विश्वातील द्वंद्व मांडणारा लेखक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:56 AM2017-10-08T02:56:41+5:302017-10-08T02:57:14+5:30
काझुओ इशिगुरो ही अशी आसामी आहे की, त्यांनी ‘आपण जगाशी जोडले गेलो आहोत, या भ्रामक समजुतीखालील अथांग विवर दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या साहित्याचा गौरव नोबेल समितीने केला आहे.
- डॉ. अजित मगदूम
काझुओ इशिगुरो ही अशी आसामी आहे की, त्यांनी ‘आपण जगाशी जोडले गेलो आहोत, या भ्रामक समजुतीखालील अथांग विवर दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या साहित्याचा गौरव नोबेल समितीने केला आहे.
२०१७ सालचा साहित्यासाठीचा ‘नोबेल’ पुरस्कार हा काझुओ इशिगुरो या ६२ वर्षीय ब्रिटिश (मूळच्या जपानी) लेखकाला प्राप्त झाल्याची बातमी आली आणि नेहमीप्रमाणेच साहित्य वर्तुळात काहींच्या भुवया उंचावल्या. गतवर्षी तर स्वीडिश अकॅडमीने संगीतकार असलेल्या बॉबडीलन याला, त्याच्या गीतलेखनातील काव्यात्मक अभिव्यक्तीसाठी ‘नोबेल’ पुरस्कार देऊन तमाम साहित्यजगताला मोठा धक्का दिला होता. त्या मानाने या वर्षीचा धक्का सौम्यच म्हणायला हवा.
निवड समितीकडे आलेल्या १९५ मानांकनातून इशिगुरोची निवड करण्यात आली. साहित्यातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाºया या जागतिक पातळीवरील पुरस्काराच्या अंदाजावरही सट्टा लावणारे काही कमी नाहीत. जाणकारांच्या वर्तुळातही केनियन साहित्यिक न्गुगी वा भिओंगो, प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी, तसेच कॅनेडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड अशी आणखी काही नावांची चर्चा होती. तीन वर्षांपूर्वी ‘शांततेचे नोबेल पुरस्कार’ कैलाश सत्यार्थी यांना जाहीर झाल्यावर, खुद्द भारतातील जनतेला ‘कोण हे सत्यार्थी?’ असा प्रश्न पडला होता. आता जपानी लेखक हारुकी मुराकामीची या पुरस्कारासाठी चर्चा होत असताना, ‘काझुओ इशिगुरो हा कोण नवीन आला?’ असा खुद्द जपान्यांना प्रश्न पडला असणार. भारताला मात्र, रवींद्रनाथ टागोरांनंतर (१९१३) शंभर वर्षे उलटली, तरी इथल्या साहित्यसृष्टीत दुसरा ‘नोबेल’ मानकरी निपजलेला दिसत नाही.
‘हा एक भव्योदात्त असा सन्मान आहे. विशेषत: यासाठी की, मी आता जगातील सर्वोत्कृष्ट लेखकांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे, ही बाब अतिशय स्पृहणीय आहे,’ अशा शब्दांत पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरचा आनंद इशिगुरोने व्यक्त केला.
जपानमध्ये नागासाकी येथे १९५४ साली जन्मलेल्या काझुओच्या वडिलांनी आपले कुटुंब १९६०मध्ये इंग्लंडला हलविले. काझुओचे इंग्लिश माध्यमात ५व्या वर्षापासून शिक्षण सुरू झाले. पुढे सर्जनशील लेखनात एम.ए. करण्याच्या काळात माल्कम ब्रॅडवरी व अॅन्जेला कार्टर या शिक्षकांचे सान्निध्य लाभले. त्यांची आठ पुस्तके ४० भाषांत अनुवादित झाली आहेत. त्यांची ‘द रिमेन्स आॅफ द डे’ (१९८९) ही सर्वाधिक गाजलेली कादंबरी. त्यावर निघालेला सिनेमाही तितकाच गाजला. लॉर्ड डार्लिंग्टन यांच्या सरंजामी भव्य प्रासादाची सगळी देखभाल करणाºया स्टीव्हन्स या नोकराच्या जीवनाची ही कहाणी आहे. प्रथमपुरुषी निवेदनातून फ्लॅशबॅकद्वारे आपल्या जीवनाचे सारे पदर निवेदक उलगडत जातो. त्याच्याबरोबर २० वर्षे हाउसकीपर म्हणून काम केलेल्या सहकारी मिस केन्टन हिने आपल्या वैवाहिक जीवनाविषयी स्टिव्हन्सला लिहिलेल्या पत्राने