विदर्भात यश हवे असल्यास शिवसेनेला सुभेदारी बंद करावी लागेल!
By रवी टाले | Published: September 15, 2018 12:20 PM2018-09-15T12:20:07+5:302018-09-15T12:21:16+5:30
लोकसभा निवडणुकीस अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला तर निवडणुकीची विरोधी पक्षांपेक्षाही जास्त घाई झाल्याचे जाणवत आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत शिवसेनेने निवडणुकीची तयारी जरा जास्तच जोरात सुरू केली असल्याचे दिसत आहे. त्यातही राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पूर्व विदर्भावर शिवसेनेने जास्त लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसते. मे महिन्यात स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर शिवसेनेने पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख म्हणून खासदार गजानन कीर्तीकर यांची नेमणूक केली. त्यांनीही नुकताच पूर्व विदर्भाचा दौरा केला आणि नागपूर व चंद्रपूर येथे कार्यकर्ता मेळावे घेतले. नागपूर येथील मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेस संबोधित करताना कीर्तीकर यांनी शिवसेना विदर्भात लोकसभेच्या किमान चार आणि विधानसभेच्या पंधरा ते वीस जागांवर मुसंडी मारेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी, राजकीय नेत्यांना अशी वक्तव्ये करावीच लागत असतात. कीर्तीकर यांनी त्या हेतूने ते विधान केले असेल तर ठीक आहे; पण शिवसेना नेते खरोखरच विदर्भात एवढ्या भरीव यशाची अपेक्षा करीत असल्यास, त्यांनी आत्मपरीक्षण केलेले बरे!
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने विदर्भात चार जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी तीन पश्चिम विदर्भातील, तर एकच पूर्व विदर्भातील होती. त्या निवडणुकीत शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती होती आणि नरेंद्र मोदींची प्रचंड लाट होती. त्या लाटेचा फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना झाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर सहाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंचवीस वर्षांपासूनच्या भगव्या युतीला तडा गेला आणि शिवसेनेची विदर्भात वाताहत झाली. अवघ्या चारच जागा शिवसेनेला मिळू शकल्या. त्यामध्ये पुन्हा तीन पश्चिम विदर्भातील होत्या, तर अवघी एकच जागा पूर्व विदर्भातील होती. चार जागांवरील विजयात उमेदवारांचा वैयक्तिक वाटा किती आणि पक्षाचा किती, हा प्रश्न आहेच!
या पार्श्वभूमीवर शिवसेना विदर्भात घवघवीत यशाची अपेक्षा कशी करीत आहे, हे कळायला मार्ग नाही. गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील परिस्थिती आणि २०१९ मधील परिस्थिती यामध्ये जमीनआस्मानचा फरक असल्याचे मान्य केले तरी, भाजपावर नाराज झालेला मतदार विदर्भात कॉंग्रेसला सोडून आपल्याला मतदान करेल, अशी अपेक्षा शिवसेना कशाच्या आधारे करीत आहे? शिवसेनेचे विदर्भातील काही खासदार काही दिवसांपूर्वी, युती झाली नाही तर भाजपाची उमेदवारी मिळू शकेल का, याची चाचपणी करीत होते, असे खात्रीलायक वृत्त आहे. युती न झाल्यास आपले काही खरे नाही, याची खात्री असल्याशिवाय त्यांनी अशी चाचपणी नक्कीच केली नसेल. गत काही दिवसातील घडामोडींमुळे भाजपाची स्थिती खराब होत असल्याचे मान्य केले तरी, भाजपाचा तोटा तो शिवसेनेचा लाभ, अशी परिस्थिती किमान विदर्भात तरी नक्कीच नाही.
शिवसेनेच्या या परिस्थितीसाठी शिवसेनेचे केंद्रीय नेतृत्वच खºया अर्थाने कारणीभूत आहे. शिवसेनेने विदर्भातील स्थानिक नेत्यांना कधीच बहरू दिले नाही. शिवसेनेच्या विदर्भातील प्रवेशापासूनच मुंबईकर नेत्यांचे नेतृत्व विदर्भातील शिवसेनेवर लादण्यात आले. हे नेते बदलत गेले; पण त्यांची कार्यशैली सारखीच होती. मोगलाईतील सुभेदारांसारखी त्यांची वर्तणूक असते, असे गाºहाणे शिवसैनिकच नव्हे तर स्थानिक नेतेही खासगीत गातात. वरून लादण्यात आलेल्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर जनाधार असलेल्या नेत्यांपेक्षा हुजºयांनाच अधिक महत्त्व दिले. हे नेते विदर्भात दौºयावर येतात तेव्हा आणि मुंबईतही हुजºयांनाच अधिक भाव मिळतो. त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेकडे आकृष्ट होऊन शिवसेना जवळ केलेल्या सच्च्या शिवसैनिकांचा हळूहळू भ्रमनिरास होत गेला आणि ते शिवसेनेपासून दुरावत गेले. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे शिवसेनेची विदर्भातील दुर्गती! शिवसेनेने नव्वदच्या दशकात कडवी हिंदुत्ववादी भूमिका घेऊन विदर्भात प्रवेश केल्यानंतर, स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यश मिळविले होते. किंबहुना तेव्हा शिवसेना विदर्भात भाजपापेक्षा कांकणभर वरचढच होती. पुढे भाजपात स्थानिक नेतृत्व बहरत गेले अन् शिवसेनेत सुभेदारी! परिणामी शिवसेनेपासून दुरावत गेलेल्या शिवसैनिकांनी हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे भाजपाची कास धरली अन् भाजपाचा वेलू गगनावरी गेला!
खरे म्हटले तर विदर्भातील ग्रामीण भागातील अनेक तरुणांना आजही स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या रोखठोक विचारांचे आकर्षण आहे. शिवसेनेने अशा तरुणांना जवळ केले, संघटनेत स्थान दिले, जबाबदाºया दिल्या, तर शिवसेना आजही विदर्भात मजबूत होऊ शकते; पण हे काम ‘पी हळद अन् हो गोरी’ असे झटपट होण्यासारखे नाही. त्यासाठी विदर्भात जनाधार असलेल्या स्थानिक नेतृत्वास बळ द्यावे लागेल. त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. शिवसेनेच्या केंद्रीय नेतृत्वास स्थानिक नेत्यांसोबत सुभेदारांमार्फत नव्हे तर थेट संपर्क प्रस्थापित करावा लागेल. नव्याने संघटनात्मक बांधणी करावी लागेल. निवडणुकांमध्ये अपयश आले तरी धीर धरावा लागेल आणि संघटना बांधणीचे काम अव्याहत सुरू ठेवावे लागेल. निवडणूक आटोपताच विदर्भाकडे दुर्लक्ष करायचे अन् पुन्हा निवडणूक आली की सुभेदार नेमून यशाची अपेक्षा करायची, हेच धोरण पुढेही सुरू ठेवल्यास मग मात्र काही खरे नाही!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com