‘कयाधू’साठी हिंगोलीत जलचळवळ
By गजानन दिवाण | Published: May 25, 2018 01:25 PM2018-05-25T13:25:45+5:302018-05-25T13:25:45+5:30
मुख्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचे पुनरूज्जीवर केले जाणार आहे. या नदीला येऊन मिळणाऱ्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही जलचळवळ राबविली जाणार आहे.
- गजानन दिवाण
पावसाळ्यात पुराचे आक्राळ-विक्राळ रूप दाखविणारी हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी दुसऱ्याच दिवशी कोरडीठाक होते आणि हिंगोलीकरांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी झगडायला भाग पाडते. पाण्याचा हा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी स्वत: हिंगोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य पात्राला धक्का न लावता लोकसहभागातून या नदीचे पुनरूज्जीवर केले जाणार आहे. या नदीला येऊन मिळणाऱ्या ४० प्रवाहांमध्ये म्हणजे तब्बल १५४ गावक्षेत्रांत ही जलचळवळ राबविली जाणार आहे.
या महिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत ही जलचळवळ पोहोचावी यासाठी काढलेल्या जलदिंडीला शुक्रवारी दुपारी प्रारंभ करण्यात आला. ही जलदिंडी ४ जूनपर्यंत सेनगाव, हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांतील २० गावांमध्ये जाईल, अशी माहिती उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या जलदिंडीत दररोज ५०० ते दीड हजार लोक सहभागी होतील. दहा दिवसांच्या काळात जलदिंडीचा दहा गावांमध्ये मुक्काम असेल. या गावांमध्ये पथनाट्य, कलापथक, किर्तन, गाणे आदी माध्यमातून पाण्यासाठीचे प्रबोधन केले जाणार आहे. कयाधू ही नदी हिंगोली जिल्ह्यात ८४ किलोमीटर क्षेत्रातून वाहते. जिल्ह्यातील ११७५ कि.मी. अंतरावरून लहान-मोठे ओढे, नाले आणि पाट या नदीला येऊन मिळतात. या नदीच्या काठावर जवळपास १५४ गावे, वस्त्या, वाड्या वसल्या आहेत. या गावांतील चार हजार ८३२ कुटुंबे आणि त्यातील दोन लाख ४२ हजार १५२ लोकसंख्येला, शिवाय एक लाख १३ हजार १०० हेक्टर जमिनीला ही नदी प्रभावित करते. कयाधू नदीची एकूण लांबी ८४ किलोमीटर असून, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांची लांबी ११७५ कि.मी. इतकी आहे. सद्य:स्थितीत झालेले खोलीकरण २२४ कि.मी. इतके आहे. नवीन कामांमधून होणारे खोलीकरण २३५ कि.मी. असून, करावे लागणारे खोलीकरण ६८८ कि.मी. इतके आहे. माथ्याकडील आगरवाडी-कंडरवाडी (जि. वाशिम) ते पायथा (सोडेगाव, ता. कळमनुरी)पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.
दोन वर्षे सर्वेक्षण
वातावरणातील बदल आणि मानवाचा वाढता हस्तक्षेप यामुळे एरव्ही बारा महिने वाहणारी कयाधू नदी आता हंगामी झाली आहे. त्यातही काही दिवसच ती वाहते. त्यामुळे आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांच्या यादीत हिंगोली जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे. कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करुन जिल्ह्याला दुष्काळचक्रातून बाहेर काढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ईडलग्रीव्ह फाऊंडेशनच्या मदतीने उगम संस्थेने गेले वर्षभर ५० जणांच्या पथकाद्वारे जिल्ह्यात प्राथमिक सर्वेक्षण केले. नेमकी परिस्थती काय, करायचे काय, याचा आराखडा ठरला. त्यानुसार लोकसहभागातून हे काम केले जाणार असल्याचे ‘उगम’चे अध्यक्ष जयाजीराव पाईकराव यांनी सांगितले.
प्रस्तावित कामे
नवीन सीसीटी-११३९
नवीन लूज बोल्डर - १३५७०
नवीन गाबियान - १३७५
पाईप बंधारे - १४७
अर्थन मॉडेल - ३६५५
नवीन सीएनबी - ७५८
नवीन माती नाला बांध - ६२
डोव्ह मॉडेल - १२००
रिचार्ज शोफ्ट - १३४५
विहीर व बोअर रिचार्ज - ७७००
अडीच लाख लोकांना होणार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ
१५४ गावांमध्ये ४८ हजार ३३२ कुटुंबे राहतात. या गावांची लोकसंख्या दोन लाख ४२ हजार ५१२ आहे. या गावांमध्ये सद्य:स्थितीत ४५८ मातीनाला बांध असून, यातील ३१ बांध तुटलेले, तर ३६६ बांध गाळ काढण्यायोग्य आहेत. जुने सिमेंट नालाबांध ५७७ असून, गेटचे सिमेंट नालाबांध ७६ आहेत. यातील दुरुस्तीलायक ४६ असून, गाळ काढण्यायोग्य बांध ४२७ आहेत. शासनाने गाळ काढलेल्या बांधांची संख्या ८७ आहे.
काय केले जाणार?
पाणलोट क्षेत्रातील जुने पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे
सीसीटी, लूट बोल्डर, गॅबियन बंधारे बांधणे
बुडी, डोह पुनरुज्जीवित करणे
जुने सिमेंट बांध, मातीबांध यांची दुरुस्ती व खोलीकरण करणे
शेततळे घेणे, बोअर पुनर्भरण, विहीर पुनर्भरण करणे
ओढ्याचे खोलीकरण करणे
( gajanan.diwan@lokmat.com)