तोतया जिल्हाधिकाऱ्यांचे कारनामे; नोकरीच्या आमिषाने २० जणांना १ कोटीस गंडविले
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: February 17, 2023 10:20 PM2023-02-17T22:20:46+5:302023-02-17T22:22:43+5:30
नोकरी लावण्याचे आमिष ; पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा गुरुवारी भांडाफोड झाला होता.
हिंगोली : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने उघडकीस आलेल्या तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याने नोकरी लावतो म्हणून २० जणांना १ कोटी ११ लाखांपेक्षा अधिक रकमेने गंडविले असल्याचे तपासात उघडकीस आले. यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा गुरुवारी भांडाफोड झाला होता. याप्रकरणी तोतया अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल वासुदेव पजई (रा.जामनेर, जि. जळगाव), अनंता मधुकर कलोरे (रा. मोठी उमरी, ता. जि. अकोला) यांच्या विरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यावेळी पोलिसांनी अमोलजवळील महागड्या चारचाकीची तपासणी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेटर पॅड, बँकेची कागदपत्रे, भाडे करायचे बाँड, गृह मंत्रालय गव्हर्नमेंट ऑफ इंडियन मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट, तसेच नाव व फॉरेस्ट रेंज ऑफिसर असे नाव असलेले ओळखपत्र, पाच लाखांच्या रोकडसह परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे आढळली. शुक्रवारी तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, शहरचे एस. एस. आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिरी, स्थागुशाचे शिवसांब घेवारे, सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार शेख शकील, सुनील अंभोरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
गाडीमध्ये परीक्षेसंदर्भात आढळलेल्या कागदपत्राच्या अनुषंगाने विचारपूस केली असता नोकरी लावतो म्हणून २० बेरोजगार युवकांना १ कोटी ११ लाखांनी गंडविल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. यात बेरोजगार युवकांकडून कोणी पैसे जमा केले, कोणाला दिले, किती पैसे उकळले, यात कोण कोण सहभागी आहेत? आदींचा तपास पोलिस करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता दिसत आहे. फसवणूक झालेल्या युवकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बँकही बोगस असल्याचे उघड
तिन्ही आरोपी संचालक असलेली अर्बन बँकही बोगस असून बँकेची अद्याप नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे यातही आता तपास सुरू करण्यात येत आहे.