डेंग्यूची साथ उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव उघड, इलाज चालतो, मग निदान का नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 03:47 PM2017-10-10T15:47:12+5:302017-10-10T15:48:47+5:30
डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपणे उच्चारण्याची हिंमत करणार नाही.
गणेश देशमुख
अमरावती : डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे ९ रुग्ण दाखल असल्याची प्रामाणिक माहिती माध्यमांना दिल्याच्या 'गंभीर गुन्ह्या'स्तव डॉ. मनोज निचत यांच्याभोवती शासकीय आरोग्य अधिका-यांनी एकत्रितपणे असा काही फास आवळला की, यापुढे कुणी खासगी डॉक्टर 'डेंग्यू' हा शब्दही जाहीरपणे उच्चारण्याची हिंमत करणार नाही.
डॉ. निचत यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून खरे तर डेंग्यूची साथ उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव अमरावतीकरांसमोर आले. उद्देश नसला तरी महापालिकेच्या आरोग्य खात्याचा नाकर्तेपणा त्यातून ओघानेच उघडा पडला नि महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनाही 'डेंग्यूचा डंख' झाला.
तळमळलेल्या नैताम यांनी मग 'कोणत्या वैद्यकीय शास्त्राच्या आधारे तुम्ही 'डेंग्यू' झाल्याचे निश्चित निदान केले,' अशी खरमरीत नोटीसच एमडी मेडिसीन असलेल्या डॉ. निचत यांना बजावली. जोपर्यंत यवतमाळच्या सेंटिनेल सेंटरमधून डेंग्यू झाल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत डेंग्यू झाल्याचे निदान होत नाही, असा तर्क या नोटिशीतून देण्यात आला. यवतमाळच्या शासकीय प्रयोगशाळेतून तसा अहवाल आला नसल्यामुळे २४ तासांत खुलासा सादर करा अन्यथा कायदेशीर कारवाईस तयार राहा, असेही नोटिशीतून बजावले गेले.
मुद्दा असा उपस्थित होतो की, खासगी डॉक्टरांनी केलेले डेंग्यूचे निदान महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना मान्य नसेल तर त्याच निदानानुसार रुग्णांवर सुरू असलेले औषधोपचार त्यांना मान्य कसे? डॉ. निचत यांना ज्या नऊ डेंग्यू रुग्णांचे निदान केल्यामुळे महापालिकेने नोटीस बजावली, त्या सर्व रुग्णांवर डॉ. निचत हे डेंग्यूसाठीचाच औषधोपचार करीत आहेत. वैशिष्ट्य असे की, त्या औषधोपचाराने रुग्णांची प्रकृती सुधारलीदेखील. नऊपैकी आठ जणांना इस्पितळातून सुटीही झाली. (अर्थात् नेमक्या निदानासाठी शासनाचा रक्ततपासणी अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे, हा भाग वेगळा)
शासनाचा रक्ततपासणी अहवाल येईपर्यंत डेंग्यू असल्याचे सांगाल तर खबरदार, असे खासगी डॉक्टरांना बजावणा-या सीमा नैताम यांना एक विचारावेसे वाटते, तुमच्या हद्दीतील तमाम खासगी इस्पितळांमध्ये सुरू असलेल्या डेंग्यूच्या औषधोपचारावर तुमचा जराही आक्षेप नाही, मग निदानावरच तेवढा का?
सांगा ना, तुम्ही काय कराल ?
खासगी डॉक्टरांच्या तपासण्या अविश्वसनीय असल्याचे आणि त्याचमुळे डेंग्यूचे निदानही अनधिकृत असल्याचे बैठकीत शिक्कामोर्तब करणारे प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी अमरावतीकरांना हे सांगतील का, की डेंग्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्यास यवतमाळचा अहवाल येईपर्यंत खासगी डॉक्टरांकडून डेंग्यूचा इलाज घ्यायचा की नाही? अहवाल यायला आठ दिवस असतील तर इलाजाविनाच मृत्यूची प्रतीक्षा करायची काय? महापालिकेतील बैठकीला उपस्थित असलेल्यांनाच जर कधी डेंग्यू झाल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले तर त्यांची नेमकी आदर्श वागणूक काय असेल? शासनाच्या रक्तजल तपासणी अहवालाची आठवडाभर ते प्रतीक्षा करतील, की मग तुम्ही डेंग्यू सांगितलाच कसा यास्तव खासगी डॉक्टरांना नोटिशी बजावतील? मरण येऊ नये म्हणून इलाज जर तुम्ही घेणार असाल, तर सामान्यांना वेगळा न्याय का?