कथित ‘लॅण्ड जिहाद’ अन् ‘घेटोआयझेशन’चा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:44 PM2017-12-25T12:44:40+5:302017-12-25T13:00:21+5:30
आता उत्तर प्रदेशात ‘लॅण्ड जिहाद’ ही संकल्पना राबविल्या जात असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदू आणि सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग असलेल्या मुस्लीम समुदायातील अविश्वासाची भावना आणखी वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
- रवी टाले
गत काही वर्षात भारतात ‘लव्ह जिहाद’ ही संज्ञा खूप प्रचलित झाली आहे. एखाद्या मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी प्रेमविवाह केला, की हिंदुत्ववादी मंडळी लगेच तो ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याची हाकाटी करू लागते. मूलतत्त्ववादी मुस्लीम संघटना हिंदू युवतींना प्रेमपाशात अडकविण्यासाठी मुस्लीम युवकांना जाणीवपूर्वक प्रेरित करतात आणि त्यासाठी रोख रकमेसोबतच दुचाकी वाहने, मोबाइल फोन, कपडेलत्ते पुरवितात, असा हिंदुत्ववाद्यांचा आरोेप आहे. अशाच एका प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने मुस्लीम युवकासोबतचा हिंदू युवतीचा प्रेमविवाह अवैध ठरविला होता; मात्र असे प्रेमविवाह नियोजनबद्धरीत्या घडवून आणल्या जातात आणि त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिल्या जातो, यावर अद्याप तरी बहुतांश जनतेचा विश्वास नाही. अर्थात बहुसंख्यांक हिंदूंच्या मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकते, हे नाकारण्यातही अर्थ नाही. त्यातच आता उत्तर प्रदेशात ‘लॅण्ड जिहाद’ ही संकल्पना राबविल्या जात असल्याचा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे बहुसंख्यांक हिंदू आणि सर्वात मोठा अल्पसंख्यांक वर्ग असलेल्या मुस्लीम समुदायातील अविश्वासाची भावना आणखी वाढीस लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरातील उस्मान अहमद नामक व्यक्तीने कुटुंबासाठी हिंदूबहुल भागात घर विकत घेतल्यानंतर हा प्रचार सुरू झाला. उस्मान अहमद यांनी ज्या भागात घर विकत घेतले, त्या भागातील रहिवाशांनी त्यांच्यावर ‘लॅण्ड जिहाद’चे आरोप करण्यास प्रारंभ केल्यामुळे शेवटी त्या कुटुंबाला जुन्या घरात परतावे लागले. सरकारी शाळेत नोकरी करीत असलेल्या उस्मान अहमद यांच्या वडिलांना शाळा प्रशासनाकडून देण्यात आलेली एक खोली अपुरी पडत असल्याने, त्यांनी हिंदूबहुल भागात एक दुमजली घर विकत घेतले. हिंदुत्ववादी संघटनांच्या मते, मुस्लीम समुदायातील लोक हिंदूबहुल भागात जाणीवपूर्वक घरे विकत घेत आहेत. एक घर खरेदी करण्यापासून प्रारंभ होतो आणि हळूहळू मुस्लीम समुदायाचे लोक संपूर्ण वस्तीवरच ताबा मिळवतात, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या आरोपात किती तथ्य आहे, हे माहीत नाही; परंतु एकीकडे मुस्लीम समुदाय मुख्य प्रवाहात समरस होत नसल्याचा आरोप करायचा आणि दुसरीकडे त्यांना त्यांच्या स्वतंत्र वस्त्यांमध्येच राहण्यास बाध्य करायचे, यामधील विरोधाभास त्यांना एक तर उमजत नाही किंवा तो उमजून घ्यायचाच नाही, असे म्हणावे लागेल. वस्तुस्थिती ही आहे, की हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांच्या वस्त्या वेगवेगळ्या असणे हेच उभय समुदायांदरम्यानच्या ताणतणावामागचे प्रमुख कारण आहे. उभय समुदायातील अनेक लोकांचा हा अनुभव आहे, की दुसºया समुदायातील एखाद्या व्यक्तीसोबतच्या प्रथम संवादादरम्यानचा तणाव व असहजता त्या व्यक्तीसोबत संपर्क वाढला की आपोआप दूर होते आणि आत्मियता वाढीस लागते. उभय समुदायांमधील लोक एकमेकांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राहू लागल्यास ही प्रक्रिया आपोआप वाढीस लागेल आणि निरर्थक ताणतणाव आपोआप निवळू लागतील.
