Women's Day 2018 : शब्दांशी नातं!; कित्ती बोलतात या बायका, पण...
By गौरी ब्रह्मे | Published: March 8, 2018 08:30 AM2018-03-08T08:30:04+5:302018-03-08T08:30:04+5:30
माझ्या लहानपणी आमच्याकडे दुकानात एक नोकर कामाला होता. धोंडीराम त्याचं नाव. आम्ही लहान मुलं तेव्हा त्याची लग्नावरून, मुली पाहण्यावरून बरीच चेष्टा करायचो, त्याला चिडवायचो.
- गौरी ब्रह्मे
माझ्या लहानपणी आमच्याकडे दुकानात एक नोकर कामाला होता. धोंडीराम त्याचं नाव. आम्ही लहान मुलं तेव्हा त्याची लग्नावरून, मुली पाहण्यावरून बरीच चेष्टा करायचो, त्याला चिडवायचो. तो ही मजेत उत्तरं द्यायचा. लग्नाचा विषय जेव्हा जेव्हा निघेल तेव्हा तो आम्हाला एकच सांगायचा. "आपल्या फार काही अपेक्षा नाहीत, पण बायको घुमी पाहिजे." मला या वाक्याचं नेहमी आश्चर्य वाटायचं. घुमी म्हणजे न बोलणारी. म्हणजे याला काहीही न बोलणारी बायको हवी आहे? मुकी बाहुली? असं कसं? माझ्या डोळ्यासमोर तेव्हा धोंडीराम, त्याचं घर आणि त्यात त्याची अजिबात न बोलणारी बायको यायचे. श्या! किती बोअर! असं म्हणून मी तो विषय तिथेच सोडून द्यायचे. पुढे-पुढे मोठं होत गेल्यावर मला घुमी या शब्दाचा अर्थ नीट कळत गेला. घुमी म्हणजे नुसतीच न बोलणारी नव्हे, तर अरे ला कारे न करणारी, विचारल्याशिवाय मत व्यक्त न करणारी, सगळं गपगुमान ऐकून घेणारी बायको. असा मामला होता तर!
धोंडीरामच काय, आजूबाजूला बरेच जण आपल्याला वेगवेगळ्या शब्दात हेच सांगत असतात. "तू काही बोलू नकोस. हा तुझा विषय नाही. तुला यातलं कळत नाही. हे बायकांचे विषय नाहीत." वगैरे वगैरे. अगदी रिक्षा आणि ट्रकवालेसुद्धा गावोगावी हाच संदेश पोचवत असतात.
"जगी सर्व सुखी,
ज्याची बायको मुकी."
मला हे वाक्य वाचलं की कायम हसू येतं. भाऊ, ज्या सहजीवनात एकमेकांचे मित्र होऊन बरोबरीने बोलणं नाही, चर्चा नाही, गप्पा नाहीत, वाद नाहीत ते कसलं सहजीवन? एकानेच बोलणं, एकानेच सगळं ठरवणं हा तर दोघांवर आणि त्यांच्यातल्या नात्यावर अत्याचार! असो. पण माझे विचार सगळ्यांचेच असतील असं नाही.
तर बायकांच्या बोलण्याबद्दल बोलू. शास्त्रीयरित्या असं सिद्ध झालेलं आहे की बायकांची बोलण्याची सरासरी ही पुरुषांपेक्षा जास्त आहे. याला बायकांच्या मेंदूतल्या उजव्या बाजूच्या पेशी कारणीभूत असतात. पुरुष जर का दिवसाला ७००० शब्द बोलत असतील तर बायका २०००० शब्द बोलतात. म्हणजे पुरुषांपेक्षा तब्बल १३००० शब्द जास्त! काय प्रचंड प्रमाणात ऊर्जा घालवतात पाहा! पण म्हणूनच कदाचित मनाने जास्त मोकळ्या असतात. आता हे तेरा हजार शब्द न बोलता साठवलेली एनर्जी पुरुष घालवतात तरी कुठे? तर म्हणे ते दर ५२व्या सेकंदाला सेक्सबद्दल विचार करतात! हे मी नाही, शास्त्रीय संशोधन सांगते. पण हा अजून एक वेगळा विषय आहे. एकंदरित मजेशीर आहे हे प्रकरण.
