Blog : सुनील छेत्री! भारतीयांच्या कौतुकाला, प्रेमाला मुकलेला 'खरा' नायक
By स्वदेश घाणेकर | Published: June 23, 2023 10:11 AM2023-06-23T10:11:41+5:302023-06-23T10:13:47+5:30
unsung hero Sunil Chhetri! जगात केवळ चार फुटबॉलपटू आहेत, ज्यांनी ९० किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल्स केले आहेत.. या चारमध्ये एक भारतीय आहे आणि तो म्हणजे कर्णधार सुनील छेत्री...
भारत-पाकिस्तान सामना म्हटला की प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते... वातावरणात जोश कम तणाव जाणवतो.. कारण शेजाऱ्यांमधील संबंधच तसे आहेत.. बुधवारी २१ जूनला बंगळुरू येथील कांतिरावा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान लढत झाली, परंतु त्यात तो उत्साह जाणवला नाही. कारण, ती क्रिकेटची किंवा हॉकीची मॅच नव्हती, तर 'साधी' फुटबॉल मॅच होती... सॅफ चॅम्पियन्सशिप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे आणि पहिल्याच सामन्यात त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४-० असे नाक घासायला लावले... सुनील छेत्री या विजयाचा नायक ठरला... त्याच्या तीन गोल्सने पाकिस्तानच्या बचावफळीच्या चिंधड्या उडवल्या.. तात्पुरतं कौतुकही झालं अन् नंतर चाहते आपापल्या कामाला लागले... ही क्रिकेटची मॅच थोडीच होती की ज्याची चर्चा दोन-तीन दिवस होईल... ना सुनील छेत्री हा विराट कोहलीसारखा कुणी सेलिब्रेटी आहे...
आज जगातील दोन फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांचे भारतात जेवढे चाहते आहेत, तेवढे सुनील छेत्रीचेही नसतील... कारण आपल्याला स्वतःच्या घरापेक्षा शेजारच्या घरात काय चाललंय याची माहिती अधिक असते... सुनील छेत्रीने पाकिस्तानविरुद्ध तीन गोल्स करून रोनाल्डो आणि मेस्सी या सुपरस्टार्सच्या पंक्तीत स्थान पटकावले. जगात.. बरं का जगात केवळ चार फुटबॉलपटू आहेत, ज्यांनी ९० किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोल्स केले आहेत.. या चारमध्ये एक भारतीय आहे आणि तो म्हणजे कर्णधार सुनील छेत्री... पण, त्याचं कौतुक आपल्याला कुठंय... रोनाल्डोने परवा आईसलँडविरुद्ध गोल करून विजय मिळवला, त्याचं कौतुक आपल्याला अधिक वाटतं, परंतु आपल्या कर्णधाराचं नाही...
३ ऑगस्ट १९८४ मध्ये सिकंदराबाद येथील सुनीलचा जन्म... त्याचे वडील के बी छेत्री हे भारतीय सैन्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स होते. ते भारतीय सैन्याच्या फुटबॉल संघाकडून खेळायचे. त्याची आई सुशीला या नेपाळच्या महिला राष्ट्रीय संघाच्या माजी खेळाडू होत्या आणि त्यांचे पाचही भाऊ फुटबॉल खेळायचे. घरच्यांकडूनच त्याला फुटबॉलचं बाळकडू मिळालं. 'Asian Icon' म्हणून गौरविण्यात आलेल्या सुनीलवर फिफा या जागतिक फुटबॉल संघाने 'Captain Fantastic' नावाची डॉक्युमेंट्री तयार केली. पण, भारतीय चाहत्यांना क्रिकेटपलीकडील गोष्टींची पर्वा नाही. त्याला २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २०२१मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. खेलरत्न पुरस्कार जिंकणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे. तरीही त्याच्यावर भारतीय चाहत्यांची कौतुकाची थाप पडलेलीच नाही...
