#WomensDay- "ती" चौकटीत बंदिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 01:15 PM2018-03-08T13:15:37+5:302018-03-08T13:32:30+5:30
मुलीही प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. असे सांगून महिलांच्या प्रश्नांना बगल देण्याची वृत्ती समाजात आजही आहे.
- भागवत हिरेकर
मार्च लागला कि, सगळ्यांना आयुष्यातील आणि आजूबाजूला वावरणाऱ्या बाईची चिंता वाटायला लागते. तिच्या समोरच्या अडचणी कधी सरतील म्हणून अनेकांना कोण दुःख होत. मग सोशल माध्यमातून मोठ मोठ्ठे चघळून गुळगुळीत झालेले सुविचार फॉरवर्ड केले जातात. बाईच्या वेदनेच एका दिवसाचे सुतक पाळलं जाते. तिचा जगण्याचा हक्क हिरावून तिची कीव करणारे थोर समाजात पावलोपावली भेटतात. स्रियांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. बंधने सैल झाली आहेत. आता मुलीही प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. असे सांगून महिलांच्या प्रश्नांना बगल देण्याची वृत्ती समाजात आजही आहे. ही वृत्ती काही काल परवा जन्माला आलेली नाही. तिची मूळ इथल्या जात आणि समाज व्यवस्थेत रुजलेली आहे. इथल्या संस्कृतीची वाहक बनवून तिला बंदिस्त केले गेले. धर्म, रूढींच्या आडून तिची स्वायत्तता हिरावून घेतली गेली. म्हणून २१ शतक आणि तंत्रज्ञानाच्या कल्लोळात बाईचा जन्म अजूनही त्रासाचा राहिला आहे.
समाजाने बाईचा माणूस म्हणून. जन्मताच स्वतंत्र जीव म्हणून स्वीकार केला आहे का??? या प्रश्नाचं उत्तर नाही असच येत. का झालं असं?? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर मानवी जीवन सुसह्य होत असताना. बाईच्या आयुष्यातील वेदना आजही तशाच का टिकून आहेत. पुरुष शिकलेला असो कि अशिक्षित (अपवाद वगळता) त्याचा काहीही परिणाम तिच्या आयुष्यावर झालेला नाही. फरक इतकाच झाला पूर्वीच्या संघर्षाचं स्वरूप बदललं. पूर्वी तिच्या आजूबाजूला कर्मठ, धर्माभिमानी पुरुष असायचा आता त्यात सुशिक्षित आणि समाजात प्रतिष्ठित असलेल्यांचा समावेश झालेला आहे. बाईवरील अत्याचारांनी समाजमन ढवळून निघालं आहे. कधी हुंड्यासाठी, कधी वासनेपोटी, कधी जातीचा वा राजकीय सूड उगवण्यासाठी तिला निशाणा बनवलं जात होत. ते आजही तसंच टिकून आहे.
स्त्रीला परावलंबी जीव म्हणून चौकटीत बंद करणाऱ्या व्यवस्था आजही तशाच आहेत. या मूळ व्यवस्थांमुळे स्त्रीला नियंत्रित करणाऱ्या जातीव्यवस्था आणि स्त्री पुरुष विषमता या दोन्ही गोष्टी तशाच टिकून राहिल्या आहेत. उलट अलीकडच्या काळात जातीय आणि सामाजिक तणाव वाढल्याने दोन्ही व्यवस्था आणखी बळकट होऊ लागल्या आहेत. या व्यवस्था परस्पर पूरक आणि स्त्रीला बंदिस्त करणाऱ्या आहेत. त्यामुळे नोकरदार असो वा उच्चशिक्षित स्त्रीवरील नियंत्रण पुरुषसत्ताक व्यवस्थेकडेच असल्याचे ऑनर किलिंगच्या घटनांमधून अधोरेखित झाले आहे.
सभोवताली स्त्री मुक्तीचा हुंकार दिला जात असताना, जवळच्या आणि नातेवाइकांकडून स्त्री नागवली जात आहे. भोगली जात आहे. ही मार्केटची समाजाला मिळालेली देणं आहे. बाजारू व्यवस्था स्त्रीला आधी आई, बहिण, बायको यांच्या रूपात संस्कृतीची रक्षक म्हणून प्रदर्शित करते. तर आजूबाजूला वावरणारी बाई उपभोग्य वस्तू म्हणून बिंबवण्याच काम जाहिराती करत आहे. वस्तू बरोबर बाईलाही आकर्षकपद्धतीने समाजसमोर मांडलं जात. त्यातून बाईही उपभोग्य असल्याचा अप्रत्यक्ष संदेशही असतो. या अशा बाजारप्राधान्य असलेल्या व्यवस्थेत शासन व्यवस्था स्व हित जपण्याचा प्रयन्त करत आहे. ही व्यवस्था समाजातील आहे त्या व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीच काम करत असते. त्यामुळे या व्यवस्थेवर वारंवार प्रश्नच उपस्थित केले जातात. या व्यवस्था शिक्षणाने संपुष्ठात येतील हा आशावादही आता कमी होऊ लागला आहे. विद्यापीठासारख्या ठिकाणी लैंगिक छळ निवारण समित्या स्थापन होणे, हे त्याला दुजोरा देत आहेत. त्यामुळे हा काळ बाईसाठी चांगला आहे असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. दुसरं असं कि देशातील स्त्रीवादाचा एक प्रवाह पुरुषांचा द्वेष करू लागला आहे. बाईच्या दुःखाच कारण फक्त पुरुषच आहे. असा अर्थबोध करून घेणेही धोकादायक आहे. स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही घटक व्यवस्थेचे बळी आहेत. केवळ पुरुषाला निशाणा बनवून आणि पुरुष करतात मग मी का नाही, असं म्हणत व्यसनाच्या आहारी जाणं शरीर प्रकृतीसाठी योग्य नाही हेही समजून घ्यायला हवं.
त्यामुळे पुरुषाचा द्वेष करून स्त्री मुक्ती मिळवता येणार नाही. स्त्रीला स्त्री आणि पुरुषाला पुरुष म्हणून घडवणाऱ्या व्यवस्था उद्ध्वस्त कराव्या लागतील. तोपर्यंत महिला दिन हे इव्हेंटच ठरतील