सोनवडेचा घाट---इचलकरंजीची रेल्वे ; कऱ्हाडचे विमानतळ जागर - रविवार विशेष
By वसंत भोसले | Published: September 9, 2018 12:29 AM2018-09-09T00:29:51+5:302018-09-09T00:44:49+5:30
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही.....
वसंत भोसले-
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कऱ्हाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही.....
जागर सदरात सोनवडेच्या घाटाची गरज काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा काही मंडळींनी विकासाला विरोध करणारा माणूस म्हणून एकेरीत माझा उद्धार केला. हे सर्व समाजमाध्यमांत (सोशल मीडिया) झाले होते. प्रत्यक्ष युक्तिवाद करणारा लेख लिहिला असता तर माझे म्हणणे खोडून काढणारा म्हणून तो त्याच पानावर प्रसिद्ध केला असता. लोकशाहीत निकोप सुसंवाद करण्याची जबाबदारी सर्वांची आहे आणि ती लोकशाही विकासाची दिशा आणि मार्ग यासाठी आवश्यकही आहे. आमचाच हट्ट तरी कशासाठी? आणि एकेरी भाषेत उल्लेख केल्याचे दु:ख तर अजिबात नाही.
विकासाच्या कामांची दिशा योग्य असावी, रस्ते, रेल्वे, धरणे, शिक्षण संस्था, आधुनिक बाजारपेठा, औद्योगिक वसाहती झाल्याच पाहिजेत. उलट त्या अधिक गतीने केल्या पाहिजेत, या मताचे समर्थन करणारा मी आहे. यासाठी योग्य दिशा पकडली पाहिजे. अस्मितेचे, जातीयतेचे, आदी मुद्दे बाजूला ठेवून सर्वांगीण विकासासाठीची भूमिका व्यापक केली पाहिजे, असे मत आहे. शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली. एकविसावे शतक उजाडून दोन दशकांची वाटचालही आता पूर्ण होत आली आहे. या वळणावर अनेक प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे. ग्रामीण आणि शहरी भेदभावही कमी झाला आहे. आपल्या प्रसारमाध्यमांनी ती क्रांती केली आहे.
गावातला तरुण मोबाईलवरून देशातील धावणारी कोणतीही रेल्वे पकडण्यासाठी बुकिंग करू लागला आहे. विमानाचे बुकिंगही करतो आहे. एसटीचेही बुकिंग आता आपल्या खिशातील मोबाईलवरून होत आहे. काळ खूप बदलला आहे. माणसांच्या अपेक्षा, आकांक्षा, परीघ खूपच बदलून गेला आहे.
या पार्श्वभूमीवरही आपल्या आजूबाजूचे मूलभूत प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. ते सोडविण्याची गती वाढवावी लागणार आहे. त्यासाठीचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागणार आहे. अनावश्यक कामे हाती घेण्याची गरज नाही. आपल्या इतिहासातील युगकर्त्यांनी अनेक आदर्श कामे करून ठेवली आहेत. त्यांचा विस्तार करण्याची गरज आहे. जयसिंगपूर गाव बाजारपेठ म्हणून वसविण्यात आले, ती दूरदृष्टी आपण पकडून आपल्या परिसरातील मालासाठी बाजारपेठ विकसित करावी लागणार आहे. शिवाय आपणासही उत्तम बाजारपेठ हवी, ज्या बाजारपेठेत जाऊन दर्जेदार माल घेता येईल. अन्यथा दिवसभर सांगली-कोल्हापूर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांनी उडविलेला धुरळा खात बसलेल्या फळ व्यापाºयाकडील धुळीने माखलेली फळेच खरेदी करायची का?
हे सर्व प्रश्न उपस्थित करण्याचे कारण की, कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात जाण्यासाठी सात घाटरस्ते असताना भुदरगड तालुक्यातून गारगोटीमार्गे कोकणात जाण्यासाठी सोनवडे घाटाची गरज नाही. त्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्चण्याची आणि शंभर हेक्टर जंगल तोडण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी या पैशातून भुदरगड तालुक्यातील सर्व रस्ते दर्जेदार करता येतील. पाटगाव धरणाचे पाणी सर्वांना देण्याचे नियोजन करता येईल, कोकणात जाण्यासाठी आंबोली आणि फोंडा घाटाशी उत्तम रस्त्याने जोडून घेता येईल, एवढीच ती भूमिका होती. पुणे जिल्ह्यातून मुंबईसह कोकणाला जाण्यासाठी केवळ तीनच घाट आहेत (लोणावळा, भोर आणि ताम्हीणी), नाशिक जिल्ह्यातून दोनच (कसारा आणि डहाणू मार्ग), साताºयातून दोन (आंबेवाडी घाट आणि कुंभार्ली) आहेत. नगर जिल्ह्यातून एकच माळशेत घाट आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातून आठकव्या घाटाची गरज नाही, असे मत मांडले होते. (ते चुकीचे असेल तर खोडता येईल.)
