संभाजी मालिका संपल्यानंतर स्वप्निल राजशेखर म्हणतात...जे हाय ते हाय; जे न्हाई ते न्हाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:43 PM2020-03-03T16:43:53+5:302020-03-03T16:47:06+5:30
दोन वर्षे चाललेल्या या रोलने मला आणखी एक वेगळी ओळख दिली.. जे हाय ते हाय... प्रसिध्द झालं..
राजा शिवछत्रपती या आमच्या तुफान गाजलेल्या सिरीयल वेळीच संभाजी पुढचं प्रोजेक्ट असेल हे नक्की झालं होतं...
कधी सुरु होतंय याचीच आम्ही वाट पहात होतो.
मधे अमोल सोबत बोलणं व्हायचं तेंव्हा कधी ? हा प्रश्न सतत विचारायचो मी..
होतंय होतंय असं अमोलचं उत्तर..
पण मधे बराच काळ गेला जवळपास ८-९ वर्षे!
आणि एके दिवशी अमोलने सांगीतलं
संभाजी सुरु करतोय आपण; मीच निर्माता आहे.. तु हवायस...
मी होतोच..
जोरदार तयारी सुरु झाली. माझ्यासाठी हंबीरराव मोहिते निश्चित झाला होता. माझी लुक टेस्ट झाली. सगळं फायनल झालं. सुरुवातीचं एक शेड्युलही झालं ज्यात मी नव्हतो.
पण मग काही कारणाने मोठा गॅप गेला.. काही महिन्यांचा. आणि पुन्हा जेंव्हा ह्यझी मराठीह्ण साठी स्वराज्य रक्षक संभाजी सुरु झाली तेंव्हा मी वेगळ्या प्रोजेक्ट मधे अडकलो होतो.
हंबीरराव मोहिते करता आला नाही मला..
मी सिरीयलमधे असणार हे नक्की होतं; रोल पक्का होत नव्हता..
राजा शिवछत्रपती मधे मी केलेला नेताजी पालकरचा रोल यात पुन्हा कॅमियो म्हणुन करण्याबद्दल एकदा समीर-सचिनने विचारलं;
मी विचारपुर्वक नको म्हंटलं..
५-६ दिवसात रोल संपला असता आणि आम्हाला हवी तशी मजाही आली नसती!
सिरीयल सुरु झाली; खुप गाजत होती.. मला लोक विचारु लागले होते संभाजी मधे कधी येताय?
मीही वाट पहात होतो.
आणि सचिन गद्रेचा फोन आला..
गणोजी शिर्के करशील ?
म्हंटलं जे ब्बात!!!
गणोजी शिर्के बद्दल मला जुजबी माहिती होतीच. रोल महत्वाचा आहे, हॅपनींग आहे एवढं नक्की होतं!
फिक्स झालं..
सेटवर गेलो, गेटअप केला आणि पहिल्या दिवशी फक्त फोटोज काढुन ते ॲप्रुव्हलसाठी पाठवले गेले.. पण अमोल, कार्तीक, विवेकदादा, निर्मलसर आणि युनिटमधल्या सगळ्या एचओडीजच्या चेहऱ्यावर परफेक्ट कास्टींगचं दिसणारं समाधान जबाबदारी वाढवणारं होतं!
नेताजी पालकर आणि गणोजी शिर्के यांच्या रंगभुषेतवेषभुषेत फार मोठा फरक नव्हता; भाषेचा बाजही साधारण एकसारखा असणार होता..
पण दोन पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये पुर्ण वेगळी होती..
नेताजी पालकर राजांचा कडवा स्वराज्यनिष्ठ शिपाई; सेनापती,प्रतीशिवाजी..
तर गणोजी शिर्के राजेपण मिरवणारे, वतन राखण्यासाठी धडपडणारे, काहीसे आढ्यताखोर, थेट सडेतोड, थोडे अविचारी, पुढे स्वामीद्रोहाचा आळ आलेले..
हा फरक ठळक होणं गरजेचं होतं!!
मी पहिल्या सीनपासुन सरळ अंगीभुत राजशेखर उसळु दिले..
मग फार सायास करावे लागले नाहीत. चेहऱ्यावर आपोआप एक मग्रुरी उमटली; बोलण्याला तीरकस धार आली.. आणि मालिकेचे सरसेनापती प्रतापराव गंगावणेंनी दिलेली संवादांची तलवार होतीच सोबत..
दिग्दर्शक कार्तीक, विवेकदादा, निर्मलसर, अमोल, आणि सगळी तंत्रज्ञ- सहकलाकार मित्रमंडळी यांच्या साथीने सीन्स रंगु लागले..
विषय मोठा, खरतर मालिकेच्या आवाक्यात न मावणारा पण जिद्दीने आणि श्रध्देने काम करणारी संपु्र्ण टिम असल्याने मालिका बहरत गेली..
शिस्तबध्द, तन्मयतेनं काम करण्याची मजा और असते; जी राजा शिवछत्रपती करताना यायची तीच ईथेही मिळाली!
बरचसं युनिट दोन्हीकडे सारखं होतं हे आहेच पण यातला महत्वाचा खांब म्हणजे डॉ. अमोल कोल्हे..
अभिनेता, निर्माता म्हणुन त्याची उर्जा, अभ्यास, तंत्र, समर्पण, निष्ठा आणि परिणामस्वरुपी परफॉर्मन्स मधे येणारे डायनॅमिक्स हा एका वेगळ्या लेखाचा विषय!!
तर एकुण गणोजी रंगत गेला; त्याच्या तोंडी प्रतापदादा गंगावणेनी दिलेलं परवलीचं वाक्य जे हाय ते हाय; जे न्हाई ते न्हाई शुटींग सुरु झाल्याच्या पहिल्या दोन दिवसातच पुर्ण युनिटच्या तोंडी ऐकु येऊ लागलं तेंव्हाच अंदाज आला होता आणि पुढे दोन वर्षे चाललेल्या या रोलने मला आणखी एक वेगळी ओळख दिली..
जे हाय ते हाय... प्रसिध्द झालं..
प्रेक्षकाना भुमिका आवडली याची प्रचिती वेळोवेळी साधकबाधक प्रतिक्रीयेतुन मिळत आलीय.. आणखी काय हवं ?!
या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होतोय..
काही दिवसांपुर्वी शुटींग संपलं तेव्हाच हुरहुर लागली होती..
आज पुन्हा दाटुन येतंय..
असो..
पुन्हा नवं काही घेऊन लौकरच साथीने येऊ..
जय हो🙏🏼
- स्वप्निल राजशेखर