जागतिक पर्यावरण दिन: वातावरण बदलास भूगर्भामधील जलाची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:42 AM2019-06-05T03:42:41+5:302019-06-05T03:43:33+5:30
वातावरण बदलामुळे भूगर्भातील पाणी कमी तर होतेच, त्याचबरोबर त्याची गुणवत्तासुद्धा बदलते. वातावरण बदलामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो, उत्पादन वाढावे, म्हणून भरपूर रासायनिक खते वापरली जातात, याच खतांचे अंश भूगर्भातील पाण्यात मिसळतात. पंजाब हरयाणामधील भूगर्भातील पाणी आज याचमुळे दूषित झाले आहे.
डॉ. नागेश टेकाळे
पर्यावरण तज्ज्ञ
पूर्वी कुठलेही संगीत नाटक, वग अथवा दशाअवतारी सादर होण्यापूर्वी नांदी होत असे. उत्कृष्ट नांदी ही रंगतदार नाटकाचे दर्शकच असे. दोन शतकांपूर्वी इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांतीचे महानाट्य सुरू झाले, तेव्हा वातावरण बदलाच्या नांदीची घंटा अतिशय सौम्य आवाजात वाजली होती, जेव्हा या महानाट्याच्या पुढच्या टप्प्यात पृथ्वीवरील आठ विकसित राष्ट्रांनी भाग घेतला, तेव्हा याच नांदीचा आवाज प्रचंड मोठा झाला आणि आज तीन दशकांनंतर शतकी देशांची संख्या असलेल्या या महानाट्यात वातावरण बदलाच्या नांदीचाच आवाज सातत्याने वाढत आहे आणि हे सर्वत्र दिसत असूनही आठ विकसित राष्ट्रांच्या बऱ्यापैकी माघारीनंतरसुद्धा सुखाच्या लालसेपोटी निसर्गाची हानी करून विकासाचा प्रयोग सातत्याने सुरू ठेवण्याचा अट्टाहास अनेक विकसनशील राष्ट्रे करत आहेत. पर्यावरणाची ही शोकांतिका नव्हे काय?
सुदृढ पर्यावरण आणि माणसास हवा असणारा विकास ही एकाच रथाची दोन समांतर अंतरावर चालणारी अनुरूप चाके आहेत. यातील विकासरूपी चाकांचा आकार, उंची आणि वेग वाढला की, रथ कसा मोडून पडतो, हे सत्य आपण गेली तीन-चार दशके जवळून पहात आहोत. यातून काहीही धडा न घेता मोडलेला तो रथ पुन्हा उभा करून त्यात थोडी डागडुजी करून त्याच पद्धतीने पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अनिष्ट दौडीमधून बाहेर पडणारा कर्ब आणि मिथेन वायू, जोडीला त्यांचे इतर हरित वायूचे साथीदार, दूषित हवा, वृक्षतोड, वाढती उष्णता, पावसाचा अनियमितपणा, दुष्काळी महिन्यांची चढती संख्या, पाणीटंचाई, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समस्या, आर्थिक व्यय आणि अन्नसुरक्षा या वातावरण बदलाच्या प्रबळ फौजेबरोबर आपण पराभव होण्यासाठीच लढत आहोत. लढाईत हरल्यावर आपण काहीतरी शिकावयास हवे. मात्र, येथे पुन्हा पराभूत होऊनही हल्ल्याचीच शक्यता सातत्याने वाढत आहे.
वातावरण बदल म्हणजे, वारंवार येणारी चक्रीवादळे, समुद्राच्या उंच लाटा, त्सुनामीसारखी संकटे, पावसाची मुसळधार वृष्टी किंवा दुष्काळ, सातत्याने वाढणारी उष्णता आणि समुद्राची पातळी येथपर्यंतच आपले ज्ञान सीमित असते. भूगर्भातील जलसाठ्याचा या पृष्ठभागावरील घटनांचा कुठेही संबध नसावा, असेच अनेकांना पूर्वी वाटत होते, पण तो भ्रमनिरास होता, हे समजण्यासाठी २०१९ वर्ष उजाडले. २१ जानेवारी, २०१९च्या ‘नेचर: क्लायमेंट चेंज’ या जगप्रसिद्ध संशोधन पत्रिकेमध्ये ‘वातावरण बदल आणि भूगर्भातील पाणी’ या विषयावर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक संशोधन लेख प्रसिद्ध केला आहे आणि त्यात स्पष्टपणे लिहिले की, वाढत्या वातावरण बदलामुळे पावसाचा अनियमितपणा आणि दुष्काळी प्रदेश वाढत आहेत व त्यामुळेच पुढील काही दशकांमध्ये भूगर्भामधील ४४ टक्के जलसाठा धोक्याच्या पातळीला स्पर्श करणार आहे, काही ठिकाणी तो नष्टही होऊ शकतो. या संशोधन पत्रिकेसाठी या सहा शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील पृष्ठभागावरील भूजलाचा नकाशा आणि त्याची प्रतिकृती करून, त्यावर पुढील शंभर वर्षांत होणाºया वाढत्या वातावरण बदलांच्या परिणामांचा अभ्यास केला.
