सिंधूची वार्षिक कमाई ६० कोटी ! जागर - रविवार विशेष
By वसंत भोसले | Published: September 2, 2018 12:25 AM2018-09-02T00:25:00+5:302018-09-02T00:27:32+5:30
कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते...
वसंत भोसले-
कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते...
पुसरला वेंकटा सिंधू ऊर्फ पी. व्ही. सिंधू! जन्म ५ जुलै १९९५, आताचे वय वर्षे केवळ तेवीस! भारत पेट्रोलियमची वयाच्या अठराव्या वर्षीच अधिकारी आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी-क्लास वन!राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सर्वच स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. त्या बावीस स्पर्धांपैकी दहा जिंकल्या आणि बारामध्ये उपविजेती ठरली. सलग दोन वर्षे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारणारी एकमेव स्पर्धक! आॅलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पदक पटकाविणारी दुसरी महिला खेळाडू. पुसरला वेंकटा सिंधू हिच्याविषयी लिहावे तेवढे कमीच असेल. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या फोर्ब्स मॅगझिनने काही दिवसांपूर्वी जगभरातील सर्वोच्च कमाई करणाऱ्या पहिल्या दहा महिला खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यामध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात कमाई करणाºया दहापैकी आठ महिला खेळाडू टेनिसपटू आहेत. केवळ एकमेव बॅडमिंटनपटू आहे. तिचेच नाव पी. व्ही. सिंधू. दुसरी विना टेनिसवाली आहे, तिचे नाव डॅनिइले पॅट्रीक! अमेरिकेतील ही खेळाडू मोटार रेस चालक आहे. ती नवव्या क्रमांकावर आहे. पी. व्ही. सिंधू सातव्या क्रमांकावर आहे.
सध्या क्रिकेट किंवा इतर खेळापेक्षा फुटबॉल तसेच टेनिसमध्ये अधिक पैसा मिळतो असे म्हणतात. त्यामुळे टेनिस खेळणाºयांची कमाई मोठी आहे. या सर्वांची दरवर्षी यादी तयार करून त्यांच्या कमाईनुसार ग्लोबल मीडिया कंपनीच्या फोर्ब्स मॅगझिनतर्फे नावे जाहीर केली जातात. तेवीस ग्रँडस्लॅम जिंकणारी टेनिससम्राज्ञी सेरेना विल्यम्स हिची कमाई १ कोटी ८५ लाख अमेकिन डॉलर आहे. भारतीय चलनात (रुपयात) ही कमाई १२९ कोटी होते. सातव्या क्रमांकावर असलेल्या पी. व्ही. सिंधू हिची कमाई ८५ लाख अमेरिकन डॉलर आहे. भारतीय चलनात जवळपास ६० कोटी रुपये होते. ही सर्व कमाई २०१७-१८ या एका आर्थिक वर्षातील आहे. हैदराबादच्या सिंधूला तिच्या कमाईपैकी ८० लाख डॉलर्स म्हणजे ५६ कोटी रुपये विविध कंपन्यांनी तिला प्रायोजक म्हणून दिलेले आहेत. उर्वरित चार कोटी रुपये तिला गेल्या वर्षभरात जिंकलेल्या स्पर्धांच्या बक्षिसाद्वारे मिळालेले आहेत. नोकरीचे उत्पन्न तसेच भारतातील सरकारने जाहीर केलेली बक्षिसांची रक्कम आणखीन भर टाकते. नोकियासह पाच बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपन्या सध्या तिला प्रायोजित करीत आहेत.
