चिकित्सा पॅथॉलॉजिस्टची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 05:16 AM2018-09-16T05:16:56+5:302018-09-16T05:17:37+5:30
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसाला ५0 हून अधिक लॅब्समध्येही आपल्या अनुपस्थितीत स्वाक्षऱ्या करणाऱ्या बोगस पॅथॉलॉजिस्टचा परवाना नुकताच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी रद्द केला
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसाला ५0 हून अधिक लॅब्समध्येही आपल्या अनुपस्थितीत स्वाक्षऱ्या करणाऱ्या बोगस पॅथॉलॉजिस्टचा परवाना नुकताच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सहा महिन्यांसाठी रद्द केला. तब्बल सहा वर्षांनंतर या प्रकरणाचा छडा लागला आहे. हे एक प्रकरण पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये चालणारे गैरप्रकार उघड करण्यास पुरेसे आहे. या पार्श्वभूमीवर पॅथॉलॉजीशी संबंधित अभ्यासक्रम, येथे चालणारे गैरव्यवहार आणि कायद्यांमधील त्रुटी तसेच यात रुग्णांची होणारी ससेहोलपट यावर टाकलेला प्रकाश.
काही दिवसांपूर्वी लक्ष्मीला (नाव बदलून) ताप आला होता. डॉक्टरांनी तपासणी केली. फोन करून ‘लॅबवाल्या’ मुलाला बोलावून घेतले आणि रक्त, लघवीचे नमुने द्यायला सांगितले. थोड्याच वेळात तो ‘लॅबवाला’ मुलगा रिपोर्ट घेऊन आला. डॉक्टरांनी टायफॉइड झाल्याचे सांगत दवाखान्यातच सलाइन लावण्याचा घाट घातला. त्यासाठी दहा हजार रुपये फी सांगितली. तेवढे पैसे नसल्यामुळे व रिपोर्टवर संशय आल्याने दुसºया एका लॅबमध्ये तपासणीसाठी रक्त दिले असता त्यांचा रिपोर्ट पाहून धक्काच बसला. कारण त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले होते. हे असे का झाले असावे? असा विचार लक्ष्मीच्या कुटुंबीयांनी केला असता त्यांच्या असे लक्षात आले की पहिली तपासणी अनोळखी ठिकाणी, कुणी अज्ञात व्यक्तीने केली होती तर दुसºया वेळी ज्या लॅबमध्ये तपासणी केली त्या ठिकाणी सुसूत्रता होती. तपासणी करणाºया व्यक्तीची पात्रता एमबीबीएसनंतर पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण अशी होती.
आता तुम्ही म्हणाल की, पॅथॉलॉजी लॅबमध्ये डॉक्टरची आवश्यकता काय? याचे कारण असे आहे की, एमबीबीएस होईपर्यंत त्याने विविध आजारांचे मूलभूत ज्ञान घेतलेले असते व त्याच्या पदव्युत्तर शिक्षणामुळे अनुभव व निदान कौशल्यास एक विशेष धार येते. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या उत्क्रांतीमध्ये संशोधनावर भर देऊन रोगाचे मूळ कारण त्याचा शरीरावर होणारा परिणाम, कारण शोधल्यामुळे उपचार काय करता येतील याची सर्व उत्तरे शोधण्यास मदत झाली. सुरुवातीला होणारी रुग्ण तपासणी हळूहळू प्रयोगशाळेच्या अहवालावर विसंबून राहू लागली. यात विशेष यश प्राप्त झाल्यावर त्यासाठी वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज भासू लागली. कारण मानवी शरीराची दिवसेंदिवस उकल होत होती आणि कारणे समजत होती. अशा वैद्यक शास्त्रांना ‘शरीरविकृतीशास्त्र’ संबोधण्यात येऊन त्याचे पदवी (एम.डी), पदविका (डिप्लोमा) हे एमबीबीएसनंतरचे अभ्यासक्रम चालू आहेत.
सरकारची अनास्था रुग्णांच्या जिवाशी खेळणारी
महाराष्ट्र मानवी हक्क आयोगानेही या व्यवसायात होणाºया गैैरप्रकारांची दखल घेतली असून त्यांनी सरकारला उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास सांगितले. या सर्व घटना होत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाने २४ मे २0१६ रोजी एक पत्रक काढून केवळ तंत्रज्ञांनी प्रयोगशाळेचा व रुग्णांना पॅथॉलॉजिस्टच्या उपस्थितीशिवाय रिपोर्ट देणे हा अवैध वैैद्यकीय व्यवसाय ठरवला. परंतु सरकारी यंत्रणा अवैध पॅथॉलॉजी लॅबचालकांच्या दबावाला बळी पडली व डॉ. वाकोडे समितीची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागात पॅथॉलॉजिस्टची संख्या कमी असण्याचे कारण देण्यात येते. परंतु शहरी भागात बेकायदेशीर लॅबोरेटरी किती? व कशाप्रकारे व्यवसाय करतात याचे, सरकारी यंत्रणेला काही देणेघेणे नाही. विद्यमान सरकारचे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अवैध लॅबवर कारवाई केल्याचे दिमाखात समाजमाध्यमात प्रसिद्ध करण्यात आले. परंतु अशी कारवाई कुठे झाली हे सूक्ष्मदर्शिकेखाली शोधूनही मिळणार नाही. सरकारची अनास्था रुग्णांच्या जिवाशी खेळणारी आहे हे, सांगायला कोणा विद्वान सल्लागाराची गरज नाही. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत; यासाठी राज्य सरकार विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरे घेण्यात उत्साही असते. परंतु अवैध लॅबच्या माध्यमातून रुग्णांची चाललेली लूट कशी दिसत नाही? वेळोवेळी विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नांची थातूरमातूर उत्तरे दिली जातात.
प्रशासनाकडून अपेक्षा :
राज्यातील सर्व लॅबची संख्या माहीत करावी.
मुंबई उच्च न्यायालय २00७ व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तत्काळ पालन करावे
बेकायदेशीर लॅब व पॅरामेडिकल कौन्सिल यांची सांगड घालू नये.
कॉर्पोरेट लॅबच्या बेलगाम कारभारावर नियंत्रण ठेवावे.
भविष्यात येणाºया नवीन कायदे (उदा. क्लिनिकल एस्टाब्लिशमेंट अॅक्ट) हे तयार होताना प्रचलित कायद्याचे तंतोतंत पालन होणे.
वैद्यकीय व्यावसायिकांची जबाबदारी आहे की आपल्या रुग्णांच्या तपासण्या ज्या ठिकाणी उच्चशिक्षित पॅथॉलॉजिस्ट उपस्थित आहे अशाच लॅबमधून करावी यासंबंधीचे पालन करावे.
पॅथॉलॉजिस्ट मंडळींनी तपासण्यांवेळी स्वत: उपस्थित राहून आपला अनुभव व ज्ञानाचा उपयोग रुग्णांच्या निदानासाठी जास्तीत जास्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावा. रुग्णांनी ज्या ठिकाणी पॅथॉलॉजिस्ट उपस्थित आहे त्याची खात्री करून आपले नमुने तपासणीसाठी द्यावेत. सरकार बोगस लॅबवर कारवाई करेल तेव्हा करेल; परंतु तुम्ही स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणास शुभेच्छा!