स्पर्शज्ञानापासून सुरुवात करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:17 AM2018-01-14T03:17:28+5:302018-01-14T03:17:42+5:30
एका चार वर्षांच्या लहानग्याला त्याचे बाबा अवयवाची ओळख करून देतात. याला काय म्हणतात ‘डोळे’... ‘नाक’... ‘पोट’ आणि ‘पाय’. या सगळ्या प्रक्रियेत कुठेच जननेंद्रियाचा उल्लेखही नसतो. अशा वेळेस शरीरातील महत्त्वाच्या अवयवाविषयी जाणून घेण्यासाठी चिमुरडी पिढी दुर्लक्षित राहते.
- डॉ. राजन भोसले
एका चार वर्षांच्या लहानग्याला त्याचे बाबा अवयवाची ओळख करून देतात. याला काय म्हणतात ‘डोळे’... ‘नाक’... ‘पोट’ आणि ‘पाय’. या सगळ्या प्रक्रियेत कुठेच जननेंद्रियाचा उल्लेखही नसतो. अशा वेळेस शरीरातील महत्त्वाच्या अवयवाविषयी जाणून घेण्यासाठी चिमुरडी पिढी दुर्लक्षित राहते. बरेचदा याचे नकारात्मक परिणाम लहानग्यांवर होणाºया अत्याचारांतून प्रतिबिंबित होत असतात. त्यामुळे आता तरी याची गरज ओळखून लहानग्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजेत, याची पहिली पायरी म्हणून चांगला आणि वाईट स्पर्श शिकविला पाहिजे.
लैंगिक शिक्षण म्हणजे काय?
लैंगिक आणि नातेसंबधांचे शिक्षण हे शाळेतील अभ्यासक्रमात समाविष्ट केले गेले आहे. शाळेत मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार संभोग, लैंगिकता, भावना, नातेसंबंध व लैंगिक आरोग्याविषयी शिकवले जाते. यामध्ये मूल्य, दृष्टिकोन, वैयक्तिक व सामाजिक कौशल्ये, सामान्यज्ञान आणि समजूतदारपणा यांचाही समावेश असतो.
यासाठी कोणता वयोगट गरजेचा आहे?
९ ते १० हे वय अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी योग्य आहे. चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा, हे अगदी तिसºया-चौथ्या वर्षीच मुलांना सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आठ वर्षांखालील मुलांना त्यांच्या लैंगिकतेबद्दल थोडे तरी ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यांना सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच असावी असे त्यांचे बंधन नसते, पण आपण समाधानकारक उत्तर द्यावे असे त्यांना अपेक्षित असते. मुलांचे हे वय अतिशय जिज्ञासू असते, त्यांना विविध गोष्टींविषयी कुतूहल असते व त्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते.
पालकांनी कसा संवाद साधावा?
मुलांना शिकवताना पालकांनी मुलांना प्रश्न विचारण्याची संधी दिली पाहिजे. शिक्षण म्हणजे दुहेरी बाजूंनी आपल्या विचारांची देवाण-घेवाणीची एक प्रक्रियाच असते. एकेरी मार्गाने योग्य हेतू साध्य होत नाही. पालकांनी म्हणजेच एकाअर्थी असलेल्या शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न लैंगिक विषयाशी संबंधित असो वा नसो, पण पालकांनी त्यांना उत्तर देताना नेहमी खरे उत्तर द्यावे. एकाअर्थाने ही मनमोकळ्या नातेसंबंधांची सुरुवातच असते. समाज आणि शाळाही त्यांना या विषयाची माहिती देत असतात, पण पालकांच्या शिकवण्यामुळे मुलांच्या मनात प्रभावी असा मंच तयार होतो व त्यांचे पुढील आयुष्य याच संकल्पनेवर आधारित असते. म्हणूनच पालकांनी मुलांच्या मनावर सकारात्मकतेने या विषयाचे धडे गिरवले पाहिजेत, त्यांच्या मनात एक सकारात्मक मंच तयार केला पाहिजे.