निर्णय ठरला जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:18 AM2018-04-19T02:18:11+5:302018-04-19T02:18:11+5:30
रोज न चुकता ८ च्या ठोक्याला अर्णव सगळं आवरून ब्रेकफास्टसाठी खाली यायचा.
स्वाती गाडगीळ|
अर्णव फक्त ३६ वर्षांचा होता. तीन वर्षांपूर्वी एके दिवशी अचानक त्याच्या पाठीत कळ उठली. त्याला अंथरुणावरून उठताच येईना. भीतीने त्याला घाम फुटला. आज त्यानेच आॅफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग लावली होती. पाठीत उठणारी कळ जिव्हारी लागत होती. तेवढ्यात, उज्ज्वला त्याला उशीर का होतोय, ते बघायला बेडरूममध्ये आली.
रोज न चुकता ८ च्या ठोक्याला अर्णव सगळं आवरून ब्रेकफास्टसाठी खाली यायचा. मग आज काय झालं? त्याला अंथरुणात तळमळताना पाहून उज्ज्वलाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने ताबडतोब फॅमिली डॉक्टरांना फोन लावला व घाबऱ्या, थरथरत्या आवाजात काहीतरी सांगितलं. डॉक्टरांना एवढंच कळलं की, अर्णवला उठता येत नाहीय. ते कार्डिओग्रामचं मशीन व औषधांची बॅग घेऊन तातडीने घरी आले. त्याला तपासून व ईसीजी काढून झाल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘आता दुखणं कमी करण्यासाठी इंजेक्शन दिलं आहे, पण एमआरआय करावा लागेल, असं वाटतंय. मी तुम्हाला एका अनुभवी डॉक्टरांसाठी चिठ्ठी लिहून देतो. लवकरच त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटून या. काय म्हणतात ते सांगा मला. पुढचे १५ दिवस त्या कुटुंबावर काय बेतलं, ते सांगायला शब्द अपुरे पडतील. बरेच तपास करण्यात आले आणि त्याच्या आजाराचं निदान ‘स्वादूपिंडाचा कर्करोग’ व तोही अंतिम अवस्थेतला, असं झालं.
त्याचा आजार गंभीर स्वरूपाचा होताच, शिवाय मणक्यात व अन्य हाडांमध्ये पसरल्यामुळे इलाजाचे मार्ग सीमित होते. सगळं करूनदेखील शेवट हाती काय लागेल, हे अगदी देशातील पहिल्या नंबरचं मानल्या जाणाºया कर्करोगाच्या हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनासुद्धा सांगता येत नव्हतं. केमोथेरपी सुरू झाली. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. मानसिक बळ तर खचलं होतंच.
एक आठ वर्षांची गोड मुलगी होती, अर्णवला. उज्ज्वला पण नोकरी करत होती. पगार बेताचाच होता. त्याचे वडील खाजगी कंपनीतून निवत्त झाले होते. सगळी सोंगं घेता येतात, पण पैशांचं नाही. तरीसुद्धा त्यांनी मुंबईतील कर्करोगाच्या इलाजासाठी प्रसिद्ध रुग्णालयात इलाज चालू ठेवला. सगळ्या केमोथेरपीच्या सायकल्स संपल्यावर ते घरी परतले. शेवटच्या दिवशी डॉक्टरांनी जवळजवळ अर्धा तास अर्णव, उज्ज्वला व त्याच्या वडिलांना पुन्हा एकदा परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगितलं. पुढील इलाज व फेरतपासण्यांसाठी येण्याबद्दल तपशील लिहून दिला. ‘सध्या तरी परिस्थिती शक्य तेवढी आटोक्यात आणली आहे, पण खबरदारी घ्यावी लागेल’, डॉक्टरांनी पुन्हा उज्ज्वला व तिच्या सासºयांना बजावून सांगितलं. भेटायला परवानगी नाहीये सांगूनही घरी आल्यावर पाहुण्यांची रीघ लागली होती. कशीबशी उज्ज्वला सगळी पथ्ये सांभाळत होती. येणारी प्रत्येक व्यक्ती नवीनच सल्ला देऊन जायची, तो वेगळा ताप. तशातच सासºयांचा मित्र त्यांना एका डॉक्टरचा नंबर देऊन गेला. म्हणे, मणक्याच्या शस्त्रक्रिया उत्तम करतात व अर्णवच्या मणक्यातील गाठी ते नक्कीच काढू शकतील.
सासरे कुणालाही न विचारता त्याची फाइल घेऊन जवळच्या छोट्या निसर्ग होममध्ये गेले, जिथे ते डॉक्टर भेटणार होते. सगळी फाइल तपासून झाल्यावर ते डॉक्टर म्हणाले की, अर्णवची आतापर्यंत झालेली ट्रीटमेंट नक्कीच योग्य रीतीने झाली आहे. देशातील सर्वोत्तम रुग्णालयात तो होता त्यामुळे त्याच्या आजारावर सगळ्यात उत्तम इलाज झाला होता. पण, तरीही जर रुग्ण व नातेवाइकांची संमती असेल व मणक्यातल्या त्या गाठी काढून, रॉड घालून मणके स्थिर करण्यासाठी असणारी शस्त्रक्रिया करून घेण्याची तयारी असेल, तर ते नवे डॉक्टर ती शस्त्रक्रिया करण्यास तयार होते. त्यात जीवाला धोका आहे हे देखील समजावून सांगितले. अर्णवच्या घरच्यांनी शस्त्रक्रिया करून घेण्याचा जवळजवळ निर्णय पक्का केला होता. आता फक्त कार्डिओलॉजिस्ट व फिजिशिअनला दाखवायचे होते. पण, दोघांनीही त्यांना शस्त्रक्रिया करणे जीवघेणे ठरू शकते, असे सांगितले. तेव्हा उज्ज्वलाची एक मैत्रीण, जिला काही वर्षांपूर्वी मी भूल दिली होती, ती उज्ज्वलाला माझ्याकडे घेऊन आली. मी देखील एवढेच सांगितले की, ज्या मोठ्या व प्रख्यात रुग्णालयात सुरुवातीपासून इलाज केला, त्यांनी दिलेला सल्ला डावलून तुम्ही वेगळं काही करावं, हे मला योग्य वाटत नाही. जर शस्त्रक्रिया करणे फायद्याचे असते तर त्या रुग्णालयातील तज्ज्ञांनी नक्कीच ती केली असती व त्यांच्या कुशलतेवर संशय घेण्याचे कारण नाही. कर्करोगाचे अनेक तज्ज्ञ तिथेच असतात .