वयाच्या आठव्या वर्षी तिने हातात बॅडमिंटनचे रॅकेट घेतले. वास्तविक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटूंची कन्या आहे. १९८६ मध्ये दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय व्हॉलिबॉल संघाने रौप्यपदक जिंकले होते. त्या संघात सिंधू हिचे वडील पी. व्ही. रामण्णा खेळत होते. त्यांच्या या यशाद्दल भारत सरकारने २००० मध्ये अर्जुन अॅवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला होता. तिची आई पी. विजया यादेखील राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू होत्या. त्यांचे मैदानावरील ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर विवाह बंधनात झाले. त्यांची ही दोन नंबरची कन्या. मोठी बहीण पी. व्ही. दिव्या हीदेखील हॅण्डबॉलपटू आहे. तिने राष्ट्रीय स्पर्धेत आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
मात्र, पुढे तिने मार्ग बदलला आणि व्यावसायिक खेळाडू होण्याऐवजी डॉक्टर बनली. पी. व्ही. सिंधू हिने २०१६ च्या आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठली तेव्हा सारा देश पाहात होता. स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याकडून पराभव झाला तेव्हा सारा देश हळहळला होता. या स्पर्धेत पहिला गेम सिंधूने जिंकला होता. तेव्हा आॅलिम्पिक इतिहासात भारताचे नाव कांही मिनिटात सुवर्ण अक्षराने लिहिले जाणार असे वाटत होते, पण तो क्षण आला नाही. अत्यंत आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या कॅरोलिना मारिन हिने पुढील दोन्ही गेम घेतले आणि सिंधूचे स्वप्न भंगले. २०१७ च्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद या लढतीपेक्षा स्पर्धेत आणि कदाचित तशी लढत पुन्हा होईल की नाही, याची कल्पना नाही, अशी लढत ती झाली होती.
जपानची नोझोमी ओकुहारा हिच्याशी ती लढत झाली आणि साºया जगाने पाहिली. भारतीय प्रेक्षकांच्या अपेक्षा होत्या की, पी. व्ही. सिंधू जग्गजेती व्हावी. मात्र, नशिबातच नव्हते, असे वाटते. या लढतीतही सिंधू पहिला गेम १९-२० असा हरली होती. दुसरा गेम २२-२० गुणांनी जिंकला. बरोबरी साधली. तिसरा गेम २०-२० अशी बरोबरी झाली. आता केवळ सलग दोन पॉर्इंट जिंकून जग्गजेती होण्याचा क्षण बाकी होता. मात्र, हा गेम नोझोमी ओकुहारा हिने २२-२० असा जिंकला. पहिल्यांदाच जागतिक अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत
धडक मारलेल्या सिंधूला पराभवास सामोरे जावे लागले. या सामान्यात तीन गेममध्ये सिंधूला एकूण ६१ गुण मिळाले होते आणि ओकुहारा हिला ६३ गुण मिळाले होते. तिसºया गेममध्ये २०-२० बरोबरी साधणाºया या दोघींना केवळ दोन पॉर्इंटसाठी लढायचे होते. मात्र ते सलग घ्यावे लागणार होते. ते ओकुहारा हिने घेतले. तसा सामना पुन्हा होईल, असे वाटत नाही. पी. व्ही. सिंधू हिच्या पुढील सात आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामन्याची आकडेवारी पाहिली तर तो सामना न भूतो न भविष्यति असाच होता.
सिकंदराबाद येथे रेल्वे खात्याच्या अभियांत्रिकी संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टवर सिंधू हिने मेहबूबअली यांच्याकडून प्रारंभी धडे घेतले. याच वेळी पुल्लेला गोपीचंद ऊर्फ पी. गोपीचंद हाआंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत गाजत होता. त्यांनी पुढे प्रशिक्षण संस्था स्थापन केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यासाठी ती दाखल झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेची अकरा विजेतेपदे आणि
बारा उपविजेतेपदे जिंकणारी सिंधू येथेच घडली. वयाच्या अठराव्या वर्षीच यशाने ती चमकत राहिली आणि भारत पेट्रोलियमने तिला सहाय्यक क्रीडा अधिकारी म्हणून नोकरी दिली. विसाव्या वर्षी अर्जुन अॅवॉर्ड आणि गतवर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाली.
काळी-सावळी दिसणारी, साधीभोळी पी. व्ही. सिंधू हिचा हा प्रवास थक्क करणारा आहे. फोर्ब्स मॅगझिनने जागतिक पातळीवर यादी जाहीर केली. त्यात दोनच टेनिस न खेळणाºया इतर खेळाडू महिला होत्या. त्यांची कमाई पाहिली तर आपल्याकडील तरुणवर्गाला आव्हानच ठरू शकते. हिच्या या यशात आई-वडिलांबरोबरच पी. गोपीचंद यांचा मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी धडपडणाºया या प्रशिक्षकाची कथाच वेगळी आहे. त्यांनी बॅडमिंटनपटू म्हणून नाव कमावले. पैसा कमावला. त्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांनी त्या खेळासाठी योगदान दिले.