आज जगाची लोकसंख्या ७५० कोटींच्या आसपास आहे. त्यातील जवळपास २०० कोटी लोकसंख्या ही भूगर्भाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५० ते ४०० फूट खोलीपर्यंतचे पाणी आपणास सहज उपलब्ध होऊ शकते. कारण पावसाचे पाणी जमिनीत मुरून एवढ्या ठरावीक खोलीवर खडकाच्या अडथळ्यापर्यंत साठून राहू शकते, पुढे हेच पाणी सछिद्र खडकामधून गुरुत्वाकर्षणामुळे थेंबांथेंबांमधून खडकाच्या खाली साठून राहते, या साठलेल्या पाण्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हे मौल्यवान भूजल, ४०० फुटांच्या खाली जाऊन उपसण्याचा आपणास अधिकार नाही. कारण पृथ्वीवरील जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी ते कवच म्हणून कार्य करते. विज्ञान जनमानसात न पोचल्यामुळेच आम्ही अजूनही या भूजलाबद्दल अज्ञानी आहोत.
पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरून पृष्ठभागाखालील सछिद्र खडकावर जमा होते. याला आपण ‘रिचार्ज’ म्हणतो. हेच पाणी नंतर आड, विहिरीमधून पिण्यासाठी आणि शेतीला वापरले जाते. नंतर हे पाणी भूपृष्ठवर येऊन झरे, ओहोळ, नद्यांमधून समुद्राकडे वाहू लागते, यालाच आपण भूगर्भामधील पाण्याचा नैसर्गिक ‘डिस्चार्ज’ असे म्हणतो. ‘रिचार्ज’ आणि ‘डिस्चार्ज’ यांचे समप्रमाण असणे, हे संतुलित पर्यावरणाचे खरे दर्शक आहे. ‘नेचर’ ही संशोधन पत्रिका पुढे सांगते की, वातावरण बदलामुळे भूपृष्ठावरील पाण्याचा ‘रिचार्ज’ थांबत आहे आणि वाढती उष्णता आणि पावसाचा अनियमितपणा त्यामध्ये सातत्याने भर घालत आहे. जमिनीचा वापर बांधकामासाठी करणे, उभे जंगल कापून काढणे, यामुळे जमीन ‘रिचार्ज’साठी उपयोगी होऊ शकत नाही. जंगलामुळे जमीन थंड राहते. त्यामुळे भूपृष्ठभागावरचे पाणी
बाष्पीभवनामधून नष्ट होत नाही. झाडे तोडल्यामुळे, जमीन उघडी पडते आणि तिच्यामधील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होते. बाष्पीभवन हे वृक्षाकडून सभोवतीच्या वातावरणात व्हावे, हे अपेक्षित असताना, त्याऐवजी जमिनीमधील पाण्याचे अशा पद्धतीने बाष्पीभवन होणे हा शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा नष्ट झाली आणि वातावरणात कार्ब वायूचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले, हाच वायू सूर्यप्रकाशामधील उष्णता शोषून घेतो आणि सभोवतीचे वातावरण उष्ण होते, यालाच तर आपण वातावरण बदल म्हणतो. शास्त्रज्ञ म्हणतात, निसर्ग जेवढा पाण्याचा रिचार्ज करतो, तेवढाच डिस्चार्ज घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. रिचार्जपेक्षा डिस्चार्ज जास्त असणे, ही भूगर्भामधील पाणी आटण्याची भयघंटा आहे. पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेले झरे भूपृष्ठाजवळ असतात व ते पाऊस पडला की लगेच रिचार्ज होतात, पण याचा एक दुष्परिणाम म्हणजे मनुष्यास ते लगेच उपलब्ध होतात आणि त्यामधून पाण्याचा प्रचंड उपसा सुरू होतो. रिचार्जपेक्षा डिस्चार्ज जास्त होणे आणि त्यात वातावरण बदलाचे संकट, त्यामुळे पाण्याचे वितरण विस्कळीत होते.
