उत्तर कोरिया-अमेरिकेचे संबंध महत्त्वाच्या वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 11:38 AM2018-03-12T11:38:25+5:302018-03-12T11:38:25+5:30

शुक्रवारी म्हणजेच ८ मार्चला जागतिक माध्यमांत एका बातमीने खळबळ माजवली. ही बातमी आली होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधून.

North Korea-America relations at an important turn | उत्तर कोरिया-अमेरिकेचे संबंध महत्त्वाच्या वळणावर

उत्तर कोरिया-अमेरिकेचे संबंध महत्त्वाच्या वळणावर

Next

- संदेश सतीश सामंत 
शुक्रवारी म्हणजेच ८ मार्चला जागतिक माध्यमांत एका बातमीने खळबळ माजवली. ही बातमी आली होती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमधून. दक्षिण कोरियाचे सुरक्षा सल्लागार चंग उयी याँग यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि येत्या काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा असलेले किम जाँग उन यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही घोषणा होताच जागतिक माध्यमांच्या नजरा वळल्या त्या वॉशिंग्टनकडे. यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले. त्याचसोबत अनेक प्रश्न उपस्थितही केले गेले. गेल्या वर्षभरापासून उत्तर कोरिया आणि अमेरिका यांनी एकमेकांना दिलेल्या आण्विक युद्धाच्या धमक्या लक्षात घेता या घोषणेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

शीतयुद्ध काळात साम्यवादी सोव्हिएत युनियन आणि भांडवलशाहीवादी अमेरिका यांच्यात थेट संघर्ष झाला नसला तरी कोरिया, व्हिएतनाम आणि अफगाणिस्तान सारख्या देशांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून ही राष्ट्रे एकमेकांना भिडली. यातील सर्वात पहिला संघर्ष झाला तो कोरियात १९५३ साली. या कोरियन युद्धानंतर कोरियाची दोन भागांत विभागणी झाली. दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले; तर उत्तर कोरियाने साम्यवादी अर्थव्यवस्थेचे धोरण अवलंबले. शीतयुद्ध काळात विभागला गेलेला व्हिएतनाम एक झाला. विभाजन झालेल्या जर्मनीनेही शीतयुद्धानंतर एक होण्याचा निर्णय घेतला. पण, कोरियाचे युद्ध मात्र कधीच संपले नाही. आजही कोरिया द्विभाजित राहिला आहे. ज्याचे परिणाम आणि त्याची सल प्रत्येक कोरियन व्यक्तिच्या मनात आहे. 
सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर उत्तर कोरियाला असणारा खंबीर पाठिंबा संपेल, अशी आशा जगातील देशांना होती. पण, शीतयुद्ध काळानंतर चीनने उत्तर कोरियाला पाठिंबा देण्याचे धोरण सुरू केले. यातूनच एका नव्या संघर्षाला सुरूवात झाली. अमेरिकेच्या महासत्तेला आव्हान देणारा देश म्हणून चीन गणला जाऊ लागला आणि उत्तर कोरियाला संरक्षण देणारा देश म्हणून चीनवर अनेक देशांनी आगपाखड केली. 

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्ष नवीन नाही. याला सहा दशकांचा इतिहास असला तरी २०१७ साली डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांच्यातील आणखी वाद विकोपाला गेले. किम जाँग उन यांनी आपल्याकडे असलेल्या आण्विक अस्त्रांचा वापर अमेरिकेविरुद्ध करू, अश्या धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यावर उत्तर कोरियापेक्षा मोठी अण्वस्त्रे आपल्याकडे असल्याचे प्रत्युत्तर ट्रम्प यांच्याकडून देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे जग पुन्हा एकदा आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे का, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली. उत्तर कोरियाने एकामागोमाग एक अश्या अनेक अण्वस्त्र आणि अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन यात भर घातली. 

या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाचा पुढील टप्पा काय असणार यावर अनेक तज्ज्ञ विविध तर्क नोंदवत होते. पण, चंग उयी याँग यांच्या वक्तव्याने सर्वांना एक धक्का दिला आहे. ट्रम्प यांनीसुद्धा या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियावर गेल्या काही वर्षांत लादलेल्या निर्बंधांच्या माध्यमातून उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था जेरीस आल्यानेच उत्तर कोरिया या भेटीसाठी आग्रही असल्याचे कारण ट्रम्प प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय राजकारणातील जागा कोणत्याही प्रकारे कमकुवत झाली नसल्याचा दावा ट्रम्प प्रशासनातील व्यक्तींकडून केला जात आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर आजवर एकाही सत्तारूढ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची आणि उत्तर कोरियाच्या वरिष्ठ नेत्याची भेट झालेली नाही. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील राजकीय अनुनय आणि वाटाघाटी या कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमार्फतच केल्या गेल्या. आपल्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उत्तर कोरियातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेण्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी नकार दिला होता. 

पण, तरीही भूतकाळातील काही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाच्या सर्वोच्च नेत्याशी भेट घेण्यासाठी तयारी केल्याचा इतिहास मात्र आहे. बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या अंतिम कालखंडात उत्तर कोरियाच्या दौऱ्याची तयारी त्यांनी केली होती. त्यांचे परराष्ट्र मंत्री मॅडलिन ऑलब्राईट यांनी उत्तर कोरियाची राजधानी असलेल्या प्याँगयँगचा दौराही केला होता. यात उत्तर कोरियाने इतर देशांना क्षेपणास्त्र विक्री थांबवण्याची आणि नवीन क्षेपणास्त्र निर्मिती न करण्याची मागणी मान्य केली होती. पण, स्वतःकडे असलेली क्षेपणास्त्र नष्ट करण्यास मात्र स्पष्ट नकार दिला होता. अण्वस्त्र प्रसाराच्या या मुद्द्यावर पुढे ही भेट होऊ शकली नाही. पण, आपला कार्यकाळ संपल्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजे २००९ साली क्लिंटन यांनी उत्तर कोरियाचा दौरा करून उत्तर कोरियाच्या तावडीत असलेल्या दोन अमेरिकन नागरिकांना आपल्या सोबत आणले होते. 

जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळातही वाटाघाटीचे प्रयत्न केले गेले. पण, उत्तर कोरियाचे सरकार मात्र प्लुटोनियमवर प्रक्रिया करण्याच्या तयारीत होते. यामुळे बुश यांनी केलेले प्रयत्नही फारसे सफल झाले नाहीत.

२००८ साली सत्तेत आलेल्या बराक ओबामा यांच्याकडून उत्तर कोरियाच्या प्रश्नावर बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या. अमेरिकेचे शत्रू असलेल्या देशांशी वाटाघाटी सुरू करण्याचे धोरण बराक ओबामा यांनी अवलंबले. आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या अखेरच्या काळात त्यांनी क्युबाचा दौरा केला. ईराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याशीही त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या. पण, उत्तर कोरियाशी कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करून अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधा पोहोचू नये म्हणून त्यांनी या चर्चा केल्या नाहीत. 

ओबामांनंतर सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही की राजकारणाचा अनुभव नाही. त्यामुळे, ते या प्रश्नावर काय भूमिका घेतात, ही उत्सुकतेची बाब होती. ट्रम्प सत्तेत आल्यापासून किम जाँग उन आणि ट्रम्प यांच्यात दर आठवड्याला शाब्दिक फैरी झडत होत्या. त्यामुळे या देशांतील हे संबंध आणखी जास्त खालावणार, यावर जगाचे जवळपास एकमत झाले होते. पण, ट्रम्प यांनी एक वेगळेच वळण घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

गेल्या काही महिन्यांत उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्या संबंधांतही एक वेगळे वळण आले आहे. फेब्रुबारी महिन्यात प्याँगचँग येथे झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांत या दोन देशातील सहभागी व्यक्तींनी एकाच झेंड्याखाली सहभाग नोंदवला होता. यासाठी किम जोंग उन याची बहीण किम यो जाँग ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होती. कोरियन युद्धानंतर किम घराण्यातील कोणतीही व्यक्ती दक्षिण कोरियाला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. 

४ मार्चला चुंग युई याँग यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने किम जाँग उन याची भेट घेतली. ही भेट बऱ्याच अंशी महत्त्वाची ठरली. दोन्ही देशांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाचा वाटाघाटी झाल्या. पुढे याच चुंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे उत्तर कोरियाने दिलेला प्रस्ताव मांडला, जो ट्रम्प यांनी स्वीकारला. ट्रम्प आणि किम यांची ही भेट मे महिन्याच्या अखेरीपर्यंत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

ही भेट होण्याची शक्यता असली तरी ती कुठे होईल याबाबत मात्र संदिग्धता आहे. उत्तर कोरिया आपली अण्वस्त्रे नष्ट करीत नाही तोवर ट्रम्प हे उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार नाहीत, हे नक्की आहे. पण, किम जाँग उन हे अमेरिकेला जातील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. २०११ साली सत्ताग्रहण केल्यापासून किम यांनी लष्करी उठावाच्या आणि जीवाला असलेल्या धोक्याच्या भीतीने उत्तर कोरियाच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही. त्यामुळे आताही ते बाहेर आणि त्यातही अमेरिकेत जातील, याच्या आशा कमीच आहेत. बहुतांश तज्ज्ञांच्या मते ही भेट पॅनमुनजॉम या उत्तर आणि दक्षिण कोरियात विभागलेल्या गावात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच गावात उत्तर आणि दक्षिण कोरियाचे अधिकारी नेहमी वाटाघाटी करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे ही भेट झालीच तर तिचे ठिकाण हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. 

पण, खरा प्रश्न आहे तो या भेटीतून दोन्ही पक्षांना नक्की काय साध्य करायचे आहे हा. उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे पूर्णतः नष्ट करावी असा अमेरिकेचा आग्रह आहे. पण, त्याच्या शक्यता फारच कमी आहेत. ही अण्वस्त्रे नष्ट झाल्यास आपल्या सत्तेला थेट आव्हान दिले जाऊ शकते, अशी रास्त भीती किम यांना आहे. त्यामुळे अण्वस्त्र नष्ट केल्यास आपली सत्ता अबाधित राहावी अश्या प्रकारच्या कराराची अपेक्षा ते अमेरिकेकडून करू शकतात. पण, हा करार अमेरिकन जनतेला मान्य असेल का, हा प्रश्नच आहे. 

पण, या चर्चा फोल ठरल्या तर काय? हा प्रश्न अमेरिकेतून विचारला जात आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात ठोस काही एकमत झाले नाही, तरी ट्रम्प आणि किम यांच्यातील चर्चा भविष्यातील चर्चांसाठी एक मार्ग निर्माण करेल, अशी आशा आहे. निदान या चर्चा होईपर्यंत तरी अण्वस्त्र चाचण्या तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय उत्तर कोरियाने घेतला आहे. यातूनच उत्तर कोरियासाठी या संभाव्य भेटीचे असलेले महत्त्व लक्षात येते.

इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होत असते, असे म्हणतात.२१ फेब्रुवारी १९७२ साली तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बीजिंगचा ऐतिहासिक दौरा केला. या दौऱ्यानंतर अमेरिकेने चीनवर टाकलेला बहिष्कार २५ वर्षांनंतर संपुष्टात आला. निक्सन आणि माओ झेडोंग यांची भेट ही इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या भेटींपैकी एक ठरली. आज अमेरिकेच्या जागतिक स्थानाला आव्हान देणारा चीन आणि महासत्ता अमेरिका हे जगातील सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. निक्सन आणि माओ यांच्या भेटीमागे हेन्री किसिंजर यांनी केलेल्या शिष्टाचाराचा इतिहास फार रंजक आहे. 

आज डोनाल्ड ट्रम्प आणि किम जाँग उन हे भेट घेणार असल्याची अधिकृत चर्चा आहे. ही भेट प्रत्यक्षात होते की नाही, किंवा या भेटीतून काय साध्य होते हे पाहणे महत्त्वाचे असले तरी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचे संबंध एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठाकले आहेत, ही जगाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. शीतयुद्धाची ही भळभळती जखम कायमची भरून निघणार की ती आणखी चिघळणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.


(लेखक मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयात जनसंपर्क माध्यम विभागात अधिवक्ता पदावर कार्यरत आहेत.)


 

Web Title: North Korea-America relations at an important turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.