वस्थ केले. त्या देशाचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनीच चर्चिल यांच्यावर दडपण आणून त्यांना क्रिप्स मिशन भारतात पाठवायला भाग पाडले होते. युरोपात दुसरे महायुद्ध सुरू होते आणि त्यात ब्रिटनला माघार घ्यावी लागत होती. पूर्वेला जपानने ब्रह्मदेशापर्यंतचा मुलूख आपल्या ताब्यात आणला होता आणि त्यांच्या सेना भारताच्या पूर्व सीमेवर येऊन उभ्या होत्या. हिटलरचा नाझीवाद आणि मुसोलिनीचा फॅसिझम हे हुकूमशाहीचे चेहरे अतिशय विक्राळ होते आणि जपानच्या आक्रमक वृत्तीची जोड त्यांना मिळाली होती. हे आक्रमण आपल्या सीमेवर असताना इंग्लंडचे सरकार आपल्याला स्वातंत्र्य द्यायला राजी नाही आणि आपण देऊ केलेले सहकार्यही खुल्या मनाने घेण्याची त्याची तयारी नाही ही त्या वेळची काँग्रेसची कोंडी होती. त्याच वेळी जिनांनी पाकिस्तानसाठी डायरेक्ट अॅक्शनचा म्हणजे सक्रिय व सशस्त्र लढ्याचा आदेश आपल्या लीगमधील अनुयायांना दिला होता. या स्थितीत आमचे प्रश्न आम्हीच सोडवू, या निर्धाराने आपला अभिक्रम कायम राखण्याचा गांधींचा निर्धार या आंदोलनात साºयांच्या प्रत्ययाला आला. या आंदोलनाने भारतीय जनतेला आपल्या लोकशाही सामर्थ्याची खºया अर्थाने जाण करून दिली. ज्या लोकशाही मूल्यांसाठी हा लढा लढविला गेला आणि त्यात हजारोंनी प्राणार्पण केले ती मूल्येच मग भारताच्या राज्यघटनेचा प्रमुख भाग बनली. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही ती मूल्ये आहेत. या मूल्यांसमोर ज्या-ज्या वेळी सत्तेची आव्हाने उभी राहिली त्या-त्या वेळी जनतेने पुन्हा तेवढेच मोठे आंदोलन केलेलेही देशाने पाहिले. जयप्रकाशांचे आंदोलन हे अशा आंदोलनापैकी एक होते. आज पुन्हा एकवार स्वातंत्र्यलढ्याने देशाला दिलेली मूल्ये बाधित करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. धर्मनिरपेक्षतेची कोंडी करणे, धर्मांधता वाढविणे, अल्पसंख्याकांना असलेले अधिकार नाकारणे, धनवंतांना संधी आणि कष्टकºयांवर अन्याय हे प्रकार पुन्हा एकवार देशात सुरू झाले आहेत. त्याचमुळे या आंदोलनाचे स्फूर्तिदायी स्मरण आज आवश्यक आहे.