दिल्लीतल्या खोलीत झालेली ‘साहेबां’ची ‘शाही’ गुप्त मुलाखत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 10:14 AM2018-02-24T10:14:30+5:302018-02-24T10:14:30+5:30
अवघ्या महाराष्ट्रात सध्या फक्त एका जाहीर मुलाखतीची चर्चा आहे. धाकट्या साहेबांनी थोरल्या साहेबांशी साधलेल्या जाहीर संवादाची.
- मुकेश माचकर
अवघ्या महाराष्ट्रात सध्या फक्त एका जाहीर मुलाखतीची चर्चा आहे. धाकट्या साहेबांनी थोरल्या साहेबांशी साधलेल्या जाहीर संवादाची.
खरंतर जवळपास यार्डात गेलेल्या इंजिनाने काटे मोडून बंद पडलेल्या जुनाट घड्याळाशी साधलेला हा संवाद. तो लोकांना इतका का महत्त्वाचा वाटतो, कोण जाणे. पण, महाराष्ट्रातले मनोरंजनाचे पर्याय (हे पाहा मा. मुख्यमंत्र्यांना मध्ये आणू नका, आम्ही टीव्हीवरच्या कार्यक्रमांबद्दल बोलतो आहोत) आणि मराठी माणसाचं अल्पसंतुष्टत्व पाहता, इथल्या कोंदट वातावरणात झुळुकभर हवा खेळली तरी मराठी माणूस फुल ऑन एसीचा आनंद मिळाल्यासारखा खूष होऊन जातो. तसंच या मुलाखतीच्या बाबतीतही झालं, असं आमचं स्पष्ट मत आहे. पण, एखादी रेष छोटी आहे, हे नुसतं ओरडत बसू नये, त्या रेषेशेजारी मोठी रेष ओढून आपला मुद्दा सिद्ध करावा, अशी शिकवण मिळालेली असल्याने या मुलाखतीपेक्षा मोठी, भव्य, दिव्य आणि दणदणीत मुलाखत घेण्याचा घाट आम्ही घातला. त्यासाठी मैदान बुक करायला निघालो, तर भलतीच अडचण समोर आली. ज्यांची मुलाखत घ्यायची ते आमचे साहेब जगप्रसिद्ध नव्हेत तर विश्वप्रसिद्ध असल्यामुळे सहाशे कोटींपैकी किमान साडे तीनशे कोटी भारतीय तरी ही मुलाखत ऐकायला प्रत्यक्ष मैदानावर हजर होणार, हे निश्चित होतं. एवढ्या लोकांची बैठकव्यवस्था करायची, तर मुलाखत चंद्रावरच घ्यावी लागेल, असं नासाने युनेस्कोला सांगितलं आणि तसा मेसेज व्हॉट्अॅपवर येताच आम्ही तो बेत रहित केला.
पुढचा पेच खुद्द मुलाखतीचाच होता. इनडोअर मुलाखत करावी, म्हटलं तर मुळात आमच्या साहेबांना मुलाखती देण्याचा सराव नाही. त्यांना मुळात संवादाचाच सराव नाही. त्यांनी बोलायचं आणि इतरांनी ऐकायचं, असाच खाक्या. ते सतत भाषणं देत असतात. लोक बाथरूममध्ये गाणी गातात, हे बालपणी नदीवर अंघोळ करायला गेल्यावर तिथेही भाषणच द्यायचे. असं म्हणतात की त्यामुळे त्या नदीवरची गर्दी हटली, धुणी धुणाऱ्या बाया आणि म्हशी धुणारे बाप्ये येईनासे झाले. त्यामुळे नदीतली प्रदूषणाची पातळी घटल्यामुळे तिथे मगरींचा संचार झाला. मग यांनी मगरींनाही भाषणं द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मगरींची संख्याही कमी झाली (काही हसून मेल्या, काही रडून मेल्या, म्हणे). हीच कथा नंतर मगरींचा नि:पात म्हणून शालेय पुस्तकांत प्रसिद्ध झाली. त्यानंतर या बालकाला अनेक ठिकाणच्या मगरींना पळवून लावण्यासाठी नेलं जायचं. साहेबांची वृत्ती टिपकागदाप्रमाणे गुण टिपण्याची असल्यामुळे त्यांनी मगरींकडून रडणं शिकून घेतलं म्हणे!
अरे देवा, हे तर त्यांच्या भाषणातल्यापेक्षा जास्त विषयांतर झालं... असो, तर मुद्दा असा की मुलाखतीत समोरच्याला (किमान प्रश्न विचारण्याइतकं तरी) बोलू द्यावं लागतंच. त्याचा साहेबांना सराव नाही. शिवाय आयुष्यात कोणालाही उत्तरदायी असण्याची सवय नाही. तशी एक शक्यता तरुणपणी निर्माण झाली होती, पण, यांनी तिच्यातून लगेच मान सोडवून घेतली (असतात काही पुरुष भाग्यवान!).
