तरंगत्या शवपेट्यांचा पिंगपॉंग
By अोंकार करंबेळकर | Published: August 10, 2017 06:43 PM2017-08-10T18:43:22+5:302017-08-10T18:47:43+5:30
या रोहिंग्यांचं करायचं काय? म्यानमार असो वा बांगलादेश... या गरिब लोकांचा कळवळा कोणालाच येत नाही. जगातील सर्वाधीक त्रास भोगावा लागलेला समुदाय म्हणून रोहिंग्यांचा इतिहास लिहिला जाईल.
नवी दिल्ली: म्यानमारमध्ये दुय्यम आयुष्य जगावे लागणाऱ्या अनेक रोहिंग्या मुसलमानांचे हाल देश सोडल्यावरही सुरुच आहेत. आसपासच्या देशांमध्ये आसरा मिळविण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये हाकारलेल्या त्यांच्या नावा अजूनही वणवण करत राहिल्या. भारतामध्येही आजच्या घडीला ४० हजार रोहिंग्या राहात असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत दिली.
म्यानमारमध्ये होणारा त्रास वाचविण्यासाठी हजारो रोहिंग्या मुसलमानांनी मिळेल त्या बोटींनी म्यानमारचा किनारा सोडला. थायलंड, इंडोनेशिया अशा कोणत्याही दिशांना त्यांच्या बोटी गेल्या. दोन तीन महिन्यांहून अधिक काळ बोटींवर काढल्यानंतर काहींच्या बोटी थायलंडच्या किनाऱ्याला लागल्या. त्यांना निर्वासितांच्या छावण्यांमध्ये ठेवल्या आहेत. मात्र अजूनही शेकडो रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया आसरा देईल अशा अपेक्षेत फिरतच आहेत. अनेक बोटींवरील अन्न तसेच पाणीही संपत आले आहे. अशा स्थितीमध्ये रोहिंग्या किती काळ तग धरून राहणार ही काळजीचीच बाब आहे. या बोटी म्हणजे बंगालच्या उपसागरात तरंगणाऱ्या शवपेट्याच झाल्या आहेत. हे गरिब लोक कोणालाच नको आहेत. म्यानमार आणि बांगलादेशने यांची जबाबदारी घेण्यासाठी दोन वर्षांपुर्वीच नकार दिला आहे. शेख हसिना वाजेद यांनी तर हा म्यानमारचा प्रश्न आहे असे सांगत सगळी जबाबदारी ढकलून दिली. तर तिकडे शांततेचे नोबेल मिळविणाऱ्या आंग सान सू की यांनीही या प्रश्नावर मौन धारण केले आहे. बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च गुरु दलाई लामा यांनीही यामध्ये हस्तक्षेप करुन हा प्रश्न सोडावावा अशी विनंती केली होती, मात्र तरिही म्यानमारने यावर ठोस भूमिका घेतली नाही.
रोहिंग्या कोण आहेत?
सुमारे १३ लाख लोकसंख्येचा असणारा रोहिंग्या हा एक मुस्लीम संप्रदाय आहे. म्यानमारमधील राखिने प्रांतात यांची सर्वात जास्त वस्ती होती. मात्र म्यानमारने या मुस्लीमांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे म्यानमारमध्ये त्यांच्यावर शिक्षण, विवाह, जमिन अधिग्रहण अशा अनेक क्षेत्रांवर बंधने लादली आहेत. स्थानिक बौद्ध व रोहिंग्या यांचे संबंधही नेहमीच तणावाचे राहिले आहेत. वांशिक आणि भाषिक कारणांमुळे या दोन्ही गटांमध्ये नेहमीच संघर्ष झालेला आहे. २०१२ साली दोन्ही वांशिक गटांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि सुमारे एक लाख चाळीस हजार नागरिकांना घरे सोडावी लागली. गेल्या तीन वर्षांमध्ये एक लाख वीस हजार रोहिंग्यांनी स्थलांतर केल्याचा युएनचा अंदाज आहे. रोहिंग्याना आता या जगात आपले कोण नाही याची जाणिव होत चालली आहे. त्यांना स्वीकारायला कोणीच उत्सुक नाही. इंडोनेशियासह अनेक देशांनी जबाबदारी झटकल्याने युएननेही चिंता व्यक्त केली आहे. सतत पाण्यावरतीच भरकटत राहिल्याने रोहिंग्यांना बोट पिपल अशा नव्या संज्ञेने ओळखले जात आहे. रोहिंग्यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी थायलंडमध्ये या महिन्यात होऊ घातलेल्या बैठकीस उपस्थित राहणार नाही असे म्यानमारने कळवून चर्चेचा प्रस्तावही धुडकावला आहे.
आशियाई स्थलांतरितांचे काय?
उत्तर अफ्रिकेतील मोरोक्को, लिबियासारख्या देशांमधून इटली, ग्रीस मार्गे युरोपामध्ये नेहमीच बेकायदेशीर स्थलांतर होत असेत. त्यांच्याही बोटी भूमध्य सागरामध्ये संकटात सापडतात. यथाशक्ती युरोप त्यांना संकटातून बाहेरही काढतो. मात्र रोहिंग्यांना कोणीच निवारा देत नाही असे दिसून येत आहे. रोहिंग्यांचे मानवी हक्क तरी त्यांना मिळतील अशी अपेक्षा आहे.
सीरिया ते रोहिंग्या डळमळीत जगाचे वास्तव
दुसऱ्या महायुद्धानंतर सर्र्वात मोठे स्थलांतर कधी झाले असेल ते गेल्या दोन वर्षांंमध्ये. सीरियामधील यादवीमुळे लाखो लोकांना आपली घरे सोडून युरोपच्या मार्गावर निघावे लागले. तेथेही या स्थलांतरितांचा प्रश्न सुटलेला नाही. हंगेरीसारख्या पुर्व आशियातील देशांनी तर सीमांना कुंपण घालून दारे बंद करुन घेतली. तिकडे अमेरिकेतही मेक्सीकन स्थलांतरित येऊ नये म्हणून भिंत बांधण्याची कल्पना पुढे आली. तर आशियात हे बोट पिपल निवारा शोधत फिरत राहिले. या दोन देशांमध्ये जगभरातील मा़णूसकीचा चेहरा बदलून गेला आहे.