अष्टांग योग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:01 AM2018-09-17T00:01:54+5:302018-09-17T00:02:02+5:30
योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे.
- शशी सर्वेश
योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागांमध्ये करण्यात आले आहे. ‘‘योगाची आठ अंगे’’ यम, नियम, आसन, प्राण्यायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात. व्यक्तीला आरोग्य, तंदुरुस्ती, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत.
यम : यम म्हणजे योगसाधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे. यम पाच आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह.
अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे. सत्य म्हणजे खरेपणा. योगसाधकाने कायम स्वत:प्रती तसेच इतरांप्रती खरे राहिले पाहिजे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. याचा अर्थ आपल्या मालकीचे नाही ते आपण घेऊ नये. ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम. याची मदत होते ती आपली व्यसने व टोकाच्या सवयींचे बंध तोडण्यामध्ये यासाठी धैर्य आणि इच्छाशक्तीची गरज भासते. अपरिग्रह म्हणजे लोभ सोडणे. याचा अर्थ आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरीत्या, मानसिकरीत्या व भावनिकरीत्या त्याग करणे.
नियम : स्वत:चे निरीक्षण करून स्वत:बद्दल अधिकाधिक जागरूक होण्यासाठी आपल्यातच असलेला एक आरसा आहे. नियमाच्या पाच शाखा आहेत. सौच, संतोष, तापस, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान. सौच : हे वातावरणाचे अंतर्गत व बाह्य शुद्धीकरण आहे. आपल्यामध्ये व आपल्या आजूबाजूला कशामुळे अशुद्धी निर्माण होते ते शोधून त्याचा नाश करण्याचा हा मार्ग आहे. संतोष : समाधानी राहता आले तर आपली हाव कमी होते, आपल्या लालसा आणि गरजा कमी होतात. तापस : तापस हा स्वयंशिस्तीचा आणि हिमतीचा सराव आहे. स्वाध्याय : स्वाध्याय म्हणजे स्वत:चा अभ्यास करणे. ईश्वरप्रणिधान : याचा अर्थ आहे. एकनिष्ठता आणि दिव्यत्वाला शरण जाणे.
आसन : आसने म्हणजे आपले शरीर लवचिक, तंदुरस्त आणि कणखर राखण्यात मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती. शरीर आणि मनातील समायोजन व समतोल समजून घेण्याच्या तसेच त्याचा सराव करण्याच्या या पद्धती आहेत.
प्राणायाम : प्राणायाम हा शब्द दोन शब्दांचा संधी आहे- प्राण आणि आयाम. हा श्वासांना स्थिर हालचालींशी जोडण्याचा सराव आहे.
प्रत्याहार : प्रत्याहार म्हणजे अनावश्यक किंवा सकारात्मक वाढ आणि विकासात अडथळा आणणाºया सर्व गोष्टींतून आपल्या संवेदना काढून घेण्याची पद्धत. मनाची प्रतिकारशक्ती बळकट करण्यात याचा उपयोग होतो. हे अंग ध्यानाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे.
धारणा : धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. धारणा म्हणजे व्यक्तीने तिचे लक्ष एका बिंदूवर, अविचलितपणे एकाग्र करणे.
ध्यान : ध्यान म्हणजेच मेडिटेशन. ध्यान म्हणजे कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष मनावर केंद्रित करणे. यात शरीर विश्रांती घेत असेल पण मन मात्र सावध आणि एकाग्र असते, अगदी बारीक तपशीलही नोंदवून घेत असते.
समाधी : समाधी ही अवस्था आहे धन्यता आणि आनंदाची. ही अखेरची अवस्था आहे आणि योगाभ्यासातील अखेरचा टप्पा आहे. याचा अर्थ कायमस्वरूपी अत्यानंदाची अवस्था असा नाही. खरे तर ही परिपूर्तीची अवस्था आहे.
योगाच्या या आठ अंगांमध्ये प्रावीण मिळवणे कठीण आहे पण कोणत्याही व्यक्तीसाठी हे अशक्य नाही. ही अंगे आपल्याला अधिक सचेतन आणि जागरूक होण्यात मदत करतात.
(लेखक योगतज्ज्ञ आहेत)