आणखी एक गडबड आहे. एरवी आमचे साहेब, ग्वाटेमालातले बटाटे ते चिलीमधले पेरू अशा सर्व विषयांवर अखंड बोलू शकतात, निरर्थक कोट्या करत. फक्त गोपुत्रांनी केलेल्या हत्या, नोटबंदी, लव्ह जिहाद, व्यापमं घोटाळा, नीरव मोदी घोटाळा यांच्यासारख्या गैरसोयीच्या प्रश्नांवर त्यांची दातखीळ बसते. म्हणजे राजकीय प्रश्न बाद.
पण, इतक्या विपरीत परिस्थितीतही मुलाखत घ्यायचीच, असा आम्ही चंग बांधला होता. आता मुलाखत कशा रीतीने जमवायची, याचा विचार सुरू असताना साहेबांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकाने तडाखेबंद खपाने विक्रीचे उच्चांक मोडले. नेमक्या त्याच सुमारास साहेबांच्याच बडोद्यात अखिल भारतीय की काय म्हणतात ते मराठी साहित्य संमेलनही भरलं. आम्ही एकदम आनंदाने ‘युरेका’ म्हणून ओरडलो, ते ‘सुरेखा’ असं वाटून सौभाग्यवतींनी आमची एक वेगळीच मुलाखत घेतली, ते असो. तर या योगायोगाचा फायदा घेऊन साहेबांची साहित्यिक मुलाखत घ्यावी, असं आम्ही ठरवून टाकलं. साहेबांनीही निरुपद्रवी विषयावर मुलाखत द्यायला होकार दिला, मात्र, त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे (कोण रे कोण हसतोय तो वेड्यासारखा पोट धरधरून, त्याला बाहेर काढा) ही मुलाखत गुप्त स्वरूपात व्हावी आणि निनावीच राहावी, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. आमची इच्छा नसताना आम्ही ती मान्य केली. ही कोणाची मुलाखत आहे, हे कोणालाच कळणार नाही, अशा प्रकारे एकही क्लू न देण्याची खबरदारी आम्ही इथे घेतली आहे, हे तुम्हीही मान्य कराल.
तर दिल्लीतल्या एका निर्जन बंगल्यात ही मुलाखत झाली. या मुलाखतीला जाण्याआधी एका जाडगेल्या गृहस्थाने (त्यांचंही नाव घेण्यास मनाई आहे, पण ज्येष्ठ व्यवसायबंधू आकार पटेल म्हणतात त्याप्रमाणे आपणही त्यांना ‘अमितभाई’ म्हणू या) आमच्याकडून मुलाखतीची सगळी तालीमच करून घेतली. अर्णब गोस्वामीचे व्हीडिओ दाखवून नम्रता, ऋजुता, प्रश्न विचारण्यातलं आदरयुक्त आर्जव कसं असतं, ते अभ्यासायला सांगितलं (तो कोण बेशुद्ध पडलाय त्याला चप्पल हुंगवा). तर अशा रीतीने आम्ही साहेबांची मुलाखत घ्यायला सज्ज झालो. त्याच गुप्त मुलाखतीतले हे काही अंश :
आम्ही : साहेब, तुमच्या पहिल्याच पुस्तकाने तडाखेबंद विक्रीचा उच्चांक गाठला आहे. देशातले सगळे विद्यार्थी एकदम टेन्शनमुक्त झाले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला?
साहेब (हसून) : तुम्ही ‘सामना’तून आलात का?... कार्यकारी संपादकाने संपादकाची मॅरेथॉन मुलाखत घेतल्यासारखं वाटलं एकदम.
आम्ही : ह ह ह... फारच विनोदी स्वभाव आहे साहेब तुमचा. पण, तुमच्या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक तर गाठलाय हे तर खरंच आहे की.
साहेब (खूष होऊन) : मीही खूष आहे. क्योंकि मैं बचपन से लेखक बनना चाहता था.
आम्ही : अहो, पण काल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सभेत तर म्हणालात, मैं इंजीन ड्रायव्हर बनना चाहता था...
साहेब (रूष्ट चेहऱ्याने) : हाच तुम्हा मराठी माणसांचा प्रॉब्लेम आहे. एका माणसाला दोन महत्वाकांक्षा असू नयेत का? लहान मुलांच्या मनात एकावेळी किती गोष्टी करायची इच्छा असते...
आम्ही : हो ना, आणि मोठे होऊन त्या बालिश इच्छा पूर्ण करण्याची संधी सर्वांना कुठे लाभते? (हे पूर्वानुभवातून शहाणे होऊन मनातल्या मनातच बोललो आम्ही. जाहीरपणे फक्त ‘खरंय, खरंय.’) तुम्ही लेखनासाठी निवडलेला विषय फार वेगळा आहे...