मग बायका २०००० शब्द बोलतात, म्हणजे नक्की बोलतात तरी काय? अर्थात त्या या पृथ्वीतलावरच्या, खालच्या, मागच्या, सगळ्या विषयांबद्दल बोलू शकतात. हवापाणी, स्वयंपाक, घर, संसार, मुलं, पृथ्वी, पैसे, निसर्ग, कपडे, सणवार, पुस्तकं, चित्रपट, संगीत, कामवाली बाई, झुरळं, पाल, शेजारी, पंतप्रधान, हुश्श दमले!! (याला अपवाद असतात हे शंभर टक्के मान्य आहे!) या बोलण्यात कामाचं बोलणं आलं, अर्थपूर्ण बोलणं आलं, वायफळ चर्चा आली, गॉसिप आलं. हे खरंतर पुरुषही करतात, पण बायकांचं हे करण्याचं प्रमाण जास्त, म्हणूनच अर्थात त्यांच्यावर विनोद जास्त, व्यंगचित्र जास्त, टीका जास्त.
मला स्वतःला बायकांची बडबड फार खटकत नाही. त्यांनी बोलावं, जरूर बडबड करावी. त्यांच्या बोलण्यामुळेच तर जगात चैतन्य भरून आहे, जान आहे. पण जिथे खरी गरज आहे, तिथे न बोलण्याचं त्यांचं अवसान मात्र जोरदार खटकतं. पहिली खटकणारी गोष्ट म्हणजे आपल्यासमोर, विशेष करून एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असताना दिसूनही एकमेकींची बाजू घेऊन न बोलणं. परस्परातील हेवेदावे, ईर्ष्या, स्पर्धा बाजूला ठेवून, एकमेकींच्या जीवावर न उठता, एकमेकींचा भक्कम आधार न बनणं. एकाच कुटुंबात, कंपनीत, घोळक्यात, समूहात, देशात राहूनही जेव्हा खरी गरज असेल तेव्हा आपण "बघेल तिचं ती, आपण कशाला बोला" हा पवित्रा कामाचा नाही.
दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे आपल्या शारीरिक गरजा आणि तक्रारींबद्दल न बोलणं. "मला काय धाड भरली आहे? मला काही होत नाही, चेकअप कशाला हवा, छे, छे, सेक्स वाईट! साधी सांधेदुखी, डोकेदुखी, गाठच तर आहे" असं म्हणून आपल्या तब्येतीची, शारीरिक गरजांची हेळसांड करणे, चालढकल करणे, आपल्याला काही होतंय हे न सांगून, सहन करून, आपण आपल्या कुटुंबाचं, समाजाचं आणि पर्यायाने देशाचं भलंच करतो आहोत हा अभिनिवेश बाळगणे. अरे बोला की घडाघडा काय होतंय ते! कुठे दुखतंय, जखम आहे, गाठ होते आहे, आज जोडीदाराच्या विशेष जवळ जावंसं वाटतंय, बाथरुमला जायचे आहे (प्रवासात विशेष करून), रक्तस्त्राव होतो आहे हे शरीरधर्म सांगितलेच पाहिजेत. त्यात मौन बाळगून कसं चालेल? इतर अनेक गोष्टींना भडाभडा व्यक्त करताना या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? "मोकळं व्हा" याचा अर्थ फक्त मनातले बोलून नव्हे तर आपल्या शरीराच्या आवश्यक आणि विशेष गरजांना योग्य त्या वेळी हाक देऊन मोकळं होणे असाही आहे.
तर या "Women's day" ला वरील दोन गोष्टींवर विचार करून बोलायचे ठरवा. These are my two cents. बाकी, बोलायचं सोडू नका. अगदी वायफळ, मोजकं, आवश्यक, भाराभार सगळं बोला. माझ्या मनात एक भन्नाट कल्पना तर कायम चमकून जाते. कोणी बायकांच्या बडबडीवर चालणारं गाड्यांसाठी इंधन तयार केलं, तर ते कीती अखंड आणि अविरत असेल! एक झकास नॉन-कन्व्हेनशनल एनर्जी सोर्स! काय म्हणता?
अरे हो, एक सांगायचं राहिलं. आमच्या धोंडीरामला मस्त बडबड करणारी बायको मिळाली बरं का! 😉😊
हा "Women's day" तुम्हा सर्वांना मस्त बडबडीचा जावो! Happy Women's day!