स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 09:41 AM2018-05-05T09:41:18+5:302018-05-05T09:41:18+5:30
हिरा जसा कोंदणात शोभून दिसतो, तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात शोभून दिसतात.
-मुकेश माचकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत.
हिरा जसा कोंदणात शोभून दिसतो, तसे मोदी प्रचारात शोभून दिसतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे पैलू प्रचारकाच्या भूमिकेत जणू झळाळून निघतात...
...ते धडधडीत खोटं बोलतात.
आपण बोलतोय त्यात आणि करतोय त्यात किती प्रचंड विसंगती आहे, याचं भान न ठेवता विधिनिषेधशून्य पद्धतीने रेटून बोलतात.
व्यक्तिगत पातळीवरचे हिंस्त्र हल्ले चढवतात...
...गंमत म्हणजे त्यांचा पक्ष आणि त्यांचा परिवार हा भारतीय संस्कृतीच्या उच्च परंपरांचे गोडवे गात असतो, धर्म-अधर्माची उठाठेव करत असतो, संस्कारांच्या बाता मारत असतो; त्या सगळ्या थोर गोष्टी त्यांनी एरवी तर गुंडाळलेल्या आहेतच, पण त्या प्रच्छन्नपणे गुंडाळून ठेवून प्रचाराचा स्तर दिवसेंदिवस घसरवत नेणारे स्टार प्रचारक पंतप्रधान हे त्यांचं निवडणुकीतलं प्रमुख अस्त्र असतं, याहून मोठी शोकांतिका नसावी.
मुळात मोदी यांना कोणी ‘भाजपचे पंतप्रधान’ म्हटलं की त्यांची भक्तमंडळी अंगावर धावून येतात, ते देशाचे पंतप्रधान आहेत, याची आठवण करून देतात. ही आठवण खुद्द मोदींना आहे का? ते दिवसाचे किती तास काम करतात, याची कौतुकं याच भक्तपरिवारात सांगितली जातात; जणू बाकीचे पंतप्रधान रिकाम्या वेळात पंतप्रधान कार्यालयाच्या छतावर पतंग उडवायलाच जात होते! त्यांच्या या अतिशय व्यग्र अशा कार्यकाळात त्यांनी त्यांच्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून किती काळ खर्च केला आहे, याचा हिशोब काढल्यावर काय चित्र समोर येतं? भाजप महापालिकेच्या निवडणुकीत हरला तरी तो मोदींचा पराभव असतो, असं भाजपेयी छद्मीपणे म्हणतात; भाजपने ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली तरी तो मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास असतो, त्याही निवडणुकीत त्यांनी एखादं भाषण ठोकलेलं असूच शकतं, तर मग हरल्यावर अपश्रेय कुणाचं? आपल्या पक्षाच्या प्रचाराला वाहून घेतलेले दुसरे पंतप्रधान देशाने आधी कधीच पाहिले नसतील. ज्या पदावरून राष्ट्रीय पातळीवरून आणि पक्षनिरपेक्ष भूमिकेतून कामकाज केलं जाणं अपेक्षित आहे, त्या पदावरून पंतप्रधान परदेशात जाऊन देशातल्या पूर्वसुरींची आणि पर्यायाने देशाची बदनामी करतात आणि देश विरोधकमुक्त करण्याची भाषा करतात.
कर्नाटकातल्या निवडणूक प्रचारात मोदी उतरले आणि प्रचाराची धुळवड व्हायला सुरुवात झाली. या निवडणुकीत अवघ्या आठवड्याभराच्या अवधीत पंतप्रधानांनी स्टार प्रचारकाचं सगळं विविध गुणदर्शन करून झालेलं आहे.
सुरुवात झाली राहुल गांधींच्या ’१५ मिनिटं संसदेत आमच्यासमोर बसून दाखवा,’ या विधानावर प्रतिक्रिया देताना मोदींनी त्यांना ’१५ मिनिटं हातात कागदाचा तुकडा न घेता कोणत्याही भाषेत, हवं तर आपल्या आईच्या मातृभाषेत बोलून दाखवावं,’ असे उद्गार काढले. मोदी संसदेकडे दुर्लक्ष करतात, संसदेत फक्त भाषणं ठोकायला येतात, या चर्चेच्या अनुषंगाने राहुल यांनी हे आव्हान दिलं होतं. त्यावर मोदींनी, जणू फर्डी भाषणबाजी हा नेतृत्वाचा एकमात्र गुण असल्याच्या थाटात, राहुल यांच्यावर हल्ला चढवला. तोही ‘अरे ला का रे’ म्हणून ठीक आहे. पण, ‘हवं तर आपल्या आईच्या मातृभाषेत’ बोलून दाखवा, हा खास कमरेखालचा वार होता. सोनिया गांधी यांच्या इटालियन मुळाची त्यांना नसेल, इतकी आठवण मोदी आणि त्यांच्या परिवाराला असते. सोनिया या कशा मायनो आहेत, त्या कशा बार वेट्रेस होत्या, त्यांनी राहुल आणि प्रियांका यांना ख्रिस्ती बनवलंय, त्यांनी खूप काळ इटालियन नागरिकत्व अबाधित ठेवलं होतं, वगैरे गोष्टींची सरमिसळ भेळ व्हॉट्सअॅप फॉरवर्डच्या पुड्यांमधून देशभर वाटली जात असते. मोदींनी सत्ताग्रहण करताच हे मायलेक तुरुंगात डांबले जाणार किंवा त्या भयाने इटलीला कायमचे पळून जाणार, असल्या हास्यास्पद गोष्टीही प्रचारात आल्या होत्या. पण, ‘सोनिया मायनो’ काही इटलीला गेल्या नाहीत आणि ‘रौल गांधी-खान-मायनो’ही इथेच ठाण मांडून बसलेले आहेत, याने संस्कारी पक्षाचं पित्त खवळलं आहे. त्यातून सोनियांच्या मातृभाषेचा उद्धार होत असावा. ज्या पंतप्रधानांचा जीव गुजरातच्या पोपटात कायम अडकलेला असतो, ज्यांना भारतातल्या भारतात आपल्या राज्याचा आणि भाषक ओळखीचा विसर पाडता येत नाही, त्यांनी सोनियांच्या मातृभाषेची उठाठेव करावी, हे आश्चर्यकारक नाही, कारण मोदींना असला विधिनिषेधच मुळात मान्य नाही. नालंदा कुठे आहे, याचा आपल्याला पत्ता नसताना ते राहुल गांधींना विश्वेश्वरय्यांच्या नावाचा उच्चार करता येत नाही, यावर बाण सोडत असतात.
कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार, असं सगळ्या जनमत चाचण्या सांगताहेत. आपलीच सत्ता येणार, असं मोदी कितीही छाती ठोकून सांगत असले, तरी त्यांनाही इतरांच्या आधाराची गरज लागू शकेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच त्यांनी एका सभेत एच. डी. देवेगौडा यांचा राहुल गांधींनी कसा अपमान केला, यावर जोर दिला. देवेगौडा दिल्लीत आले होते, तेव्हा आपण कसं त्यांना सन्मानाने भेटलो, सोडायला गाडीपर्यंत गेलो, वगैरेही त्यांनी रंगवून सांगितलं. आपल्या पक्षाचे भीष्म पितामह आणि ज्यांनी लावलेल्या आगीवरच आपण पोळ्या भाजतो आहोत ते लोहपुरुष क्र. २ लालकृष्ण अडवाणी यांना त्रिपुरातल्या सभेत आपण कशी कस्पटालाही दिली जाणार नाही इतकी हलकी वागणूक दिली, हे मोदी किती सहजपणे विसरले! ज्येष्ठांना मानही सोयीनुसारच द्यायचा असतो, हाच त्यांच्यावरचा संस्कार असावा. गंमत म्हणजे, देवेगौडा यांचा सन्मान केल्याच्या भावभीन्या आठवणी सांगून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी देवेगौडांचा पक्ष ही काँग्रेसची बी टीम आहे, तिला मतं देऊ नका, असं सांगून त्यांनी देवेगौडांच्या सन्मानावर बोळाही फिरवून दाखवला.
पंडित नेहरू हे मोदींचं मर्मस्थान. त्यांना नेहरूगंडाने पछाडलेलं आहे. नेहरू हे आजवरचे भारताचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असतील, तर आपण त्यांच्यापेक्षाही लोकप्रिय बनून दाखवलं पाहिजे, अशी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. ती गैर नाही. नेहरूंकडे किंवा नेहरू घराण्याकडे देशाचा पत्कर नाही. पण, नेहरूंची रेष लहान करण्यासाठी आपली रेष मोठी करायला हवी. नेहरूंच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विचार करता, ते मोदींकडून होण्याची शक्यता दुरापास्तच. मग नेहरूंचीच रेघ कमी करायची, हा त्यांचा प्रयत्न असतो. कर्नाटकातही त्यांनी हा प्रयोग केलाच. कर्नाटक हा शूरांचा प्रदेश (हेच ते महाराष्ट्रात, गुजरातेत, राजस्थानात आणि गोव्यातही म्हणालेले असू शकतात- आपण शूर आहोत, असं कोणाला वाटत नाही?). कर्नाटकाच्या वीरांना काँग्रेसने कशी वागणूक दिली, याची कथा सांगताना मोदी म्हणाले की १९४८ साली पाकिस्तानच्या पराभवानंतर पंतप्रधान नेहरू आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी जनरल थिमय्या यांचा अपमान केला.
