फोनवरची डॉक्टरगिरी नको रे बाबा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 04:25 AM2018-09-17T04:25:48+5:302018-09-17T04:26:32+5:30

मोबाइल हातात असताना डॉक्टरकडे जाण्याची गरज काय या भावनेने हल्ली बरेच जण फोनवरून डॉक्टरांना थोडक्यात आजार सांगतात आणि औषधं विचारतातं, व्हॉट्सअ‍ॅप करायला सांगतात.

Do not you want to be a doctor? | फोनवरची डॉक्टरगिरी नको रे बाबा...

फोनवरची डॉक्टरगिरी नको रे बाबा...

Next

- डॉ. स्वाती गाडगीळ

मोबाइल हातात असताना डॉक्टरकडे जाण्याची गरज काय या भावनेने हल्ली बरेच जण फोनवरून डॉक्टरांना थोडक्यात आजार सांगतात आणि औषधं विचारतातं, व्हॉट्सअ‍ॅप करायला सांगतात. काही डॉक्टर यावर रिप्लाय देतात तर काही नाही. काही जण तर सरळ केमिस्ट गाठून त्यांच्याकडे औषध मागतात. असा उपद्व्याप जिवावर बेतू शकतो हे समजत नाही यांना. परंतु कायद्यानुसार डॉक्टरांनी पेशंटला तपासल्याशिवाय फोनवर सल्ला देणं, मेसेजद्वारे औषधं लिहून देणं किंवा केमिस्टला औषधं द्यायला सांगणं, डॉक्टरांना भलतंच महाग पडू शकतं. फोनवरची डॉक्टरगिरी ही डॉक्टर आणि पेशंटला संकटात टाकू शकते. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीला दुसरा पर्याय नाही हे त्रिवार सत्य आहे.

अनुराधाचा सकाळी सात वाजता मला फोन आला. ‘डॉक्टर, यांना आता एक मोठी उलटी झाली. खूप कसंतरी होतंय. काय करू ?’ मी तिला एक-दोन प्रश्न विचारले पण ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन ये नवऱ्याला, हे अगदी निक्षून सांगितलं. तशी म्हणाली, ‘नाही हो, हॉस्पिटलमध्ये येण्याएवढा त्रास नाहीये त्यांना. तसे ठीक आहेत. तुम्ही फोनवर सांगा ना काहीतरी औषध. नाहीतर असं करा प्लीज, व्हॉट्सअ‍ॅपवर लिहून पाठवा म्हणजे ते केमिस्टला दाखवून औषध घेता येईल. चूक नाही होणार आणि मला तशीही तुमची प्रिस्क्रिप्शन्स कळतच नाहीत!’ वर हसली.
आम्हा डॉक्टरांना वैद्यकीय अभ्यासाइतकंच महत्त्वाचं असतं, संयम राखण्याचं ट्रेनिंग! समोरच्या व्यक्तीने काहीही प्रश्न विचारले, आमच्याकडून उलटसुलट अपेक्षा ठेवल्या तरी पारा चढू द्यायचा नाही. अनुराधाला पुन्हा मी शांतपणे सांगितलं की तिने नवºयाला कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणंच योग्य राहील आणि मी फोन ठेवला. पुढे मी माझ्या कामात व्यस्त झाले, पण अनुराधाशी झालेला संवाद पुन्हा पुन्हा आठवता होता. कसं काय मी पेशंटला न तपासता औषध द्यायचं? दोन महिन्यांपूर्वी त्याचं आॅपरेशन झालं होतं. पण त्याचा आता होणाºया त्रासाशी कसा संबंध जोडायचा? आज जो त्रास त्याला होत होता त्याची निरनिराळी कारणं असू शकतात हे त्या दोघांच्या लक्षात येत नव्हतं आणि उलट्या होणं म्हणजे पित्त झालं आहे, असा सरळ सोपा निष्कर्ष काढला होता. घरगुती इलाज करून पाहिलेच, पण बघावं डॉक्टर काही सल्ला देतात का फोनवर म्हणून फोन केला होता. डॉक्टरांनी काही गोळी सांगितली तर बरं, नाहीतर केमिस्टला विचारून घेऊ काहीतरी, असं बहुधा तिने ठरवलं असावं.
संध्याकाळी मला बातमी मिळाली की, अनुराधाचा नवरा अत्यवस्थ झाला म्हणून ताबडतोब मुंबईला मोठ्या रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टर काही सांगू शकत नाही असं म्हणाले. त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आला होता. व्हेंटिलेटर लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू होता, पण हृदयाचा बराच भाग निकामी झाला होता. त्याला ब्लड प्रेशरचा त्रास बºयाच वर्षांपासून होता. त्यासाठी दिलेली औषधं घेण्यातसुद्धा तो चालढकल करायचा. म्हणायचा, ‘मला काहीच त्रास होत नाही. अधूनमधून फॅमिली डॉक्टर बघतात ब्लडप्रेशर तेव्हा नॉर्मल येतं. मी फिजिशिअनने दिलेल्या गोळ्या रोज घेतच नाही. कधी त्रास जाणवला तर घेतो.’ आता सांगा, डॉक्टरकडे जायचं आणि त्यांनी तपासून, निदान करून, दिलेली औषधं मनाला वाटेल तेव्हा घ्यायची, नाहीतर नाही, यात कुठली हुशारी आहे? कशाला जिवाशी खेळतात तेच कळत नाही मला. मला मात्र बरं वाटलं की, मी तिला चुकीचा सल्ला दिला नव्हता. सकाळीच मी अनुराधाला सांगितलं होतं की त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. काय होईल, फार तर एक ई.सी.जी. काढला जाईल, रक्त तपासलं जाईल पण अशी अचानक मोठी उलटी होणं व जीव घाबरणं, हा हार्ट अ‍ॅटॅक असू शकतो हे विसरून चालणार नाही. वाईट गोष्टींचा नुसता विचारसुद्धा मनात यायला नको असं वाटणं साहजिकच आहे, पण मांजरीसारखं डोळे मिटून दूध पिऊन नाही चालत. आरोग्य व अनारोग्य याचं आवश्यक तेवढं ज्ञान निश्चितच असावं आणि सत्य नाकारण्याचा मूढपणा कधीच करू नये. सुज्ञ माणसांनी सावध राहून वेळीच योग्य ती पावलं उचलावी हीच आरोग्याची गुरूकिल्ली आहे, पटतंय ना तुम्हाला!
अनुराधाने केलेल्या सगळ्या सव्यापसव्यामागचं कारण एकच, ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणं टाळता आलं पाहिजे. आज व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल आणि व्हिडीओ कॉलिंगचा जमाना आहे. बरं, कुठेही असले तरी मोबाइल जवळ असणारच! मग डॉक्टरांनी दोन मिनिटांत फोनवरून सल्ला व औषधं द्यायला हरकत काय आहे? किती सोपं काम आहे, नाही का ? त्यातून अनुराधासारख्या अनेकांना वाटतं की ‘आपण तर डॉक्टरांचे किती जुने पेशंट आहोत. त्यांना आपल्या तब्येतीची पूर्ण कल्पना आहे. मग काय, आपण फोनवरून लक्षणं सांगायची व डॉक्टरांनी व्हॉट्सअ‍ॅपवर औषधं लिहून पाठवायची. झालं ना काम दोन मिनिटांत. तेवढ्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कशाला करायचा? हॉस्पिटलमध्ये जायचं?’ अहो, काही पेशंट तर फोनवर बोलता बोलता सरळ मोबाइल शेजारच्या केमिस्टच्या हातात देतात आणि म्हणतात, ‘तुम्ही डायरेक्ट केमिस्टलाच सांगा गोळ्यांची नावं. तो देईल!’
मला एक कळत नाही, या लोकांना भीती कशी वाटत नाही स्वत:च्या जिवाची? डॉक्टरांनी न तपासता औषधं सांगावी, केमिस्टने प्रिस्क्रिप्शनशिवाय द्यावी व पेशंटने ती औषधं घ्यावी, यात काहीच गैर कसं वाटत नाही? असा उपद्व्याप किती जीवघेणा ठरू शकतो याची पुसटशीसुद्धा कल्पना यांना नसते, की कल्पना असूनसुद्धा स्वत:वर प्रयोग करायला घाबरत नाहीत, हेच कळत नाही. असेही अनेक पेशंट असतात जे डॉक्टरांना फोन करण्याचीसुद्धा तसदी घेत नाहीत. सरळ मेडिकल स्टोअर गाठतात आणि काय त्रास होत आहे ते केमिस्टलाच सांगतात. काही केमिस्ट पण अगदी सराइतपणे पेशंटना औषधं देतात.
काही दिवसांपूर्वी मलाच एकाने विचारले, ‘तुम्हाला सर्दी-खोकला आहे का, थांबा, मी माझं खास औषध देतो ते घ्या!’ त्यांना ठाऊक नसतं का की त्यांना फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं देण्याचा परवाना असतो. तीसुद्धा, लिहून दिलेल्या कंपनीचीच द्यायची असतात. त्यांच्या इच्छेनुसार कुठल्याही कंपनीची औषधं त्यांनी देणं हादेखील गुन्हा ठरू शकतो. शिवाय जुन्या तारखेच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे केमिस्टने औषधं देणं हासुद्धा गुन्हा आहे.
कायद्यानुसार, डॉक्टरांनी पेशंटला तपासल्याशिवाय औषधं सांगू नये. फोनवर सल्ला देणं व मोबाइलवर मेसेजद्वारे औषधं लिहून देणं किंवा केमिस्टला फोन करून औषधं द्यायला सांगणं, डॉक्टरांना भलतंच महाग पडू शकतं. कितीही ओळखीची व्यक्ती असली, अगदी सख्खे नातेवाईक जरी असले तरी फोनवर डॉक्टरांनी औषधं सांगू नये आणि पेशंटने ती घेण्याची चूक करू नये. प्रत्यक्ष तपासणीला दुसरा पर्याय नाही हे त्रिवार सत्य आहे एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवावं.
 

Web Title: Do not you want to be a doctor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.