कणकेच्या मांड्यांची खवैय्यांना मोहिनी, कटाच्या आमटीनेही लावला चस्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:34 AM2017-08-29T01:34:42+5:302017-08-29T01:36:34+5:30
गौरी गणपतीमध्ये मोदका इतकाच महिमा आहे पुरणपोळीचा. त्यातही पुरणाच्या खान्देशी मांड्यांचा! पोळीपेक्षा मांडे अधिक प्रिय. कारण त्यात गोडवा कमी असतो आणि त्याचा आकार भव्य असतो.
- विशेष प्रतिनिधी
गौरी गणपतीमध्ये मोदका इतकाच महिमा आहे पुरणपोळीचा. त्यातही पुरणाच्या खान्देशी मांड्यांचा! पोळीपेक्षा मांडे अधिक प्रिय. कारण त्यात गोडवा कमी असतो आणि त्याचा आकार भव्य असतो. आजवर मैद्याचे मांडे सर्वज्ञात होते. परंतु येथील धात्रक फाटा येथे राहणाºया शोभाताई महात्मे यांनी कणकेचे मांडे ते ही भव्य स्वरुपात करण्याचा प्रयोग केला. त्याला स्वत: तयार केलेल्या मसाल्यातून साकारलेल्या कटाच्या आमटीची जोड दिली. या दोनही पदार्थांनी नाशिक व पालघर जिल्ह्यातल्या खवैय्यांना मोहिनी घातली आहे.
खापरावरचे आणि हातावर तयार केलेले मांडे ही खान्देशची खासियत. पुरणपोळी ही मूळ कर्नाटकाची. त्याचेच लोभसवाणे रुप म्हणजे खापरावरील मांडे. ते मैद्याचे बनविले जात असल्याने अनेकांना मैदा बाधतो. त्यामुळे मांडे काहीसे विस्मृतीत जमा होऊ लागले होते. त्यातही अॅल्यमिनिअमच्या पालथ्या कढईवर ते करण्याचा व त्यांचा आकार लहान करण्याचा शॉर्टकट काही भगिनींनी वापरायला सुरूवात केली. त्यामुळे मांड्यांचे रंग, रुप, चव, आकार सारेच लोप पावू लागले. त्यावर शोभनातार्इंनी कणकेचे मांडे ते ही खापरावर आणि तीन फूट परिघाचे करण्याचा प्रयोग दीड दशकापूर्वी यशस्वी केला. लोकवन वाणाच्या गव्हाची बारीक दळलेली कणीक अत्यंत सूक्ष्म सच्छिद्र असलेल्या वस्त्रातून गाळून घ्यायची. तिच्यामध्ये पुरेशा प्रमाणात मीठ घालून ती भिजवायची. कांडायची त्यात चक्कीत दळलेले वस्त्रगाळ पुरण भरायचे आणि हातावर मांडा साकारायचा. योग्य त्या प्रमाणात तापलेल्या खापरावर असे मांडे खरपूस भाजायचे. त्याला सुकी कोथिंबीर, लसूण, कांदा वापरून स्वत: घरी तयार केलेल्या मसाल्यातून केलेल्या कटाच्या आमटीची जोड द्यायची. असा हा प्रयोग. खवैय्यांना इतका आवडला की दिवसाकाठी कधी साठ तर कधी १०० मांड्यांची बुकींग करून खरेदी होऊ लागली. आंब्याच्या दिवसात रस आणि मांडे व सोबत कटाची आमटी असा मेनू जिल्ह्यातल्या घराघरात साकारतो. तो शोभातार्इंच्या मेहनतीतूनच. भारतीय खाद्य संस्कृतीतील लयाला जाऊ पाहणाºया खापरी मांड्याचे कणकेच्या अवतारातील नवे रुप शोधून व ते लोकप्रिय करून त्यांनी पाक संस्कृती संवर्धनाचे मोठे कार्य पार पाडले आहे.
