विज्ञान संशोधनाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:30 AM2018-04-08T00:30:32+5:302018-04-08T00:30:32+5:30
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली.
- अरविंद परांजपे
भारतात आर्यभट हा अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. इसवी सन ४९९ साली वयाच्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली.
आतापर्यंत आपण युरोपमध्ये झालेल्या आपल्या सूर्यमालेच्या संदर्भात चर्चा केली. आपण बघितलं की आपल्या सूर्यमालेबद्दलचं मत कसं बदलत गेलं. कोपर्निकसने एरिस्टोटलच्या पृथ्वीकेंद्रित संकल्पनेला छेद देत सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना मांडली. पण ही कल्पना सर्वमान्य होण्यापूर्वी तिला अनेक प्रश्नांना सामोर जावं लागलं होतं. अर्थात काही प्रश्न हे पूर्वग्रहदूषित होते, असं म्हणायला हरकत नाही. पण, शास्त्रीय पातळीवर विचारण्यात आलेले काही खरे प्रश्नही होते.
जर पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करत असेल आणि तारे आपल्यापासून वेगवेगळ्या अंतरावर असतील तर पृथ्वीच्या गतीबरोबर आपल्याला जवळचे तारे दूरच्या ताऱ्यांच्या सापेक्षात मागे जाताना दिसायला पाहिजे. किंवा असंही म्हणता येईल की दूरचे तारे जवळच्या ताºयांच्या तुलनेत आपल्याला पुढे जाताना दिसायला पाहिजेत. असा अनुभव आपल्याला प्रवासात हमखास येतो. गाडीतून बाहेर बघताना आपल्याला जवळची झाडं दूरच्या डोंगरांच्या सापेक्षात मागे जाताना दिसतात. पण ताºयांच्या बाबतीत मात्र असा अनुभव आपल्याला येत नाही. का? या प्रश्नाचं उत्तर त्या वेळी जरी कळल नसलं तरी आज आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देता येतं. तारे आपल्यापासून इतके दूर आहेत की अशी निरीक्षणं साध्या डोळ्यांनी दिसणं शक्य नाही. आपल्या प्रवासाचंच उदाहरण घेऊया. जर दूरच्या डोंगराच्या पायथ्यावर असलेल्या झाडाकडे बघितलं तर आपल्याला दोघांमधील बदललेल्या गतीची कल्पना येत नाही.
पण, दुर्बिणीतून बघितल्यावर हा परिणाम आपल्याला सहज दिसेल. म्हणून तर वरच्या ताºयांच्या संदर्भातील प्रश्नाचं उत्तर हेच आहे. जेव्हा दुर्बिणींचा विकास झाला आणि फोटोग्राफीचा वापर करून ताºयांची चित्रं घेण्यात आली तेव्हा हे सहज दिसून आलं की काही ताºयांची स्थिती इतर ताºयांच्या तुलनेत बदलताना दिसते.
पाश्चात्त्य जगात किंवा खरं तर युरोपमध्ये आपल्या सूर्यमालेबद्दल अशी चर्चा होत असताना इकडे भारतात एक अत्यंत महान शास्त्रज्ञ होऊन गेला. या शास्त्रज्ञाचं नाव होतं आर्यभट (इ.स. ४७६ - ५५०). इसवी सन ४९९ साली वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी आर्यभटाने एक महान ग्रंथ लिहिला. त्यांनी त्या काळातील खगोलशास्त्राबद्दलची सर्व माहिती अवघ्या १२१ श्लोकांमधून सादर केली. यातील काही माहिती आधी उपलब्ध होती तर काही शोध त्यानेच लावलेले होते. यातील काही संकल्पना चुकीच्याही आहेत, पण त्यांची संख्या मात्र नगण्य आहे. इथे हेदेखील नमूद केलं पाहिजे की या संकल्पना मांडण्यात आर्यभट चुकीचा होता, असं म्हणणं गैर ठरेल. त्याच्या संकल्पना कालानुरूपच होत्या.
आर्यभटाच्या एका श्लोकाची प्रामुख्याने चर्चा होते आणि तो श्लोक असा आहे
अनुलोमगतिनौस्थ: पश्चत्यचलं विलोमगं यद्वत्? ।
अचलानि भानितद्वत् समपश्चिमगानि लंकायाम् ।।
या श्लोकात आर्यभटाने स्पष्ट नमूद केलं आहे की, पृथ्वी परिवलन करते आणि त्याचं स्पष्टीकरण देताना तो लिहितो की, ज्याप्रमाणे बोटीतून जाणाºया व्यक्तीला किनाºयावरची झाडं मागे जाताना दिसतात त्याचप्रमाणे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरत असल्यामुळे आपल्याला तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात. आर्यभटाला पृथ्वी गोल आहे याची पूर्ण कल्पना होती (पुढे पाहा) आणि पृथ्वीवरून बघताना ध्रुवतारा हा स्थिर दिसतो, तर खगोलीय विषुववृत्तावर ताºयांची गती सर्वात जास्त असते आणि म्हणून वरील श्लोकात लंका म्हणजेच विषुववृत्ताचा त्याने मुद्दाम उल्लेख केला आहे.
याआधीच्या दोन श्लोकांत आर्यभट सांगतो की, पृथ्वी गोल आहे. पृथ्वीच्या सर्व बाजूंनी तारे किंवा नक्षत्र आहेत आणि त्यांच्या मध्यभागी ती कोणाच्याही आधाराशिवाय स्थिर आहे. इथे पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे वगैरे संकल्पना मोडीत काढण्यात आल्या आहेत.
आर्यभट हे पण म्हणतो की, पृथ्वी सर्व बाजूंनी पाणी आणि सर्व प्रकारच्या सजीवांनी वेढलेली आहे. हे सांगताना तो पृथ्वीला कदंबपुष्पाची उपमा देतो. कदंबपुष्पाच्या ग्रंथींवर सर्व बाजूंनी लहान फुलं असतात. इथे आपल्याला एक बाब लक्षात ठेवायला हवी की या श्लोकातून आर्यभटाला गुरुत्वाकर्षणाची कल्पना होती, असं म्हणणं चुकीचं ठरेल.
आर्यभट आपल्या कालखंडाच्या खूप पुढे होता. त्याच्या या सिद्धांताला त्याच्या नंतरच्या विद्वानांनी चुकीचं ठरवलं. कदाचित त्यांना या सिद्धांताचं संपूर्ण आकलन झालंच नसेल. असो - तसंच आपल्या देशात पुढे जो इतिहास घडला - त्यात यवनांचं आक्रमण वगैरे आलंच - त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की, विज्ञान संशोधनाची ही परंपरा खंडित झाली किंवा ज्या वेगाने ती पुढे गेली असती त्या वेगाने ती पुढे जाऊ शकली नाही.
(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)