सोनवडेच्या घाटाप्रमाणेच इचलकरंजीला रेल्वेगाडी घेऊन जाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोल्हापूर-मिरज मार्गावर हातकणंगले रेल्वे स्थानकावरून केवळ आठ-दहा किलोमीटरवर इचलकरंजी शहर आहे. त्या शहराचा परिसर वेगाने वाढतो आहे. कबनूर, शहापूर, तारदाळ, चंदूर, आदींसह उद्या ती महापालिका होऊ शकते. तेव्हा महापालिकेच्या हद्दीपासून दोन-चार किलोमीटरवर हातकणंगलेचे रेल्वेस्थानक असणार आहे. ही रेल्वेलाईन राजर्षी शाहू महाराज यांनी टाकली. त्याला आता एकशे अकरा वर्षे पूर्ण झाली. दोन-तीन पिढ्यांनी तिची सेवा घेतली आहे. अनेक पिढ्या घेत राहतील. याचा अर्थ अशी कामे वर्षानुवर्षे उपयोगी ठरणारी असतात. त्यामुळे पुढील पन्नास-शंभर वर्षांचा विचार करून अशा कामांचे नियोजन करायला हवे असते. शंभर वर्षांपूर्वीची रेल्वेची गती, गरज आणि आजचा वेग यात खूप अंतर आहे. कोल्हापूरहून निघालेली रेल्वे मिरजेत पोहोचण्यास सहा-सात तास घेत असे, ही गती होती. ती आता वाढली आहे. लोकसंख्या वाढली आहे. मिरज जंक्शनवरून दररोज साठ गाड्यांची ये-जा आहे. ही सर्व गरज ओळखून इचलकरंजी शहरासाठी हातकणंगलेचे रेल्वेस्थानक विकसित करता येऊ शकते. त्याच्या शेजारीच गुड ट्रेनसाठी यार्ड उभे करता येऊ शकते. यासाठी दोनशे कोटी रुपये लागणार नाहीत. इचलकरंजीला दहा किलोमीटरसाठी प्रतिकिलोमीटर वीस कोटीप्रमाणे खर्च करण्याची गरज भासणार नाही. शिवाय पिकाऊ जमीन वाया जाणार नाही. आपण अनेक वर्षे कोट्यवधी रुपये खर्ची करून एक-एक एकर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी जंग-जंग पछाडतो आहोत. अशा पार्श्वभूमीवर ओलिताखालील जमीन गरज नसताना रेल्वेमार्ग अंथरूण बिगरशेती वापरासाठी द्यायची का? एवढाच प्रश्न आहे.
याउलट हातकणंगलेत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठीचे गुड यार्ड उभे करता येईल. आपल्याकडून मुख्यत: साखर निर्यात होते. ती कोल्हापूरऐवजी हातकणंगलेतून पाठविता येऊ शकते. सिमेंटसह जो माल बाहेरून येतो, तो तेथे उतरून घेऊन जिल्ह्यात पाठविता येऊ शकतो. कोल्हापूरला शंभराहून अधिक वर्षे रेल्वे येऊन थांबली आहे. ती पुढे जात नाही. तिला परत जावे लागते. कोल्हापूर कोकणाशी जोडण्याची गरज आहे. शिवाय कोकण रेल्वेशी जोडल्यास कोकण, गोवा, दक्षिण भारताची संपूर्ण किनारपट्टी जोडली जाऊ शकते. रत्नागिरीजवळ जयगडला चार हजार कोटी रुपये खर्च करून बंदर विकसित केले आहे. त्याला जोडता येईल. अन्यथा आपणास रायगड जिल्ह्यातील उरणला जवाहरलाल नेहरू बंदरला (जेएनपीटी) जावे लागते. सोनवडे घाटाची गरज नाही, म्हणून करू नये म्हणत आलो आहोत. कोकण रेल्वे हवी तर ती करावी, असेही सांगत आहोत. मात्र, इचलकरंजीला रेल्वे घेऊन जाण्याचा अट्टाहास चुकीचा आहे.
