कर्करोगाची कारणे नेमकी काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 07:43 PM2018-11-28T19:43:37+5:302018-11-28T20:01:03+5:30

कॅन्सर किंवा कर्करोग म्हटले की, सर्वसामान्यांचा थरकाप होणे स्वाभाविक आहे. या रोगाबद्दल अज्ञान किंवा माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बलता ही कारणेही त्यामागे दडलेली आहेत.

What exactly do the causes of cancer? | कर्करोगाची कारणे नेमकी काय ?

कर्करोगाची कारणे नेमकी काय ?

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेत मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आजारात हृदयविकारानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोगच येतोएकूण मृत्यूच्या २.२% मृत्यू कर्करोगामुळेच होतात.

कॅन्सर किंवा कर्करोग म्हटले की, सर्वसामान्यांचा थरकाप होणे स्वाभाविक आहे. या रोगाबद्दल अज्ञान किंवा माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे तसेच सामाजिक व आर्थिक दुर्बलता ही कारणेही त्यामागे दडलेली आहेत.
अमेरिकेत मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आजारात हृदयविकारानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोगच येतो. एकूण मृत्यूच्या २.२% मृत्यू कर्करोगामुळेच होतात. एका वर्षात १ मिलियन कर्करोगी नव्याने आढळले तर महिलांमध्ये त्याचे प्रमाण जास्त दिसते. कर्करोग तसा कुठल्याही अवयवास अथवा पेशीसमूहास होतो. फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात जास्त लोकांना झाल्याचे आणि २८% प्रमाणात लोकांचे मृत्यू झाल्याचे एका अभ्यासात निश्चित झाले आहे. क्षयाप्रमाणेच कर्करोग शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फैलतो. फुफ्फुसानंतर स्तन आणि प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग तितकाच परिणामकारक आढळतो. महिलांमध्ये फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये फुफ्फुस व प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग मोठ्या प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. साधारणपणे कर्करोग तसा पुरुषात अधिक प्रमाणात आढळतो. अभ्यास गटातील रोग्यांपैकी केवळ वातावरणातील ७५ ते ८०% रुग्णांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थलांतर करणाऱ्या जातिजमातीतील त्यांच्या बदलत्या खानपान व जीवनशैलीमुळे कर्करोग बळावण्याची जास्त शक्यता असते. बदलत्या काळात लोकांच्या धूम्रपानाच्या सवयी बदलतात. त्यामुळेही कर्करोगाचे प्रमाण काळानुसार बदलते. कुठल्याही कर्करोग्याची केवळ पाच वर्षे जगण्याची शाश्वती सगळीकडे व्यक्त केली गेली आहे. वाढत्या वयाच्या कर्करोगासाठी शरीरातले पोषक वातावरण आणि घटलेली प्रतिकार शक्ती यामुळेही उतारवयीन गृहस्थ कर्करोगास बळी पडतात. समाजातील काही वर्गात त्यांच्या जातिप्रकारावरही कर्करोगाचे प्रमाण निश्चित होते.
कर्करोग का होतो, कुणाला होतो आणि कशामुळे होतो याबद्दल सर्वजण साशंक व गोंधळलेल्या अवस्थेत असतात. कर्करोग होण्याचे मुख्य कारणे अशी आहेत;
१) तंबाखू: तंबाखू सेवन आणि धूम्रपान हे कर्करोगाच्या आजवर संशोधित कारणांपैकी प्रमुख कारण मानले जाते. धूम्रपानाचा आणि कर्करोगाचा तसा घनिष्ट संबंध आहे. यामुळे केवळ फुफ्फुसाचाच नव्हे, तर घसा, तोंड, अन्नलिका, श्वसननलिका, मूत्राशय आणि पॅन्क्रियाज ग्रंथी आदींचा कर्करोग होतो. अलिकडच्या एका निष्कर्षात मूत्रपिंड, कमरेचा भाग, गर्भाशयाच्या प्रवेशाचा भाग, नाक, उदर व ल्युकेमिया आदी प्रकारच्या कर्करोगांचेही वर्णन करण्यात आले आहे. धूम्रपानातील धुरातील रसायने ९विविध प्रकारे शरीराला घातक ठरतात त्यामुळे कर्करोग होतो. फुफ्फुसाचा कर्करोग जास्त प्रमाणात होतो आणि ४०% मृत्यू पुरुषात व २०% मृत्यू महिलांमध्ये केवळ विडी-सिगारेट ओढण्याने होतात. दिवसातून दोन किंवा अधिक पाकिटे सिगारेट ओढणाऱ्यांना कर्करोग होण्याची शक्यता २० पटीने वाढते. विडी-सिगारेट ओढणे बंद केल्यावर कर्करोगाा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. सिगारेट व पाईप ओढणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग इतर कर्करोगांच्या तुलनेत जरा कमी होत असला तरी विडी-सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये त्याचे प्रमाण हे निश्चितच जास्त असते. तोंड व घशाचा कर्करोग तपकीर (स्नफ) ओढल्यानेही होतो. सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे.
२) मद्यपान: धूम्रपानाचे दुष्परिणाम वाढून त्याची परिणती कर्करोगात होणयासाठी मद्यपान कारणीभूत ठरते. निव्वळ दारूचे दुष्परिणाम अभ्यासणे अवघड काम आहे. धूम्रपान व मद्यपान यामुळे घसा व तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण ७५% झाले आहे. कडक दारू (हार्ड लिकर) व बिअर सेवन करणाऱ्यांना वाईन पिणाऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात कर्करोग होण्याची शक्यता असते. दारूमुळे कर्करोगजन्य पदार्थ निर्माण होत नाहीत. तरी पण पोटाच्या पचनशक्तीला कमजोर करून जीवनसत्त्वे व इतर अन्नपदार्थ कमी होणे, यामुळे दारूचा परिणाम अधिक जाणवतो. गुळण्या करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थात अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्यानेही ते तोंडाच्या कर्करोगास निमंत्रण देते. दारूमुळे काळजी सडते म्हणजे काळजाला (यकृताला) छिद्र पडतात, आत जाळे पसरते आणि पोटात पाणी भरते, याला ‘सिरॉसिस’ म्हणतात आणि याचेच रूपांतर पुढे काळजाच्या कर्करोगात होते. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या (रेक्टम) भागातही याचे परिणमा जाणवतात. रोज १ ते २ पेग प्याल्यानेही धोका वाढतो. अलिकडच्या संशोधनानुसार दारूचा आणि स्तनकर्करोगाचा जवळचा संबंध असल्याचे निदर्शनास आले आहे.
३) व्यावसायिक तोटे: एकूण कर्करोग्यांच्या ५% रुग्णांना कर्करोग त्यांच्या व्यवसायातील कर्करोगजन्य घटक पदार्थांमुळे होतो. मूत्राशय व फुफ्फुसाचा कर्करोग इतर कर्करोगांपेक्षा जास्त आढळतो. अस्बेस्टॉस, लेदर इंडस्ट्रीयामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो. विविध व्यवसायांमुळे उद्भवणारे कर्करोग हे त्या त्या परिणामकारक कर्करोगजन्य पदार्थांवर अवलंबून असतात.
४) वातावरणातील प्रदूषण: शहरी वातावरणातील हवा ही दूषित असते आणि त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो. धूम्रपानाच्या सवयीमुळे वातावरणात पसरणारा धूर हा घातक असतो. कपड्यांच्या गिरण्यात निर्माण होणारा अ‍ॅस्बेस्टॉस हा पदार्थही त्रासदायक असतो, अरसेनिक या रसायनामुळेही वातावरणातील हवा दूषित होते व दूषित हवेमुळे कर्करोग होतो. घरातल्या घरात रडान वायूमुळे, दूषित हवेमुळे व धूम्रपान यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो. चीनमध्ये धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये केवळ फोडणीच्या तेलामुळे होणारा धूर आणि दगडी कोळशाचा स्टोव्ह आदींमुळे कर्करोग होतो. क्लोरिनेटेड सरफेस वॉटर म्हणजे अशुद्ध पाणी पिण्यानेही कर्करोग होऊ शकतो. पिण्याच्या पाण्यातील जास्त अरसेनिकचे तैवान येथल प्रमाण यामुळेही त्वचेचा कर्करोग व इतर कर्करोग होतात,
५) रेडिएशन : (लाईट/किरणे): वैद्यकीय कारणास्तव क्ष-किरण व्यवसायामुळे अथवा सैन्यदलातील कारणास्तव कुठल्याी प्रकारे एक्स-रे किरणांचा परिणाम चांगला नसतो. रक्ताच्या कर्करोगात (ल्युकेमिया) ५०% नी वाढ यामुळे होते. एकूण मृत्यूच्या ५% मृत्यू विविध प्रकारच्या किरणांच्या परिणामामुळे होतात. शरीराच्या कुठल्याही भागावर या किरणांचा विपरीत परिणाम होऊनकर्करोग बळावतो. जास्त दुष्परिणाम बोन मॅरो, स्तन आणि थायरॉईड (गलगंड) या संवेदनशील भागात जाणवतो. दीर्घ कालावधी लोटल्यावर याची लक्षणे दिसू लागतात. अणुशक्ती केंद्राजवळ राहणाऱ्या कुटुंबात कर्करोग वाढल्याचे निश्चितपणे आढळले आहे. सूर्यकिरणातील अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. गोऱ्या कातडीच्या व्यक्ती उन्हात बाहेर पडल्याने आणि नेहमी-नेहमी उन्हात काम केल्यानेही निश्चित दुष्परिणाम उद्भवतात.
६) औषधे: औषधांमुळे २% रुग्णांना कर्करोग होतो. विविध प्रकारच्या औषधांमुळे कर्करोगास निमंत्रण मिळते, हे सत्य आहे. त्याचबरोबर साधी अ‍ॅस्प्रीनसारखी औषधे ही मोठ्या आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करतात,
७) व्हायरसेस: ५% रुग्णांना व्हायरसमुळे कर्करोग होतो. एच. पायलोरी या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने जठराचा कर्करोग होतो. ‘ब’ प्रकारच्या व्हायरसमुळे होणाऱ्या काविळीया रुग्णांना यकृताचा (लिव्हर) कर्करोग होतो. ‘क’ प्रकारच्या व्हायरसमुळेही हा धोका वाढतो. एचआयव्ही (एड्स) या व्हायरसमुळेही ग्रंथी वाढून लिम्फोसा होतो आणि कॅपॉसिस सारकोमा हा कर्करोग होऊ शकतो. गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा (सर्वायकल) कर्करोग संभोगात जोडीदार अनेकवेळा बदलल्याने व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे होतो. गुप्त अवयवांचे कर्करोगही विविध व्हायरसमुळे होतात.
८) खाद्य व आहार : पाश्चिमात्य खाद्यपदार्थ व आहार एका निश्चित प्रमाणापुरते का होईना, कर्करोगास पोषक आहेत. अन्नपदार्थात स्निग्ध पदार्थांचे (चरबी) प्रमाण जास्त असणे, कर्करोगास निमंत्रण देणेच होय. स्तन व मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्यास यामुळे मदत होते. काही पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन आणि पालेभाज्या व फळे कमी खाणे याचा कर्करोगांशी संबंध जोडला जातो. ‘क’ जीवनसत्त्व जठर व इतर कर्करोगांपासून बचाव करते. ‘ड’ जीवनसत्त्व व कॅल्शियम हे देखील मोठी आतडी व स्तनांच्या कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करतात. जास्त कॉफी प्लायल्याने मूत्राशय व पॅन्क्रियाज ग्रंथींचा कर्करोग होतो. सॅक्रिन व इतर कृत्रिम गोड पदार्थांमुळे प्राण्यांमध्ये कर्करोग झाल्याचे आढळते, पण माणसात त्याचे अत्यल्प प्रमाण सध्या तरी आहे. खारट पदार्थ व जठराचा कर्करोग याचाही जवळचा संभव अभ्यासिला गेला आहे. खारट मासे देखील कर्करोगाला आमंत्रण देतात.
९) आनुवांशिकता: बाकी काही असो, आनुवांशिकतेमुळेही काही प्रकारचे कर्करोग उद्भवतात. कधी-कधी योगायोगानेच कुटुंबियात कर्करोग झाला किंवा काय, अशी शंका उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. अनेक प्रकारचे कर्करोग हे वंशातून चालत राहतात.

- डॉ. रोहिदास वाघमारे
जे.जे. हॉस्पिटल, मुंबईचे कार्डिआॅलॉजिस्ट (निवृत्त)

Web Title: What exactly do the causes of cancer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.