कुटुंब सांभाळा !
By गजानन दिवाण | Published: December 1, 2017 12:43 AM2017-12-01T00:43:18+5:302017-12-01T00:44:09+5:30
दीर्घकालीन त्रासातून एकमेकांची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून कोर्टाने हा निकाल दिला असला तरी यामुळे घटस्फोटांच्या वाढलेल्या संख्येत आणखी भर पडणार आहे.
आपली विवाहसंस्था मोडकळीस येते की काय, अशी भीती आता वाटू लागली आहे. सहा महिन्यांचा अज्ञार्थी कालावधी अर्थात ‘सिक्स मंथ कूलिंग आॅफ पिरिएड’ संपण्याची वाट न बघता औरंगाबादेत दिवाणी न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी २७ वर्षांचा तरुण आणि २३ वर्षांच्या तरुणीचा घटस्फोट तात्काळ मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन महिन्यांपूर्वीच्या निर्णयानंतर राज्यात प्रथमच हा सहा महिन्यांच्या अज्ञार्थी कालावधी माफ करण्यात आला. या निर्णयामुळे कौटुंबिक वाद लवकरात लवकर मार्गी काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचा आनंद साजरा करायचा की दु:ख, हा मोठा पेच आहे. हिंदू विवाह कायद्यात १९७६ साली आमूलाग्र बदल झाले. त्यापूर्वी अन्यायी वैवाहिक जीवनाचा अंत करण्यासाठी घटस्फोट मिळविणे ही एक अवघड प्रक्रिया होती. पुढे-पुढे ते सोपे होत गेले. पती-पत्नीचा एकमेकांतील संवाद संपणे, एकत्र राहणे अशक्य झाल्यास परस्पर समजुतीने दोघांनी मिळून कोर्टाकडे अर्ज करावा आणि सहा महिन्यांच्या काळानंतर कोर्टाने चौकशी करून घटस्फोटाचा हुकूम करावा, असा कायदा झाला. सप्टेंबर २०१७ मध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने त्याही पुढे जाऊन निकाल दिला. दोघांमधील वैवाहिक संबंध दुरुस्तीपलीकडे गेले असल्यास आणि मध्यस्थीचे सर्व प्रयत्न संपुष्टात आले असल्यास अज्ञार्थी कालावधी संपण्याची वाट न बघता असा विवाह तात्काळ संपुष्टात आणावा, असा निवाडा कोर्टाने दिला. दीर्घकालीन त्रासातून एकमेकांची लवकरात लवकर सुटका व्हावी म्हणून कोर्टाने हा निकाल दिला असला तरी यामुळे घटस्फोटांच्या वाढलेल्या संख्येत आणखी भर पडणार आहे. पूर्वी घटस्फोट हजारात एखादा व्हायचा. हल्ली ही संख्याच हजारांत गेली आहे. चार वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार त्यावर्षी देशभरात तब्बल ४३ हजार घटस्फोट झाले. यात सर्वाधिक २० हजार घटस्फोट महाराष्टÑातील होते. त्यातही १५ हजार घटस्फोट फक्त पुणे-मुंबईत होते आणि उरलेले पाच हजार औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमधील होते. दहा वर्षांपूर्वी देशात हजारामागे एक घटस्फोट व्हायचा, असे हा अहवाल सांगतो. आज ही संख्या हजारामागे १३ वर गेली आहे. कामाचा व्याप, वाढता तणाव आणि राहणीमानातील बदल हेच मोठे कारण यामागे सांगितले जाते. कॉल सेंटरमध्ये काम करणा-यांचे घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे हा अहवाल सांगतो. त्यांचे जीवनमान कसे? ते घरी किती वेळ राहतात? पती-पत्नी किती काळ एकत्र घालवितात? घरी बनविलेले जेवण ते किती वेळा करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली, की घटस्फोट का वाढत आहेत, याचे उत्तर मिळते. मुळात घटस्फोट मिळविणे आता फारसे अवघड राहिले नाहीच. विवाह टिकविणे हेच मोठे आव्हान होऊन बसले आहे.