हे दोन गंभीर प्रश्न गाजत असतानाच गेल्या सात वर्षांपासून कऱ्हाड शहराच्या पश्चिमेस पाटण रस्त्यालगत असलेले विमानतळ विकसित करण्याचा घाट घातला आहे. ते विकसित करण्यासाठी जमीन हवी आहे. १९६२ ला झालेल्या कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या सिंचनाखालील जमिनी यासाठी काढून घेण्याचे ठरते आहे.
विमानतळांची गरज आहे की नाही, जरूर आहे. पण गावोगावी, शहरोशहरी नको आहेत. दक्षिण महाराष्ट्रासाठी (कोल्हापूर, सांगली, मिरज, जयसिंगपूर, इस्लामपूर, इचलकरंजी, कºहाड, आदी परिसरासाठी) कोल्हापूरचे एकच विमानतळ पूर्णत: विकसित करावे. ते विमानतळ छत्रपती राजाराम महाराज यांनी १९३९ मध्ये निर्माण केले. त्यावर्षी पहिले विमान उतरले होते. आजही दररोज विमान ये-जा करण्याची सोय होत नाही. रात्री उतरविता येत नाही. कोल्हापूरचे विमानतळ पुणे-बंगलोर महामार्गाला लागून आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यांसाठी सोयीचे आहे. ते एक विकसित करा, पुढील पंधरा-वीस वर्षे दुसºया विमानतळाची गरज भासणार नाही. मुंबई, बंगलोर किंवा पुणे, नवी दिल्ली, आदी महानगरांतील विमानतळांवरून इच्छित स्थळी जाण्यासाठी तास-दोन तास लागतात. कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराज विमानतळावरून एका तासात बेळगाव, सांगली, मिरज, इचलकरंजी, कºहाड, इस्लामपूर, आदी ठिकाणी जाता येते. शेकडो कोटी रुपये खर्च करून कऱ्हाड आणि कोल्हापूर येथे दोन्हीकडे अर्धवट विमानतळे उभारण्याऐवजी एकच परिपूर्ण करू या! एवढीच माफक अपेक्षा आहे.
सोनवडेचा घाट, इचलकरंजीची रेल्वे आणि कºहाडचे विमानतळ हे प्रकल्प सध्यातरी अनावश्यक आहेत. पुढे त्यांची गरज निर्माण होईल, असे वाटतही नाही. सध्याचे रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकसित झाले तर नव्यांची गरजही राहणार नाही. यासाठी ती भूमिका मांडली होती. हे तातडीचे प्रकल्प नाहीत. याशिवाय अनेक वर्षे रखडलेले आणि त्यातून हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न वाढविणारे प्रकल्प होत नाहीत, यावर कोणी आग्रहाने बोलत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सहा धरण प्रकल्प रखडले आहेत. त्याद्वारे सुमारे दहा हजार एकर जमिनीला पाण्याची सोय होणार आहे. त्यातून दरवर्षी किमान एक हजार कोटी रुपयांचे शेतीचे उत्पादन वाढणार आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ आणि ताकारी उपसा योजना अनेक वर्षे पूर्ण होत नाहीत. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी टेंभू योजना अपूर्ण आहे. या योजना मूळ आराखड्यानुसार पूर्ण झाल्या तर आणखीन जवळपास पन्नास हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
या योजनांसाठी धरणे आहेत, धरणांत पाणी आहे. उपसा करण्यासाठी वीजदेखील आहे. उत्तम शेती आहे, ती निचऱ्याचीही आहे. या योजनेद्वारे ज्या भागात पाणी आले, तेथे क्रांतिकारक बदल झाले आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाले तर किमान २५ हजार कोटी रुपयांचे उत्पादन वाढू शकेल. ते करण्यासाठी एकवेळची दोन-तीन हजार कोटींची गुंतवणूक करावी लागेल. ती एका वर्षात परतफेड करणारी ठरेल.
विकासाची गती पकडताना तो विकास कोणत्या दिशेने जावा, याची स्पष्टता हवी. यावर चर्चा होऊ शकते. शिव्याशाप देऊन प्रश्न सुटणार असतील तर तेच करू या!