‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ : औद्योगिक सुरक्षिततेकडे नेणारा ‘आर्य अष्टांगिक मार्ग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:40 IST2019-03-08T12:25:57+5:302019-03-08T12:40:23+5:30
‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.

‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ : औद्योगिक सुरक्षिततेकडे नेणारा ‘आर्य अष्टांगिक मार्ग’
‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.
कारखान्यांशी निगडित विविध बाबींपैकी ‘कामगारांची सुरक्षितता’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपघात कोणताही असो; तो दु:ख देणाराच आहे. या अपघातरूपी दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान बुद्ध यांचा ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ आहे. हा मार्ग औद्योगिक सुरक्षिततेकडे नेणारा आहे.
या मार्गाची आठ अंगे ही सम्यक् दृष्टी, संकल्प, वाचा, कर्मान्त, आजीविका, व्यायाम (प्रयत्न), स्मृती, समाधी असे आहेत. कारखाना अपघातमुक्त असावा, अशी कारखानदारांची भूमिका असणे. कारखान्याची दोषमुक्त यंत्रसामग्री, जागरूक यंत्रणा, सुरक्षा धोरण निश्चित करणे. यंत्र अथवा प्रक्रियेपासून काहीच इजा होणार नाही, हा समज काढून टाकणे.
यंत्र, रसायनांचे धोकादायक गुणधर्म दृष्टीसमोर ठेवून काम करणे. त्या वस्तुस्थितीची सतत जाणीव ठेवणे म्हणजे सम्यक् दृष्टी आहे. खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड या बाबी कारखान्यातील वातावरण अस्थिर, असुरक्षित करतात. कारखानदाराने धोकादायक स्थितीची सत्य माहिती देणे; व्यवस्थापन, कामगारांत मित्रत्वाचे संभाषण, वैचारिक देवाणघेवाण ही कारखान्यात सुरक्षिततेचे वातावरण राहण्यास मदत करते.
इतरांना आपल्यामुळे त्रास, इजा होईल अशा वागण्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे, मालमत्ता अथवा यंत्रसामग्रीची हानी होईल, अशा कृतीपासून दूर राहणे, शॉर्टकट पद्धती न वापरता प्रामाणिकपणे निर्धारित कार्यप्रणालीचा वापर करणे; व्यवस्थापनाने सुरक्षा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशील राहणे हा सम्यक कर्मान्त आहे.
वेळ, श्रम वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने यंत्राच्या हाताळणीपासून कामगारांनी दूर राहणे आवश्यक आहे. कारखानदाराने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ नफा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवणे हे धोकादायक आहे. सचोटीने कारखाना चालविणे आवश्यक आहे. जनजागृती, प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, नियमांची वारंवार उजळणी, संयंत्रांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. कामावर असताना अमली पदार्थांचे सेवन आपली सतर्कता नष्ट करते. कामाच्या ठिकाणी सभोवतालच्या असुरक्षित परिस्थितीबाबत जागरूक असणे अपघात टाळू शकते व त्यातूनच सुरक्षितता जोपासली जाते.
- सि. वि. लभाणे
सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर.