असा मी काय गुन्हा केला?
By गजानन दिवाण | Published: June 2, 2018 11:10 PM2018-06-02T23:10:00+5:302018-06-02T23:10:00+5:30
आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का? कारण एकच, मी नकोशी !
गजानन दिवाण
आईच्या पोटात असतानाच मला चिंता असायची. आधीची मोठी बहीण. आई-बाबांची परिस्थिती जेमतेमच. त्यांना मुलाची तर अपेक्षा नसणार ना? कामाच्या शोधात आई-बाबाने हिंगोली हे मूळ गाव सोडून बीड गाठले, तेव्हा तर मी आणखी घाबरले. देशाला हादरवून सोडणारे गर्भलिंग हत्याकांड घडले ते बीडमध्येच. स्त्री गर्भ जन्माला येण्याआधीच तो संपविणारी अनेक केंद्रे सील केली गेली. त्या जिल्ह्यात मी जन्माआधीच गेले होते. नशीबच म्हणायचे माझे. अखेर ११ मे रोजी बीडच्या सामान्य रुग्णालयात आईने मला जन्म दिला. आई-बाबा केवढे खुश झाले म्हणून सांगू. मला पोटात असताना वाटलेली भीती एका क्षणात नाहीशी झाली. मी नकोशी नाही, असे या आनंदोत्सवाने मला पटवून दिले.
अचानक माझी प्रकृती बिघडली. वजन कमी झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर २१ मे रोजी मला आईच्या स्वाधीन करण्यात आले. आईचे दूध अजूनही माझ्या जिभेला लागले नव्हते. आईच्या कुशीसाठी मी केव्हाची आतुर झाले होते. आईने मला जवळ घेतले. आई दूध पाजेल या आशेने मी शांतपणे डोळे मिटले. काय घडले ठाऊक नाही, एका झटक्यात आईने मला परत डॉक्टरांकडे सोपविले. पोलीस आले. डॉक्टरांनी माझे रक्त घेतले. आई-बाबांचेही रक्त घेतले. काय चालले हे अजिबात कळत नव्हते. हे रक्त कुठेतरी पाठविण्यात आले. आई मला दूध पाजण्यास तयार नव्हती. त्यामुळे तब्येत पुन्हा ढासळू लागली.
डॉक्टरांनी मला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविले. दु:ख पुन्हा दवाखान्यात गेल्याचे नव्हते. आई सोबत का नाही, हेच मला कळत नव्हते. घाटीतील परिचारिकाच माझी काळजी घेत होत्या. शुक्रवारी कसला तरी डीएनए अहवाल आल्याची चर्चा परिचारिकांमध्ये सुरू झाली. अचानक आई आणि बाबा आल्याचे पाहून मला आकाश ठेंगणे झाले. आईने मला पुन्हा कुशीत घेतले आणि बीडमधील घर गाठले. शुक्रवारची रात्र आई-बाबांच्या प्रेमात गेली. शनिवारी सकाळी दोघांचेही वागणे पुन्हा बदलले. त्यांनी कोणाला तरी फोन करून पुन्हा मला अनोळखी माणसांच्या हाती सोपविले. काय घडतेय, हे समजण्याआधीच त्यांनी मला घेऊन सरळ औरंगाबाद गाठले. घर किंवा रूग्णालय नव्हे तर, अनाथालय होते ते.
बीडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी जन्मत:च माझी नोंद मुलगा म्हणून केली, यात माझा काय दोष? मग आई-बाबाने मला का नाकारले? त्यांना मुलगाच हवा होता का? माझे आजी-आजोबा तर डीएनए अहवालदेखील मानायला तयार नाहीत. मी त्यांची नात आहे हेच त्यांना मान्य नाही. अहवाल खोटा असेल तर माझे आई-बाबा कोण? यातील कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मला मिळत नाही. ‘बेटी धन की पेटी’ हे तर केवळ म्हणण्यासाठीच. माझा जन्म झाला त्याच आठवड्यात सोशल मीडियावर मुलीच्या जन्माचे स्वागत करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. रुग्णालयात परिचारिकेच्या मोबाईलवर तो मीही पाहिला होता. माझेही असेच स्वागत होणार. माझ्यासाठी घरात काय काय तयारी होत असणार? माझे नाव काय ठेवले जाणार? मला लाडाने काय म्हटले जाणार, अशी स्वप्नं रंगवत असतानाच मी अचानक नकोशी ठरले. आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का?
कारण एकच, मी नकोशी !