दुर्दैवाने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच देशातील बहुतांश शहरे व गावांमध्ये हिंदू व मुस्लिमांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या तशाच कायम राहाव्यात, अशीच उभय समुदायांमधील मूलतत्त्ववाद्यांची इच्छा असते. त्यापेक्षाही मोठे दुर्दैव हे आहे, की स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणाºया मंडळीनेही ‘घेटोआयझेशन’ (विशिष्ट भागापुरते मर्यादित करण्याची प्रवृत्ती) या प्रक्रियेस मोडता घालण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. उभय समुदायांमधील मूलतत्त्ववाद्यांसोबतच, काही धर्मनिरपेक्ष मंडळीलाही देशातील दोन सर्वात मोठ्या समुदायांदरम्यान अविश्वासाची भावना कायम राहण्यातच राजकीय लाभ दिसला आणि त्यामुळे ती भावना तशीच कायम रहावी, असेच त्यांचे वर्तन असते.
मेरठमधील ज्या हिंदूबहुल वस्तीत उस्मान अहमद यांनी घर विकत घेतले, त्या वस्तीतील हिंदूंनी त्यांना वस्ती सोडून जाण्यास भाग पाडले, ही बाब निंदनीय अशीच आहे; मात्र बहुसंख्य मुस्लिमांचा कल मुस्लीमबहुल वस्तीतच वास्तव्य करण्याकडे असतो, हे नाकारण्यातही अर्थ नाही. अनेक सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सुदृढ मुस्लीम, मुस्लीमबहुल वस्तीत सुविधांचा अभाव असला तरी वस्ती सोडण्यास तयार होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा लोकसंख्यावाढीमुळे मूळ वस्तीत जागा कमी पडू लागते, तेव्हा केवळ मुस्लिमांचाच समावेश असलेल्या नव्या वस्त्या निर्माण करण्याकडेच मुस्लीम समुदायाचा कल असतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे. ...आणि जेव्हा एखादा या परंपरेस छेद देऊ बघतो तेव्हा त्याचा उस्मान अहमद केला जातो!
थोर तत्त्वज्ञ प्लेटोने त्याच्या जगप्रसिद्ध ‘रिपब्लिक’मध्ये म्हटले आहे, ‘‘प्रत्येक शहरात वस्तुत: दोन शहरे असतात. एक गरिबांचे अन् एक श्रीमंतांचे! ही दोन्ही शहरे सतत एकमेकांशी युद्धरत असतात.’’ म्हणजे, एकाच शहरात दोन वेगवेगळी शहरे ही काही नवी बाब नाही; मात्र जेव्हा त्या दोन शहरांमधील सीमारेषा वंश, जात, धर्म अशा आधारांवर निश्चित होते, एका समुदायास विशिष्ट भौगोलिक मर्यादेत राहण्यास भाग पाडले जाते, तेव्हा त्यास ‘घेटो’चे स्वरूप प्राप्त होते. ‘घेटोआयझेशन’चा सर्वात भयंकर अनुभव ज्यू समुदायाने घेतला आहे. ‘घेटोआयझेशन’ची प्रक्रिया अंतत: हानीकारकच सिद्ध होते, हा इतिहास आहे. वंश, जात, धर्म या आधारे झालेल्या संघर्षाने कधीच कुणाचे भले झाले नाही. या देशातील काही मुस्लिमांनी स्वातंत्र्याची पहाट होत असताना, स्वत:साठी धार्मिक आधारावर पाकिस्तान या देशाची निर्मिती करवून घेऊन, एकप्रकारे स्वत:चेच ‘घेटोआयझेशन’ करून घेतले होते. त्या घडामोडीच्या काही वर्षे आधी हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझींनी वांशिक आधारावर ज्यू समुदायावर ‘घेटोआयझेशन’ लादले होते. नाझींची कशी वाताहत झाली आणि पाकिस्तानींची काय अवस्था आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतातील हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांनी त्यापासून धडा घेण्याची नितांत गरज आहे.