साहेब : माझ्या सुटाबुटापासून ते दाढीपर्यंत सगळं काही वेगळंच असतं. तसा माझा कटाक्ष असतो.
आम्ही : पण ते जाकीट तर नेहरूंचं आहे ना? तो पप्पू बिचारा फिरतोय, ढुम ढुम ढुमाक, राजा भिकारी, माझं जाकीट चोरलं, ढुम ढुम ढुमाक असं करत... (हे अर्थातच मनातल्या मनात.) पण, परीक्षार्थी मुलांना मार्गदर्शन करावं असं का वाटलं तुम्हाला?
साहेब : आता त्यातल्या त्यात ऐकून घेणारे तेवढेच उरले आहेत. (हे साहेब चुकून पुटपुटून गेले असावेत. कारण, नंतर त्यांनी ते बोललोच नाही, असं भासवलं.) असं आहे, परीक्षा देणं हे फार टेन्शनचं काम आहे. अभ्यास फार कठीण असतो. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा येतो.
आम्ही : तुम्हाला काय माहिती? (हा प्रश्न मनातल्या मनात होता, पण तो नकळत तोंडातून निघून गेला आणि आता मुलाखतीबरोबर आपलं जीवितकार्यही संपुष्टात आलं, अशी जाणीव दुरून ही मुलाखत पाहात असलेल्या अमितभाईंच्या चेहऱ्यावरून मनाला झाली होती. इष्टदेवतेचं स्मरण कामी आलं असावं.)
साहेब (खुर्चीतून उठून चाल करून येत असलेल्या अमितभाईंना हातानेच थांबवून) : माझा शाळेनंतरच्या परीक्षेशी फारसा संबंध आला नसेल. पण जीवनाच्या परीक्षेशी तर प्रत्येकाचा संबंध येतोच. मी ही परीक्षा कायम देत आलो आणि तिच्यात पैकीच्या पैकी गुण मिळवत आलो. त्या अनुभवाच्या बळावर हे पुस्तक लिहिलं आहे.
आम्ही (जान बची तो लाखो पाये, या म्हणीचा अर्थ मनात साठवत) : आपल्याला ज्या परीक्षेचा अनुभव नाही, ती देणाऱ्या मुलांनाही ग्यान देण्याच्या तुमच्या आत्मविश्वासाला दाद दिली पाहिजे.
साहेब : तो आत्मविश्वास नसता तर अर्थव्यवस्थेतला ‘अ’ही माहिती नसताना मी नोटबंदीसारखा निर्णय रिझर्व्ह बँकेला गुंडाळून ठेवून घेतला असता का? मुळात निर्णय घेण्यासाठी कशातलं काही कळावं लागतं, ही मागासलेली समजूत आहे. अहो, मी शास्त्रज्ञांना विज्ञान आणि पुरातत्त्वज्ञांना इतिहास शिकवतो. सर्जनांना प्लास्टिक सर्जरी शिकवतो, तर किरकोळ परीक्षार्थींना मार्गदर्शन का करू शकत नाही?
आम्ही (अमितभाईंच्या इशाऱ्यानुसार अखेरच्या प्रश्नाकडे झेपावत) : आता पुढे काय लिहिण्याचा विचार आहे?
साहेब : खूप विषय आहेत डोक्यात. ‘माझी विदेशभ्रमंती,’ ‘सेल्फी : एक कला’, ‘सूट कसा शिवून घ्यावा?’, ‘कुर्ता कसा शिवून घ्यावा,’ ‘मिठ्या मारण्याचे तंत्र अर्थात जादू की झप्पी’, ‘फेकी गोलंदाजीचं तंत्र,’ ‘भाषण कसे ठोकावे (भाषणात कसे ठोकून द्यावे : आमच्या मनात)’, ‘ब्लेम इट ऑन नेहरू,’ ‘सरदार पटेल सरसंघचालक बनले असते तर?’, ‘चहा कसा बनवावा,’ ‘१५ लाखांची गोष्ट’... असे बरेच विषय आहेत डोक्यात.
आम्ही : बापरे, ही तर फार मोठी यादी झाली... आता सगळ्या देशाला पडलेला शेवटचा प्रश्न. ही एवढी सगळी पुस्तकं लिहिण्यासाठी तुम्ही पूर्णवेळ लेखनाकडे कधी वळणार आहात?...
हा प्रश्न शेवटचाच ठरला आणि त्यानंतर डोळ्यांसमोर पसरलेला अंधार दूर झाला तेव्हा आम्ही सर्वांगठणकत्या अवस्थेत स्वगृही, स्वपलंगावर होतो, हे सांगायला नकोच.