RIP Sridevi : ‘ती’च्या जाण्याचाही सोहळा होतो तेव्हा...!
By अतुल कुलकर्णी | Published: February 25, 2018 09:43 AM2018-02-25T09:43:18+5:302018-02-25T09:45:38+5:30
साऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला.
सौंदर्याच्या ज्या काही कथित व्याख्या असतील त्यात ‘ती’ चपखल बसणारी अशी नव्हतीही, गोबरे गोबरे गाल, बोलण्यात एक खट्याळपणा, अडखळ बोलण्याची ‘ती’ची स्वत:ची अशी एक वेगळी सवय, तरीही ‘ती’च्यात काहीतरी वेगळेपणा होता. सिनेमा कोणताही असो, त्यात ‘ती’चा रोल काहीही असो, पण लक्षात मात्र ‘ती’ रहायचीच.. अगदी जितेंद्रच्या सिनेमांमध्ये हंडय़ा, घागरींच्या भोवती नाचणं असो की कमल हसनसोबतचा सदमा.. ‘ती’ कायम आपल्या आजूबाजूला असायची. प्रत्येक भारतीयांच्या मनाच्या खोल कप्प्यात ‘ती’ने ‘‘ती’ची स्वत:ची अशी एक जागा स्वत: तयार करुन ठेवली होती. ‘ती गेली’ ही बातमी आली आणि त्या कप्प्यातल्या ‘ती’च्या अनेक भूमिकांनी समोर फेरच धरला...
साऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला. त्याचवेळी ‘ती’चे वेगळेपण बॉलीवूडच्या लक्षात आले. पुढे चार वर्षे ‘ती’ने हिंदीकडे पाठ फिरवली ऐवढे ‘ती’चे अन्य भाषिक चित्रपट सुरुच होते आणि मग चार वर्षानी #जितेंद्र सोबत ‘हिंम्मतवाला’ आला. तो काळ जितेंद्रचा होता. नाचगाण्याच्या पलिकडे हिरोईनला फार काही महत्व नसायचे. मात्र त्या सिनेमाने असे काही गारुड केले की ते पुढेही कायम राहीले. नंतर अनेक सिनेमे आले. पण प्रत्येक सिनेमात अनेक स्टार असूनही ‘ती’कायम लक्षात रहायला लागली. मग अमिताभच्या खुदागवाह मध्ये ‘तू ना जा मेरे बादशाह.. एक वादे के लिये.. एक वादा तोडके..’ म्हणणारी ‘ती’ अमिताभपेक्षाही काकणभर जास्त भाव खाऊन गेली...
वेगळे सिनेमे पाहण्यासाठी तयार झालेल्या भारतीयांचा काळ सुरु झाला आणि त्याचवेळी ‘ती’चा सदमा आला. 'सुरमयीं आखीयोंसे नन्हा मुन्ना एक सपना दे जारे...' असे म्हणत 'ती' आली... त्यातून स्वत:च्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या ‘ती’च्यासाठी पुढे पुढे भूमिका लिहील्या जाऊ लागल्या. #लम्हे, #चांदनी सारख्या सिनेमातून ‘ती’ने भारतीय महिलांची वेगळी प्रतिमा समोर आणली. ‘लम्हे’ हा त्या काळातला तसा बोल्ड सिनेमा होता. त्यावर टीकाही खूप झाली पण ‘ती’च्या अभिनयाविषयी कोणी चकार शब्द चुकीचा काढला नाही... चांदनीमध्ये ‘ती’ #ऋषीकपूर सोबत इतक्या सहजपणो वावरली की अनेक प्रसंगात ऋषीकपूर आखडून गेल्यासारखा दिसला. एका गाण्यात पाच पन्नास स्वेटर बदलणाऱ्या ऋषी कपूरपेक्षाही चार दोन प्लेन साड्यांचे लांबच लांब पदर हवेत उडवणाऱ्या ‘ती’ने ने जी प्रतिमा कायम कोरली ती कोरलीच...
मि. इंडिया हा खरे तर पूर्णपणे अनिलकपूरचा सिनेमा. मात्र त्यातही लक्षात राहीलही ‘ती’च... नंतर काही काळ ती पडद्याआड गेली. लोक फक्त ‘ती’च्या आठवणी अधूनमधून काढू लागले, मात्र पुन्हा अचानक ‘ती’ आली. ‘इंग्लीशविंग्लीश’ घेऊन. इंग्रजी न येणारी पण शिकण्याची धडपड करणारी ‘ती’ घराघरात गेली. याच काळात आपल्या मुलांना परदेशी पाठवणाऱ्या आईबापांची संख्या टीपेला गेली होती. त्यांच्यातला नेमका कमीपणा शोधत त्यावर मात करण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा घराघरात गेला नाही तर नवल...
या सगळ्या काळात कोणी ‘ती’च्या मेकअप बद्दल बोलायचे, कोणी ‘ती’च्या गाडीबद्दल आणि कपड्याच्या आवडीनिवडीबद्दल बोलायचे... जीवंतपणी दंतकथा बनण्याचे भाग्य ‘ती’ला लाभले होते. ‘ती’ चित्रपटसृष्टीतील लेडी अमिताभ होती... ‘ती’च्या असण्याचा एक आनंद असायचा... ‘ती’च्या वावरण्याचा एक उत्साह असायचा... ‘ती’ अवखळपणो बोलायची तेव्हा अंतरीच्या तारा झंकारायच्या... ‘ती’ जीवनावरचं गंभीर भाष्य करायची तेव्हा कोणीतरी मोठं माणूस चार अनुभवाचे बोल सांगतयं असं भासायचं... ‘ती’च्या असण्याचा ही सोहळा असायचा... आणि आज ‘ती’च्या नसण्याचाही सोहळा होतोय.. कारण ‘ती’ #श्रीदेवी होती...
जास्त काय लिहिणार...? एवढंच म्हणू शकतो....
ये लम्हे, ये मौसम, बरसो याद रहेंगे
ये मौसम चले गये तो, हम फिर याद करेंगे....