आपण आजच्या तरुणाईकडे पाहिले तर वाटते की, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव, प्रसिद्धी, पैसा, प्रतिष्ठा कमावण्यासाठी किती मोठी संधी आहे. त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी असते. ती आपण घेण्यासाठी सातत्य ठेवत नाही. आजचा काळ बदलतो आहे. ठिकठिकाणी क्रीडांगणे होत आहेत, हॉल होत आहेत. तलाव बांधले जात आहेत. सोयीसुविधा निर्माण होण्याची गति आजही कमी असली तरी त्या मिळविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अॅथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात साधने कमी पण कष्ट अधिक लागतात.
सर्व क्रीडा प्रकारात मुलांबरोबरच मुलीही प्रयत्नशील आहेत. कोल्हापूरची रेश्मा माने, मुरगूडची स्वाती शिंदे, राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, सांगलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मानधना अशी अनेक नावे घेता येतील. या मुली सध्या चमकत आहेत. साताºयाची अॅथलेट ललिता बाबर हिने
आॅलिम्पिक गाजविले आहे. अशा अनेक मुली मैदाने गाजवित आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात कुस्ती, अॅथलेटिक्स, नेमबाजी आदी क्रीडा प्रकारात त्या नाव कमावत आहेत. विशेषत: कुस्तीपटू म्हणून नियमित सराव करून जागतिक पातळीवर जाण्याचे स्वप्न त्या पाहात आहेत. आपल्यात महावीर फोगटसारखे माता-पिता पुढे येत आहेत. रेश्मा माने हिचे वडील अनिल माने सावलीप्रमाणे मुलीला पाठबळ देत आहेत. राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत हिला कोल्हापूरकरांची नेहमीच साथ राहिली आहे. अलीकडेच एक आश्चर्यकारक बाब समजली. सांगली जिल्ह्यातील विटाजवळ लेंगरे गावच्या पूर्वेला असलेल्या जोंधळेवाडीत केवळ मुलींसाठी तालीम सुरू केली आहे. ‘लोकमत’च्या विटा कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या कुस्तीगीर मुली प्रशिक्षक वस्ताद संजय अवघडे यांच्यासह आल्या होत्या. त्या तालमीत एकूण पंचवीस मुली दररोज पहाटे आणि सायंकाळी जमतात आणि नेटाने, कष्टाने कुस्तीचा सराव करतात. त्यापैकी एकटीने राष्ट्रीय स्पर्धेतपर्यंत, तर सहाजणींनी राज्यपातळीवरील स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.
कोल्हापूर आणि सांगली या कृष्णा नदीच्या खोºयात मातीतील खेळ खेळण्याची रग आहेच. अनेक नामवंत कुस्तीपटूंनी देश गाजविला आहे. काही क्रिकेटपटूही तयार झाले. सध्या ‘लोकमत’च्या रविवारच्या अंकात हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांची ‘लालमाती’ या सदराखाली जीवन कहाणी सुरू आहे. जेमतेम साधन सुविधांसह कसेबसे राहात,
खात, व्यायाम करीत महान कुस्तीपटू झाले. कुस्तीच्या क्षेत्रातील सर्वोच्च हिंदकेसरी हा बहुमान पटकाविला. त्यांची ती कहाणी वाचत गेलो, तर काळ किती मागे राहिला असे वाटते. मात्र, अद्यापही अनेक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार क्रीडांगणांची वानवा आहे. आपल्याकडे पी. गोपीचंद का नाहीत? कोल्हापूर, सांगली किंवा साताऱ्यात सर्व सोयीयुक्त खेळांची मैदाने का नाहीत? हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची स्मृती जागविण्यासाठी कोल्हापुरात हॉकी स्टेडियम बांधले, पण त्यावर टर्फ नाही. केवळ मोकळ्या मैदानाचा काय उपयोग? कोल्हापूरला दहा वर्षे विभागीय क्रीडासंकुल उभे राहते आहे, त्याठिकाणी बांधलेल्या जलतरण तलावाची दुर्दैवी कहाणी ऐकली तर पी. व्ही. सिंधूसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याकडे आपण किती दुर्लक्ष करतो आहोत, हे लक्षात येते.
पी. व्ही. सिंधू हिचे यश पाहिले तर जग दूर नाही. ते जिंकता येते असे वाटते. आज मुलांपेक्षा अधिक चांगली कामगिरी मुली करून दाखवित आहेत, त्याच उद्याचा नवा भारत घडविणार असे वाटते.