कादंबरीची सुरुवात होते. आपले जीवन सुरळीत नसून, पुन्हा या बंगल्यात हाउसकीपर म्हणून रुजू होण्याची इच्छा ती व्यक्त करते. योगायोग असा की, या बंगल्याचे नवीन धनाढ्य मालक स्टिव्हन्सला पाच-सहा दिवस मोटारीने सफर करून येण्यास सुचवितो. केन्टनला भेटायची आयती संधीच त्याला मिळते. प्रवासादरम्यान भूतकाळातील घटना प्रसंग सांगताना, केन्टनबद्दल असलेले सुप्त आकर्षण लपून राहात नाही. दोघांनाही एकमेकांबद्दल जिव्हाळा होता, हे आता त्याला चांगले उमगायला लागते. ‘तुझ्याशी मी लग्न केले असते, तर माझे चांगले झाले असते,’ असे ती म्हणताच, त्याच्या मनात दडपलेल्या प्रेमभावना उचंबळून येतात. तो पुन्हा बंगल्यावर परततो. ३४ वर्षे आपण ज्या डालिंग्टनची सेवा केली, त्याच्यातही काही दोष होते. मनातल्या सुप्त, प्रेमभावना त्याच्यासाठी आपण दडपल्या याचा पश्चात्तापच होतो. औपचारिकतेच्या ब्रिटिश संस्कृतीमुळे प्रेम, जवळीक व सोबतीपासून दुरावल्याची रुखरुख त्याला डाचत राहते. भावना व्यक्त करणे म्हणजे प्रतिष्ठेशी जणू तडजोड करणे, ही ब्रिटिश मानसिकता माणूस म्हणून त्याला अपूर्ण ठरविणारी आहे, हे सत्य इथे मांडले आहे.
‘अ पेल व्ह्यू आॅफ हिल्स’ (१९८२) या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला ‘विनिफ्रेड हॉल्डबी अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. नंतर ‘अॅन आर्टिस्ट आॅफ द फ्लोटिंग वर्ल्ड’ (१९८६) ही महायुद्धानंतरच्या जपानविषयीची कादंबरी आहे. ही आणि : द विमेन्स आॅफ द डे’ या दोन्ही कादंबºयांनी अनेक निद्राहीन रात्रींची सोबत केली. अनिश्चितता, नैराश्य आणि उपरेपण यांनी घेरले असताना, यातल्या दोन्ही नायकांनी माझ्या अनोळखी ठिकाणचे अनोळखीपण अगदी नेमकेपणाने मांडले आहे, असे लेखक म्हणतो. १९९५ साली ‘द अनकनसोल्ड’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘व्हेन वुई वेअर आॅर्फन्स’ (२०००) ही कादंबरी कमी यशस्वी ठरली, तरी अपराधी भावना व निसटती अस्मिता लेखकाला कमालीची अस्वस्थ करून सोडते, याचे प्रत्यंतर इथे येते.
‘नेव्हर लेट मी गो’ (२००५) ही मानवी क्लोनिंग या विषयाची खुबीने हाताळणी करत, बोर्डिंग स्कूलमधल्या तीन किशोरवयीन मित्रांचे भावविश्व टिपणारी ही कांदबरी लक्षणीय ठरली. ‘द बरीड जायंट’ (२०१५) या कादंबरीत आर्थरीयन दंतकथेचा आधार घेऊन, एक्सल आणि बियाट्रिस या प्रौढ जोडप्याची कथा प्रेम, निष्ठा व विश्वास यांच्या धाग्यांनी विणलेली ही कादंबरी या दशकाची कादंबरी ठरली.
‘जेन आॅस्टिनची कॉमेडी आॅफ मॅनर्स आणि काफ्काची मानशास्त्रीय डूब यांचे मिश्रण म्हणजे इशिगुरो,’ असे स्वीडिश अकॅडमीच्या सारा डेनियस यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत काझुओ इशिगुरो म्हणतो, ‘मला आंतरराष्ट्रीय आशयाच्या कादंबºया लिहायच्या आहेत. आंतरराष्ट्रीय म्हणजे अशी एक जीवनदृष्टी, जी जगातील विविध पार्श्वभूमीच्या लोकांना मार्गदर्शक ठरेल.’
इशिगुरोच्या सर्वच लिखाणांत (कादंबरी, कथा, गीतरचना) दोन विश्वांतील द्वंद्व मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. आधुनिक-पारंपरिक, तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष, जपानी-अमेरिकन, पूर्व-पश्चिम इ. परस्परविरोधी जगातील ताणेबाणे टिपताना, माणसाच्या आजच्या दोलायमान, अनिश्चिततेने ग्रासलेल्या स्थितीला भूतकाळ आणि स्मृतींच्या आधारे स्थिरता देता येते, हेच इशिगुरोच्या साहित्याचे मर्म आहे, असे म्हणता येईल.