आज आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेच अनुभवत आहोत. अनियमित पाऊस हा वातावरण बदलाचे पहिले दर्शक आहे. असा पाऊस पाणीटंचाई घेऊन येतो. सोबत दुष्काळ असेल, तर पाणीटंचाईचे संकट अजून गहिरे होते, पिण्यासाठी आणि पिकासाठी पाणी म्हणून ‘बोरवेल’ घेण्याचे प्रमाण लक्षणीय पद्धतीने वाढते. मानवनिर्मित बोरवेलने भूगर्भामधील शाश्वत पाणी उपसणे, याला मनुष्यनिर्मित ‘कृत्रिम डिस्चार्ज’ म्हणतात. अशा डिस्चार्जमुळे भूगर्भामधील पाण्याचे संतुलन बिघडते. वाढत्या बोरवेलची संख्या ही वातावरण बदलाशी जवळून जोडलेली आहे, म्हणूनच भविष्यात हे संशोधनासाठी नवीन दालन ठरावे. ‘बोरवेल’ची संख्या वाढल्यामुळे जमीन प्रतिवर्षी २५ से.मी. खचत असल्याचे भयावह चित्र तेहरान आणि गाझा पट्टा येथे आढळून आले आहे. आपल्याकडे ही संख्या प्रचंड वाढत असूनही यावर असा अभ्यास कुणी केल्याचे आढळत नाही. शास्त्रज्ञ म्हणतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेथे जास्त ओल आणि दमट हवा आहे, तेथे भूगर्भात वरच्या स्तरात जास्त पाणी साठते.
वातावरण बदलामुळे या भूप्रदेशांना येत्या दहा वर्षांत पाणीटंचाईचा सर्वात जास्त धोका आहे, हे त्यांनी अॅमेझॉन, कांगो, इंडोनेशिया आणि फ्लोरिडा उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. द.अफ्रिकेमधील केपटाउन भागात २०१५-१७ मध्ये कमी पाऊस पडला. त्यामुळे पृष्ठभागाजवळ रिचार्ज व्यवस्थित झालाच नाही आणि २०१८मध्ये शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. असाच प्रकार तेथे ५० वर्षापूर्वीसुद्धा झाला होता, पण सध्याच्या वाढत्या वातावरण बदलामुळे आणि द. आफ्रिकेमध्ये सातत्याने सुरू असलेल्या जमिनीच्या धुपीमुळे केपटाउनला अशा सकंटाला नजीकच्या भविष्यात पुन्हा सामोरे जावे लागणार आहे. अशा ठिकाणी भूगर्भात खोलीवर रिचार्ज वाढविणे आवश्यक आहे, हेही सूचित करण्यात आले आहे. कोरड्या भूप्रदेशात वातावरण बदलाचा भूगर्भामधील खोल पातळीवर असलेल्या पाण्यावर नगण्य परिणाम आढळून येतो. मात्र, भूपृष्ठावर झालेल्या वातावरण बदलाच्या परिणामास सामोरे जाण्यासाठी भूगर्भामधील या किमती पाण्याचा वापर करू नका, हेही आवर्जून सांगण्यात येत आहे. अमेरिकेमधील टेक्सास प्रांतात यासाठी शासनाने कडक नियमावली केली आहे.
वातावरण बदलामुळे समुद्राची पातळी वाढत आहे, त्याच्या उंच लाटा किनाºयापासून खोलवर आत येतात. त्यामुळे या परिसरातील भूगर्भातील गोड पाणी खारट होऊ लागले आहे. समुद्राच्या भीतीने किनाºयालगतचे लागवडीचे क्षेत्र नापीक होत आहे. वातावरण बदलास आपला कोकण भूप्रदेश नजीकच्या भविष्यात जास्त संवेदनशील होणार आहे. प्रशांत महासागरात असणारी हजारो बेटे आणि तेथील मानवी वस्ती वातावरण बदलामुळे प्रभावित झाली आहेत. येथील भूगर्भात पाण्याचे रिचार्ज वाढविणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांचे अनुमान आहे की, भूगर्भातील पाण्याअभावी यातील अनेक बेटे २०२५पर्यंत निर्मनुष्य होतील.