तेव्हा, जीवास धोका सांगून केल्या जाणाºया शस्त्रक्रिया संमती देताना किमान एकदा तरी पहिल्या रुग्णालयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते. शेवटी, निर्णय तुमचा राहील. तुम्हाला घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये इलाज करायचा आहे, दळणवळणाचा प्रश्न, राहण्याचा प्रश्न, रुग्णांची रीघ, या समस्या जरी खºया असल्या तरी एवढा मोठा निर्णय घेताना गाफील राहू नका’. अर्णव व त्याच्या कुटुंबीयांनी कुणाचाच सल्ला मानला नाही व आॅपरेशनचा दिवस उजाडला. अर्णवला आॅपरेशन थिएटरमध्ये घेतले. जवळजवळ सात तास तो आॅपरेशन थिएटरमध्ये होता. शस्त्रक्रिया संपवून त्याला आयसीयूमध्ये आणले. तो व्हेंटिलेटरवर होता. तोंडातून श्वासनलिकेत नळी घातलेली होती व डोळ्यांना पट्टी लावली होती. उज्ज्वलाचं मन थाºयावर नव्हतं. त्याचं ब्लडप्रेशर वर येत नव्हतं. हृदयाचे ठोके पण नियमित नव्हते. काहीही होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पराकोटीचे प्रयत्न सुरू होते, पण शेवटी नको तेच झाले. आॅपरेशननंतर अवघ्या सहा तासांत अर्णवने हार मानली. त्याची प्राणज्योत मालवली होती. हॉस्पिटलने बिलामध्ये थोडी सूट दिली, तरीसुद्धा बरीच मोठी रक्कम भरावी लागली.
अर्णवने व त्याच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींनी सगळं समजून सह्या केल्या होत्या. आता त्यांच्यापाशी स्वत:च्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप करण्यापलीकडे काहीच उरलं नव्हतं. ज्याच्यासाठी सगळा अट्टहास केला, तोच आता त्यांच्याजवळ नव्हता. असे महत्त्वाचे निर्णय घेताना एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवावी, ती म्हणजे आपल्या रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही.
दुर्धर आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या किंवा त्या विषयातील जाणकार मित्रांच्या निर्णयाने चालत असते. ज्या व्यक्तीला स्वत:चं मरण समोर दिसत असतं, त्याने दुसरे काय करावे. हट्ट करणे, जिद्द करणे, कधी बंड करणे एवढेच! पण जी व्यक्ती आशेचे किरण दाखवेल, तिचे म्हणणे खरेच असेल, असे ठामपणे मान्य करण्याची मानसिकता असते व तिथेच धोका होतो.
इच्छामरण मागणाºया व्यक्तींनासुद्धा जीवन संपवण्याची परवानगी मिळत नाही. इच्छामरण अर्थात युथनेसियासाठीचा कायदा भारतात अजून पारित झालेला नाही. प्रत्येक जीव मोलाचा आहे आणि जीवन संपवण्याचा अधिकार कुणालाच नसतो. तसे केल्यास आत्महत्या किंवा हत्या मानून त्याची भारतीय दंडविधानातील कलमं लावली जातात. अर्णवच्या बाबतीत जे घडलं ते जरी कायद्याच्या दृष्टीने दंडनीय अपराध या चौकटीत बसलं नाही, तरी काही प्रश्न नक्कीच झोप उडवतात. अपराधाची भावना मनात घर करून राहते. असा निर्णय घेताना आपण चूक तर नाही केली ना? आॅपरेशन केलं नसतं तर अजून काही महिने, काही वर्षं, अर्णव जगला असता का? का बरं आपण पहिल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मिळालेली ट्रीटमेंट व सल्ला मानला नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात.
काही आजारच इतके भयानक आहेत की, त्यांचे नाव घेतले तरी पोटात भीतीचा गोळा येतो. त्या आजाराने ग्रस्त व्यक्तींची काय अवस्था असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. रुग्ण हा कुटुंबातील ज्येष्ठ किंवा जाणकार व्यक्तीच्या निर्णयाने चालतो. मात्र, हे निर्णय नेहमी बरोबर ठरतातच, असे नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना आधी घेतलेल्या उपचारांचा आढावा घ्या आणि आपण आपल्या रुग्णाच्या जीवाशी खेळत नाही ना, हा विचार करा. लाखमोलाचे जीवन संपवण्याचा अधिकार कुणालाच नाही.
swats7767@gmail.com
(लेखिका प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहे.)