त्यांचे पतीराज नांदुरी येथील सप्तश्रृंगी देवस्थानात सेवा करीत होते. त्यामुळे वास्तव्यही त्याच परिसरात होते. मांडेवाल्या मावशी म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु तो सर्व सेवाभाव होता. कुणीही भक्ताने सामग्री आणून द्यावी व त्यांनी त्याचे मांडे मोफत करून द्यावेत असाच परिपाठ सुरू होता. परंतु चिरंजीवांच्या नोकरीमुळे त्या नाशकात धात्रक फाटा परिसरात वास्तव्यास आल्या व त्यांच्याच नात्यातील एका गेट-टुगेदरसाठी त्यांनी हे मांडे आणि कटाची आमटी साकारली. तेव्हापासून सगळ्या जिल्ह्यातील खवैय्ये या दोन चिजांच्या प्रेमात पडले. हे प्रेम दिवसागणिक वाढतेच आहे.
मुलगा आणि सुनेला उत्तम नोकरी. घरात चिमुरडी नात श्रुती. स्वत: पन्नाशी पार केलेली असे सगळे सुखात असतांनाही या वयातही त्या अहोरात्र अन्नपूर्णेची साधना मांडे आणि कटाच्या आमटीच्या रुपाने करीत असतात. दिवसाकाठी १० ० मांडे करणे त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे.
सगळे जग इन्स्टंट च्या मागे लागलेले आहे. सगळे शॉर्टकट शोधत आहेत. रेडी टू इट, रेडी टू मेक ते ही टू मिनिटमध्ये अशा जमान्यात तुम्ही ही कष्टप्रद प्रक्रिया का शोधून काढली असे विचारल्यावर त्या सांगतात करणाºयाला होणाºया कष्टापेक्षा खाणाºयाच्या मनाला आणि पोटाला होणारा आनंद महत्वाचा. प्रत्येक पदार्थ हे साक्षात अन्नपूर्णेच रूप. पुरणाचा हातावर, खापरावर केलेला मांडा हे तर खान्देशी आणि मराठी खाद्यसंस्कृतीचे मानबिंदूच. ते पुन्हा एकदा सगळ्यांच्या आवडीला पात्र ठरताहेत. त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढते आहे. हे माझ्या दृष्टीने महत्वाचे. ज्यांच्याकडे वेळ नाही ते इन्स्टंटच्या मागे लागतात. पण माझ्या भरपूर वेळ आहे. व लेकीची आणि सुनेची साथ आहे. त्यामुळे मला हे करता आले. वस्त्रातून ही कणीक गाळण्यासाठी तासन्तास बैठक करावी लागते. मग ती मळतांनाही खूप जोर लागतो. त्यानंतर मग मांडे करतांना चुलीसमोरची बैठक. यात कष्ट खूपच आहेत. तसा आनंदही आहे. जेव्हा मी मांडे करीत असते तेव्हा त्याचा सर्वत्र पसरणारा घमघमाट व फोडणी बसताच आमटीचा निर्माण होणारा फ्लेवर कुणालाही आमच्या घराकडे खेचून आणतो. फॉईल पॅकिंगसारखे आधुनिक तंत्रही त्या मांडे पॅक करण्यासाठी वापरतात. त्यामुळेच त्यांच्या स्वयंपाक घरातील चूल ही स्वत:साठी नव्हे तर इतरांची रसना तृप्त करण्यासाठी सतत पेटती असते. सेवानिवृत्त असलेले पती मन्साराम सून ललिता आणि कन्या मीनाक्षी अशा त्रिवेणी संगमातून खान्देशच्या मांडे संस्कृतीची आराधना त्यांच्या घरी सतत सुरू असते. यापुढेही सुरू राहील.
सुकी कोथिंबीर, लसूण, कांदा वापरून स्वत: घरी तयार केलेल्या मसाल्यातून केलेल्या कटाच्या आमटीची जोड द्यायची. असा हा प्रयोग. खवैय्यांना इतका आवडला की दिवसाकाठी कधी साठ तर कधी १०० मांड्यांची बुकींग करून खरेदी होऊ लागली. आंब्याच्या दिवसात रस आणि मांडे व सोबत कटाची आमटी असा मेनू जिल्ह्यातल्या घराघरात साकारतो. तो शोभातार्इंच्या मेहनतीतूनच.