रात्रीची शांत झोप महत्त्वाची
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 04:28 AM2018-09-17T04:28:37+5:302018-09-17T04:29:25+5:30
झोपताना शारीरिक श्रमांचे खेळ, वाद, शिक्षा, अप्रिय विषय, दूरचित्रवाणीवर भयावह कार्यक्रम व झोप उडवणारे इलेक्ट्रॉनिक खेळ टाळावेत.
- डॉ. गीता खरे
झोपेच्या तक्रारींची याआधी चर्चा केली. त्या चर्चेचा सारांश असा की, मुलांच्या झोपी जाण्याच्या व उठण्याच्या वेळेचे एक ठरावीक वेळापत्रक असावे. ते शाळेच्या व सुटीच्या दिवशी सारखेच असावे. तीन वर्षांवरील मुलांना पूर्ण दिवसात ८ ते १० तास झोप हवी.
झोपण्याच्या वेळी खोलीतील वातावरण शांत असावे. झोपताना शारीरिक श्रमांचे खेळ, वाद, शिक्षा, अप्रिय विषय, दूरचित्रवाणीवर भयावह कार्यक्रम व झोप उडवणारे इलेक्ट्रॉनिक खेळ टाळावेत. जेवून लगेच झोपण्याची प्रथा टाळावी. पण मुलांना उपाशीही झोपवू नये. सहज पचतील असे आणि थोडीफार भूक भागवणारे पदार्थ झोपण्यापूर्वी द्यावेत व त्यानंतर लगेच दात घासावेत. रात्री झोपताना कोको, कॉफी, चॉकलेट असे उत्तेजक पदार्थ व ते घातलेली पेये देणे टाळावे. दिवसाही चहा-कॉफीसारख्या उत्तेजक पेयांचे सेवन प्रमाणात असावे. शयनगृहात प्रखर उजेड नसावा. झोपताना चलचित्रे (म्हणजे दूरचित्रवाणी संच) व मोठा आवाज, म्हणजे आपापसातल्या तारस्वरातील चर्चा, दूरध्वनीवरील संभाषणे अथवा मोठ्या आवाजातील संगीत टाळावे. मधुर व शांत संगीत मात्र बहुतेक मुलांना आवडते. शाळेत जाणाऱ्या मुलांना झोपताना भयावह नसलेल्या गोष्टीही आवडतात. मुले अंगाईगीते व गोष्टी ऐकत झोपतात.
झोपण्याच्या खोलीतील तपमानही समाधानकारक असावे. अति उकाडा वाढला किंवा अतिथंडी झोपेमध्ये बाधा आणतात. रात्रीची शांत झोप येण्यासाठी दिवसा काही वेळ शारीरिक व्यायाम करावा. दिवसा झोपण्यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होत असेल तर दिवसाची झोप टाळावी. तरुणांनी कोणतेही व्यसन करणे निद्रानाशास कारणीभूत ठरू शकते हे लक्षात घेऊन टाळावे.
तथाकथित निद्रानाशविरोधी औषधांचे सेवन न करता वर सांगितलेले नैसर्गिक उपायच झोपेसाठी आचरणात आणावेत.