शरद पवारांची ‘मन की बात’
By रवी टाले | Published: June 15, 2018 01:49 PM2018-06-15T13:49:52+5:302018-06-15T13:50:31+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात नेमके काय आहे, याचा थांगपत्ता ते कुणालाही लागू देत नाहीत, असे त्यांचे समर्थक नेहमी अभिमानाने सांगत असतात. प्रसारमाध्यमांनाही त्यांच्या त्या प्रतिमेचे मोठे अप्रुप आहे. पवारांनी भूतकाळात केलेल्या काही अकल्पनीय राजकीय खेळ्यांमुळे त्यांची ही प्रतिमा निर्माण झाली आहे आणि स्वत: पवारांनीही ती जाणीवपूर्वक जोपासली, असे मानण्यास जागा आहे. पवार कितीही नाकारत असले तरी, देशाचे पंतप्रधान पद भुषविण्याची त्यांची आकांक्षा लपून राहिलेली नाही. अर्थात, महाराष्ट्रासारख्या मोठ्या व पुढारलेल्या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद आणि केंद्रात संरक्षण व कृषी यासारखी महत्त्वाची मंत्रालये सांभाळलेल्या नेत्याने पंतप्रधान पदाची आकांक्षा बाळगण्यात नक्कीच काही वावगे नाही.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने, पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या प्रत्येकच नेत्याने आपले घोडे पुढे दामटण्यास प्रारंभ केला आहे. अशा प्रत्येक नेत्याची अडचण फक्त एकच आहे! मतदार नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावरून हटवेल, याची शंभर टक्के खात्री नाही आणि स्वपक्षाला स्वबळावर सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही! या बाबतीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्थिती इतर सर्व नेत्यांपेक्षा बरीच चांगली आहे. कॉंग्रेसला देशातील सर्व राज्यांमध्ये स्थान आहे आणि तो पक्ष लोकसभेच्या जागांच्या बाबतीत क्रमांक एक वा दोनवर असेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या इतर एकाही पक्षाची परिस्थिती तशी नाही. त्या सगळ्या पक्षांची मदार असेल ती त्यांचा प्रभाव असलेल्या एकमेव राज्यावर! त्या राज्यातून प्राप्त होणार असलेल्या जागा आणि भाजपा नको म्हणून कॉंग्रेस देणार असलेला पाठिंबा, या बळावरच अशा सर्व पक्षांचे नेते पंतप्रधान पदाची स्वप्ने बघत आहेत. बहुमत नसतानाही कॉंग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर पंतप्रधान पदावर आरुढ झालेले चौधरी चरणसिंग, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर अशी उदाहरणे नजरेसमोर असल्यानेच त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्नं पडत आहेत. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती, चंद्राबाबू नायडू, के. चंद्रशेखर राव, नवीन पटनायक आणि अर्थातच शरद पवार यांचा त्यामध्ये समावेश आहे. ऐनवेळी नितीश कुमार आणि एच. डी. देवेगौडा यांनीही या स्पर्धेत उडी घेतल्यास नवल वाटू नये!
पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत सामील असल्याने ही सर्व मंडळी तशी एकमेकांची स्पर्धकच आहे; मात्र त्यासाठी सर्वप्रथम मोदींना हटविणे गरजेचे असल्याने, आधी एकत्र लढून ते ध्येय साध्य करायचे आणि मग पंतप्रधान पदासाठी आपसात लढाई करायची, असे त्यांनी ठरविल्याचे दिसते. मोदींना हटविण्यासाठीचा लढा एकत्र देण्यावर या मंडळीचे एकमत असले तरी, त्यामध्ये कॉंग्रेसचे स्थान काय असेल, यावरून मात्र त्यांच्यात मतभिन्नता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले नाही तर कॉंग्रेसच्या पाठिंब्याच्या बळावर आपापले घोडे पुढे दामटण्याबाबतही त्यांचे एकमत आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, अशा प्रत्येक नेत्याची राष्ट्रीय पातळीवरील ‘कुमारस्वामी’ होण्याची इच्छा आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदावरील दावेदारीबाबत हे नेते तोंडात मिठाची गुळणी धरून आहेत. कॉंग्रेसला भाजपा किंवा रालोआ सरकार नको असल्यास, त्या पक्षाने संख्याबळाच्या आधारे राहुल गांधी यांचे घोडे न दामटता, गपगुमान आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
ढोबळमानाने, ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे स्थान नगण्य आहे, त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना कॉंग्रेससह सर्व भाजपेतर पक्षांची आघाडी हवी आहे, तर ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस बलवान आहे, त्या राज्यांमधील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या मनात कॉंग्रेस व भाजपेतर आघाडी उभारून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पहिल्या गटात अखिलेश यादव, मायावती, लालू प्रसाद यादव यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या गटात ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू यांचा समावेश करता येईल. शरद पवार मात्र तूर्त दोन्ही तबल्यांवर हात ठेवून आहेत. ते एकीकडे कॉंग्रेसचा समावेश असलेल्या व्यापक विरोधी आघाडीचे गुणगाण करीत आहेत, तर दुसरीकडे कॉंग्रेसद्वारा आयोजित इफ्तार पार्टीमध्ये गैरहजर राहून वेगळाच संदेश देत आहेत. दोन तबल्यांवर हात ठेवण्याची पवारांची ही काही पहिलीच वेळ नाही. किंबहुना त्यांच्या राजकारणाची ती धाटणीच आहे.
पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष २००९ मध्ये कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटक होता, स्वत: पवार केंद्रीय मंत्रिमंडळात होते आणि तरीदेखील त्यांनी त्यावेळी कॉंग्रेसच्या विरोधात असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसह ओडिशातीत एका ‘रॅली’स संबोधित केले होते! त्यापूर्वी त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केल्याने, कॉंग्रेसने निष्कासित केल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली होती आणि लवकरच त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या गळ्यात गळा घातला होता. चार वर्षांपूर्वी केंद्रात भाजपा सरकार सत्तारुढ झाल्याबरोबर पवारांनी मोदींशी गळाभेटी सुरू केल्या होत्या. पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडत असल्याचे दिसताच स्वत:हून मदतीचा हात पुढे केला होता. तेच पवार आज भाजपाच्या विरोधात आवाज बुलंद करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे पवार कोणत्या वेळी कोणती खेळी करतील, हे साक्षात ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. पवारांच्या या इतिहासामुळे त्यांच्या विश्वसनीयतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आले आहे; पण स्वत: पवारांना त्याचे काहीही वाटत नाही.
पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत असलेल्या पवारांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे, की त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राबाहेर काहीही स्थान नाही आणि महाराष्ट्रातही कॉंग्रेसशी आघाडी केल्याशिवाय त्यांच्या पक्षाला बºयापैकी जागा मिळू शकत नाहीत; मात्र तरीही कॉंग्रेसला चुचकारत असतानाच, संभाव्य तिसºया आघाडीची चाचपणी केल्याशिवायही ते राहत नाहीत! ती त्यांची मजबुरी आहे. त्यांना महाराष्ट्रात कॉंग्रेसची गरज आहे, तर पंतप्रधान पदाचे स्वप्न साकारण्यासाठी इतर प्रादेशिक पक्षांची गरज आहे. थोडक्यात, राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थान टिकवून ठेवतानाच, पंतप्रधान पदाचे स्वप्नही बघायचे असल्यामुळे, हातात काठी घेऊन तारेवर चालण्याची कसरत करणे, पवारांसाठी आवश्यकच आहे. सध्या तरी पवारांची ‘मन की बात’ तीच आहे.
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com