शांत, मनमिळाऊ आणि भारतीय फुटबॉलसाठी दूरदृष्टी असलेला कर्णधार असं सुनीलचं वर्णन केलं तर चुकीचं ठरणार नाही. बायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉलपटूंना स्वप्न पाहण्यास शिकवले, तर सुनीलनं ते सत्यात कसं उतरवायचं हे शिकवलं... २-३ वर्षांचा असतानाच घरच्यांना कळलं की हा फुटबॉलपटू बनणारा... चेंडू दिसला की मार किक... असा सुनील होता... लहानपणी तो घरात अशाच करामती करायचा, त्यामुळे वस्तूही तुटायच्या अन् त्याला मारही खावा लागायचा... १९९६ मध्ये त्याची भेट सोनू लांबा याच्याशी झाली... सुरुवातीला सोनूला सुनील प्रतिस्पर्धी वाटला, परंतु त्याचा खेळ पाहून तोही प्रभावित झाला.. या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. Milo स्पर्धा होती आणि त्यातील सर्वोत्तम खेळाडूला १५०० रुपये मिळणार होते. सुनील सलग तीन वर्ष सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला अन् मिळालेल्या पैशांतून त्याने स्वतःसाठी व वडीलांसाठी फुटबॉल शूज खरेदी केले...
मोहन बागान या भारतातील सर्वात जुन्या फुटबॉल क्लबने २००२मध्ये सुनीलला संधी दिली.. या क्लबकडून खेळायला मिळावे हे प्रत्येक फुटबॉलपटूचं स्वप्न होतं. या क्लबने सुनीलला अकादमीत दाखल होण्यासाठी बोलावले आणि ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण, तेव्हाही फुटबॉलमध्ये करियर होऊच शकत नाही, ही भावना होती आणि त्याच्या वडिलांनी त्याला सैन्यात दाखल करण्याचे ठरवले होते. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतः सुनीलचा खेळ पाहिला तेव्हा त्यांचं मत बदललं... १७व्या वर्षी सुनीलला मोहन बागानने करारबद्ध केलं. त्यानंतर सुनीलने मागे वळूनच पाहिले नाही...
असा घडला सुनील...
मोहन बागान-जेसीटी-ईस्ट बंगाल-डेम्पो-कनसास सिटी-चिराग युनायटेड-मोहन बागान-सोर्टिंग सीपी बी-चर्चिल ब्रदर्स-बंगळुरू एफसी-मुंबई सिटी एफसी-बंगळुरू एफसी... असा त्याचा क्लब फुटबॉलमधील अविश्वसनीय प्रवास राहिला. सुनीलने प्रचंड मेहनत घेत भारतीय फुटबॉलमध्ये स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. इंडियन सुपर लीगदरम्यान सुनीलसोबत जेव्हा जेव्हा भेटण्याची, बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा भारतीय फुटबॉलसाठी त्याची दूरदृष्टी जाणवली... फुटबॉल, फुटबॉल या पलीकडे तो विचारच करू शकत नाही... त्याच्या खेळाने आणि दूरदृष्टीने प्रभावित होऊन आज उदांता सिंग, लालिआंझुला छांग्टे, लिस्टन कोलासो, लालेंगवामविया राल्टे... आदी युवा पिढी घडली आणि त्यांच्या हाती भारतीय फुटबॉल सुरक्षित, आश्वासक दिसतेय...
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसरा खेळाडू, भारताकडून सर्वाधिक सामने, सर्वाधिक गोल, सर्वाधिक ४ हॅटट्रिक, AFC स्पर्धेत सर्वाधिक १९ गोल्स करणारा भारतीय, त्याच्यामुळे भारताने २००७, २००९ व २०१२ मध्ये नेहरू कप जिंकला. २०११, २०१५ व २०२१ मध्ये SAFF चॅम्पियनशीप जिंकली. त्याने २००८मध्ये AFC चॅलेंज कप जिंकून भारताला २७ वर्षांनंतर AFC Asian Cup मध्ये प्रवेश मिळवून दिला. AIFF चा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार त्याने सात वेळा जिंकला आहे. असे अनेक विक्रम करणाऱ्या सुनील भारतीय चाहत्यांच्या कौतुकाला मात्र मुकत आलाय अन् अजूनही तो उपेक्षितच आहे.