यावर योगेंद्र यादवांनी ट्वीट करून सांगितलं की साहेब, कृष्ण मेनन हे एप्रिल १९५७ ते ऑक्टोबर १९६२ या काळात देशाचे संरक्षणमंत्री होते. जनरल थिमय्याही मे १९५७ ते मे १९६१ या काळात लष्करप्रमुख होते. १९४७ ते १९५२ या काळात थिमय्या इंग्लंडमध्ये होते. साडे तीन हजार कोटी आपल्या जाहिरातबाजीवर खर्च करणाऱ्या केंद्र सरकारला पंतप्रधानांची भाषणं तपासून देण्यासाठी (खासकरून त्यातले दावे तपासून देण्यासाठी) एखादा माणूस नेमणं इतकं कठीण आहे का?
मोदींनी विधिनिषेधशून्यतेचा षटकार मारला तो बळ्ळारीत. खाणमाफिया म्हणून कुख्यात असलेल्या रेड्डी बंधूंपैकी एकाला त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ‘न खाऊँगा, न खाने दूँगा’ वगैरे वल्गना करणाऱ्या नेत्याच्या सदाशुचिर्भूत पक्षाला हे शोभतं का, अशी टीका होत असताना मोदींनी त्या मतदारसंघात सभा घेऊन त्यात सिद्धरामय्या सरकारच्या भ्रष्टाचारावर टीका करावी, हा एक भारीच विनोद. तोही त्यांनी त्यांच्या पालुपद-जुळवाजुळवीच्या आवडत्या खेळातून, सिद्धरामय्यांना ‘सीधा रुपय्या’ वगैरे संबोधून जुळवून आणला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देताय तो येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली आणि रेड्डीसारखे उमेदवार घेऊन? हा प्रश्न पुढे कोणी विचारूच नये, म्हणून त्यांनी सीबीआयला रेड्डींवरचे गुन्हेच काढून टाकायला लावले. तिकडे उत्तर प्रदेशात जसे अजयसिंह बिश्त ऊर्फ आदित्यनाथ या मुख्यमंत्र्याने जसे राजकीय कार्यकर्त्यांवरचे गुन्हेच काढून टाकून (यात गंभीर स्वरूपाचेही गुन्हे आले) राज्याला गुन्हेगारीमुक्त केलं, त्यातलाच हा प्रकार.
...कधीकाळी महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती ताजी असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे युतीचे स्टार प्रचारक होते. प्रमोद महाजन नावाचा एक तरुण-तडफदार नेता युतीचा शिल्पकारही होता आणि भाजपचा फर्डा वक्ताही होता. तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या खास ठाकरी भाषेचे प्रयोग राज्यभर चालवले होते. तेव्हा महाजनांच्या संस्कारी पक्षाला हे कसं चालतं, असा प्रश्न पत्रकारांनी केला होता. त्यावर खासगीत हे नेते ‘सभेत गर्दी जमवायला आम्हाला एक अमिताभ बच्चन हवा असतो. गर्दी बाळासाहेबांना ऐकायला येते आणि महाजनांना लक्षात ठेवून जाते,’ असं सांगायचे. त्यावर बाळासाहेबांनी बरीच आगपाखड केली होती.
...या संस्कारी परिवाराला तेव्हापासून आतापर्यंत अनेकदा सत्ता उपभोगल्यानंतर, देशावर राज्य करून झाल्यानंतरही देशात सोडा, आपल्या पक्षातही सभ्यतेचा संस्कार रुजवता आला नाही? त्यांना अजूनही अशाच उत्तरोत्तर घसरत जाणाऱ्या ‘स्टार प्रचारका’ची गरज भासावी, ही केवढी मोठी शोकांतिका आहे... खासकरून स्टार प्रचारकाने जमवलेल्या गर्दीसमोर सुसंस्कृत, मुद्देसूद आणि सभ्य भाषण करून तिची मनं जिंकून घेणारा कोणीही नेता उरलेला नसताना!