शुद्ध पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:07 AM2018-09-17T00:07:08+5:302018-09-17T00:08:00+5:30
आज उकळून पाणी पिणे फिल्टर खराब असेल किंवा अगदीच डॉक्टरांचा सल्ला असेल तरच प्यायले जाते.
- डॉ कांचन खैराटकर
पूर्वी पावसाळा सुरूझाला की आईची गडबड चालू असायची. मोठी भांडी वरून खाली यायची. भरपूर पाणी उकळून ठेवलं जायचं आणि प्रत्येक दिवशी नवीन पाणी तेही उकळून गार करून प्यायचं...
आज उकळून पाणी पिणे फिल्टर खराब असेल किंवा अगदीच डॉक्टरांचा सल्ला असेल तरच प्यायले जाते. आज प्युरीफाइड पाणी खूप वापरले जाते. त्याबद्दल थोडं जाणून घेऊयात! पर्यावरण संरक्षण समितीच्या माहितीनुसार प्युरीफाइड पाणी हे अतिशय नाजूक बनते, त्यामुळे ते ज्याच्या संपर्कात येते त्याप्रमाणे गुणधर्म घेते. विशेषत: वातावरणातील कार्बनडायआॅक्साइडचे शोषण या पाण्याद्वारे खूपच जलद होते आणि पाणी आम्लधर्मी होते. अनेक धातूंचे अंश या पाण्यात विरघळून जाऊ शकतात.
जेव्हा हे पाणी सतत शरीरात जाते, तेव्हा शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर काही मिनरल्स त्यामध्ये मिसळून मूत्राद्वारे बाहेर जातात. परिणामी हाडांची झीज होऊन ते ठिसूळ होतात. त्यामुळेच संधिवात, थायरॉइड, हृदयविकार-बीपी आणि झीज होऊन अनेक विकार उद्भवतात.
आयुर्वेदात पाणी उकळून गार करून प्यावे, असे वर्णन आले आहे. जे पचायला सोपे आहे आणि सर्वार्थाने पोषकही. पाणी देश काळाप्रमाणे बदलते त्यामुळे उकळून गार करून पिणे उत्तमच! पाण्याची चव ही अव्यक्त म्हणजे विशिष्ट चवीची नसते. कोणतीही चव ही जिभेद्वारे समजते. पण, पाण्याला विशिष्ट रस नसतो. अशा प्रकारचे पाणी जर आम्लधर्मी होत असेल तर ते निश्चितपणे अपायकारक आहे आपल्या शरीरात आपण सहा रसांचा आहार घेतो. त्यांचे प्रमाण योग्य असताना शरीर सुस्थितीमध्ये असते. पण, एखाद्या रसाचे सतत अधिक्य शरीर रचनेत व कार्यात बदल घडवते. आम्लरस शरीरात वाढत असेल तर अस्थींची झीज होणे, उष्णता वाढणे, रक्ताचे व्याधी उद्भवणे असे अनेक विकार होतात. म्हणून प्युरीफाइड पाण्याचा वापर शक्य तेवढा टाळा. विश्वास ठेवा त्यामुळे नक्की निरोगी जीवन मिळू शकेल.
(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत)