World Brain Tumour Day : ब्रेन ट्युमरची लक्षणे आणि उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 03:02 PM2018-06-08T15:02:46+5:302018-06-08T15:02:46+5:30
आज ब्रेन ट्युमर दिवस असून या दिवशी ब्रेन ट्युमरबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते. ब्रेन ट्युमरबद्दल जाणून घेऊयात
आज ब्रेन ट्युमर दिवस असून या दिवशी ब्रेन ट्युमरबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाते. ब्रेन ट्युमरबद्दल जाणून घेऊयात
मेंदूमधील पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे मेंदूचा कर्करोग किंवा ट्यूमर. मेंदूबरोबरच शरीराच्या सर्व भागामध्येही ‘मेलिग्लंट’ ट्यूमर अत्यंत वेगाने पसरतो. जे ट्यूमर पसरत नाहीत किंवा जवळच्या टिश्यूवर हल्ला करीत नाहीत त्यांना ‘बेनाइन’ असे म्हणतात. अशाप्रकारचे ट्यूमर्स हे ‘मेलिग्लंट’ ट्यूमर्सच्या तुलनेत कमी हानीकारक असतात. तरीदेखील मेंदूमधील जवळच्या टिश्यूंना ‘बेनाइन’ ट्यूमर्स इजा करून मेंदूला हानी पोचवू शकतात. मेंदूच्या पेशींमध्ये जे ट्यूमर्स वाढतात, त्यांना ‘प्रायमरी ब्रेन ट्यूमर्स’ असे संबोधले जाते. हे प्रामुख्याने ग्लायोमास, मेनिन ग्लायोमास, पिटूअतरी अॅडेनोमस, व्हेस्टीब्युलर श्वानोमास, प्रीमिटिव्ह न्यूरोइक्टोडेरमेल ट्यूमर्स (मदलोब्लास्टोमस) प्रकारचे ट्यूमर्स आहेत. ‘ग्लायोमा’मध्ये ग्लायोब्लास्टोमस, अॅस्ट्रोसायटोमस, ओलीगोदेनड्रॉगलीमोमस, अपेंडीमोमसचा समावेश आहे.
‘मेटॅस्टिक्स’ किंवा ‘सेकंडरी ब्रेन ट्यूमर्स’ हे मेंदूमध्ये इतर ट्यूमर्सद्वारे पसरतात. मेंदूच्या ट्यूमर्सचे निदान हे त्याच्या आकारापेक्षा तो कोणत्या जागी झालाय यावर ठरते. ट्यूमर्सनी मेंदूमधील टिश्यूजना हानी पोचवल्यानंतर मेंदूच्या ट्यूमर्सची लक्षणे दिसायला लागतात. एक तर ट्यूमरजवळील टिश्यूजला सूज येते किंवा मेंदू आणि मणक्याला होणाऱ्या द्रवपदार्थांच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होते.
मेंदूच्या कर्करोगाची लक्षणे :
- डोकेदुखी
- मेंदूवरील ताबा जाणे
- बोलताना जीभ अडखळणे
- चालताना तोल जाणे
- दृष्टी कमी होणे
अर्थात वरील लक्षणांपैकी काही लक्षणे रुग्णात आढळली म्हणजे रुग्णाला कर्करोगच झालाय असे मानणे चुकीचे ठरले. मात्र एक किंवा दोन आठवड्यांच्या काळात या लक्षणांपैकी काही लक्षणे कायम राहिल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक ठरते.
मेंदूच्या कर्करोगाचे निदान हे शारीरिक तपासणी, एमआरआय किंवा सीटी स्कॅन चाचणी, शस्त्रक्रियेनंतर केली जाणारी बायोप्सी किंवा स्टीरिओटॅक्टीक मेंदूच्या शस्त्रक्रियेद्वारे केले जाते. मेंदूच्या कर्करोगावरील उपचार हे गुंतागुंतीचे असतात. मात्र सर्वसाधारणपणे केले जाणारे उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी. मेंदूच्या ट्यूमरचे निदान झालेले अनेक रुग्ण शस्त्रक्रियेचा किंवा स्टीरिओटॅक्टिक शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात. त्यामध्ये ‘इमेज गायडन्स’ची मदत घेऊन मेंदूतील ट्यूमर बाहेर काढला जाऊन चांगल्या मेंदूचा भाग तसाच ठेवला जातो. न्यूरोएन्डोस्कोपीद्वारेही मेंदूतून ट्यूमर बाहेर काढला जातो. त्यासाठी आपल्या डोक्यातील कवटी, तोंड किंवा नाकामध्ये बारीक छिद्रे तयार केली जातात. सर्वसाधारण शस्त्रक्रियेमध्ये न्यूरोसर्जन्सना मेंदूतील ज्या ठिकाणी पोचता येत नाही, तिथं या शस्त्रक्रियेमुळे पोचता येते.
मेंदूच्या ट्यूमरवरील उपचारांसाठी रेडिएशन थेरपी तसेच केमोथेरपीची मदत घेतली जाते. मेंदूच्या ट्यूमरवरील उपचारासाठी न्यूरोऑंकोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन्स तसेच अत्याधुनिक रेडिएशन तंत्रज्ञानाची गरज भासते. रोगावर विजय मिळविणे आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीचे जीवन जगण्यासाठी अशापद्धतीचे उपचार घेतल्यास लाभ होतो.
- सुनील कुट्टी, कन्सल्टंट न्यूरोसर्जन