मायेची नाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 11:52 PM2018-09-16T23:52:51+5:302018-09-16T23:54:08+5:30
नाळ जोडली जाणे इथेच अजून जन्मालाही न आलेल्या बाळाची पोषण कथा सुरू होते.
- डॉ. रूपाली पानसे
पोषण हा शब्द आता इथे लिहिताना पहिली गोष्ट डोळ्यांसमोर आली ती म्हणजे, आई आणि बाळातील सर्वांत महत्त्वाचा दुवा, पोषणाची पहिली शक्यता, नाळ!
होय, नाळ जोडली जाणे इथेच अजून जन्मालाही न आलेल्या बाळाची पोषण कथा सुरू होते. ही नाळ बाळाच्या शरीराला व मनाला आईकडून हवे ते सर्व पोषण पुरवून आईच्या शरीराबाहेर राहण्याकरिता सुसज्ज बनवणार असते.
म्हणजेच, आईचे पोषण उत्तम, तर बाळ सुदृढ हे साधे समीकरण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोषण सप्ताहकरिता लिहिल्या जाणाऱ्या या लेखमालेकरिता गर्भिणीमातेचे पोषण हाच पहिला लेख हवा, हे अगदी ओघाने आलेच.
पोषण याचा अर्थ नुसती वाढ किंवा खूप व्हिटॅमिन मिळणे हा नक्कीच अपेक्षित नाही. अतिपोषण आणि अल्पपोषण हे दोन्हीही कुपोषणच आहेत. एकीकडे दिवस राहिल्या राहिल्या पचनशक्ती, गरज इत्यादींचा विचार न करता दर तासाला पोटावर खाद्यपदार्थांचा भडीमार करणेही वाईट आणि केवळ ज्ञानाचा माहितीचा अभाव, परिस्थिती यामुळे कमी पोषक आहार सेवन करणे हेही दु:खदच होय!
दिवस राहिल्यानंतर, येणाºया ९ महिन्यांत बाळाच्या एक एक पेशी तयार होणार असतात. या पेशींपासून वेगवेगळे अवयव आणि वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या क्रिया सुरू होतात. प्रत्येक महिन्यात विशिष्ट पोषणाची गरज जर भागवली गेली, तर गर्भालादेखील उत्तम पोषण मिळते. आयुर्वेदामध्ये प्रत्येक महिन्यात आहारात अवश्य असाव्यात, अशा काही गोष्टींचा ठळक उल्लेख आहे. तोच थोडक्यात बघूयात.अधिक आयुर्वेदिक आहार मार्गदर्शन योग्य वैद्याकडून अवश्य घ्यावे.
बाळाची पहिली लाइफलाइन!
पहिला महिना : ज्या महिन्यात गर्भधारणा अपेक्षित आहे, त्या महिन्यात गार दूध वरचेवर घ्यावे.
दुसरा महिना : शतावरी, ज्येष्ठमध, मनुका, अंजीर दुधात उकळवून ते दूध घ्यावे.
तिसरा महिना : या महिन्यात दुधामध्ये मध आणि तूप वेगवगेळ्या प्रमाणात मिसळून ते दूध पिण्यात ठेवावे.
चौथा महिना : बाळाच्या हृदयाच्या वाढीस पूरक असे लोणी आहारात भरपूर असावे. तसेच, तूप आणि गाईंच्या दुधाचे पदार्थ खावेत.
पाचवा महिना : तुपाचे प्रमाण या महिन्यात उत्तम असणे आवश्यक.
सहावा महिना : वरीलप्रमाणेच दूध वेगवेगळ्या पदार्थांबरोबर उकळवून प्यावे.
सातवा महिना : या काळात स्त्रीला जळजळणे अपचन अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्याकरिता वरील मधुर थंड द्रव्यांनी उकळवलेले दूध, तूप द्यावे.
आठवा महिना : या महिन्यात वेगवगेळ्या डाळी आणि कडधान्यांच्या कढणामध्ये भरपूर तूप टाकून ते प्यायला द्यावे.
नववा महिना : वरीलप्रमाणेच आहार ठेवावा.
बाकीच्या नेहमीच्या आहाराबरोबर दूध, तूप, लोणी यांचे महत्त्व वरील टिपांमध्ये अधोरेखित होतेच. याखेरीज बाकीचा आहार देखील ९ महिन्यांत सकस असा ठेवावा. वरील आहारास मासानुमासिक आहार (मंथली डाएट) असे नाव होय.
कायम टाळावे असे पदार्थ
शिळे, तयार पाकीटबंद, कृत्रिम रंग चवीचे असणारे पदार्थ.
चिप्स, रस्त्यावरील उघडे जसे पाणी पुरी, भेळ, सामोसा, ज्यूस इत्यादी.
रेडी पदार्थ, सोडा, मद्यपान, धूम्रपान.
चमचमीत लोणचे, खारवलेले पदार्थ.
आइस्क्रीम खाल्ले की बाळ गोरे होते, असा अद्भुत अभिनव शोध मी ऐकला होता एवढ्यातच, तथ्य असू दे. बाजूला परंतु आजकाल मिळणाºया आइस्क्रीममध्ये दूध नसते हे जरी लक्षात आले, तरी खूप. अशा आइस्क्रीमपासून दूर राहा. विश्वासातील ठिकाणाहून थोड्या प्रमाणात जरूर खावे.
पोटास तडस लागेपर्यंत खाऊ नये, हलक्या मात्रेत भूक लागेल तसा आहार घ्यावा, जागरण अजिबात करू नये, पुरेशी झोपदेखील आवश्यक आहे
डॉक्टरांशी नियमित भेट आणि दिलेली औषधे योग्य तºर्हेने घेणेदेखील पोषणासाठी आवश्यकच होय.
अशा सध्या गोष्टीदेखील गर्भाच्या पोषण दृष्टीने भक्कम पायाच ठरतात.
आवर्जून खावे असे पदार्थ
सुका मेवा, ताजी फळे, तांदळाची, गव्हाची खीर, कणकेचा प्रसादासारखा शिरा, मुगाचे कढण, गुळाची चिक्की, दूध लोणी तूप, मांसाहारी व्यक्तींमध्ये घरी तयार केलेले सूप, लाल भोपळा, कोहळा, राजगिरा, लालमाठ, मऊ भात तूप, कोकम सार या विशिष्ट पदार्थांखेरीज इतर आहार चौरस असावा.
(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत)