क्वीन्सलँड हे तर जणू पृथ्वीवरील स्वर्गच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:11 AM2017-11-12T00:11:05+5:302017-11-12T00:12:17+5:30
आॅस्ट्रेलिया हा देश चित्रात, सिनेमात दिसतो, त्याहून नितांत सुंदर आहे. क्वीन्सलँड हे तर जणू पृथ्वीवरील स्वर्गच! ‘जगाच्या पाठीवर यासारखे दुसरे स्थळ नाही,’ अशी या राज्याची टॅग लाइनच आहे आणि ती रास्त आहे.
- नंदकिशोर पाटील
आॅस्ट्रेलिया हा देश चित्रात, सिनेमात दिसतो, त्याहून नितांत सुंदर आहे. क्वीन्सलँड हे तर जणू पृथ्वीवरील स्वर्गच! ‘जगाच्या पाठीवर यासारखे दुसरे स्थळ नाही,’ अशी या राज्याची टॅग लाइनच आहे आणि ती रास्त आहे. दर्यावर्दी, पशू-पक्षी, निसर्गप्रेमी आणि साहसाची आवड असणाºयांसाठी तर क्वीन्सलँड पर्वणीच. निळ्याशार अथांग समुद्रातील बोटीतील सफर असो की, त्याच समुद्रात डुबकी मारणे. हा अनुभव आयुष्याला वेगळीच ओल देऊन जातो. ब्रिस्बेन विमानतळावर उतरताक्षणीच तेथील मनमोहक वातावरणानेच मन प्रसन्न होऊन जाते. या ब्रिस्बेन शहरात शिरण्यापूर्वी जरा प्राणिसंग्रहालय, सनशाइन कोस्ट, मलुुलुबा बीच अशा अवतीभोवतीच्या रम्य स्थळांचा फेरफटका मारून येऊ या.
स्टीव्ह एरविन हे नाव जिओग्राफी चॅनेलमुळे तसे आपल्या परिचयाचे. महाकाय मगरींच्या जबड्यात हात घालणारा हाच तो स्टीव्ह एरविन! त्याच्याच मालकीचे हे आॅस्ट्रेलिया प्राणिसंग्रहालय. सत्तर एकर जागेवर वसवलेल्या या संग्रहालयात एक हजाराहून अधिक प्रकारचे प्राणी आपल्याला भेटतात. भला मोठा लांबसडक अजगर गळ्यात अडकवून आपण फोटो काढू शकतो किंवा चित्त्यासोबत सेल्फी! पर्यटकांसाठी आयोजित केला जाणारा पशु-पक्षांचा एक लाइव्ह शो पाहताना रंगीबेरंगी पक्षी चक्क आपल्या अंगाखांद्यावर नकळतपणे येऊन बसतात. खा-या पाण्यातील अवजड मगरींना जवळून पाहताना अंगाचा थरकाप उडतो. आॅस्ट्रेलियात हत्ती आढळत नाहीत, पण इथले टायगर्स खिलाडू वृत्तीचे आहेत. (संग्रहालयातील!) तुम्ही त्यांची मस्ती जवळून अनुभवू शकता. या प्राणिसंग्रहालयाची सफर करण्यासाठी खास वाहनांची सोय आहे. मात्र, निवांत वेळ काढून तिथे गेले पाहिजे. संग्रहालय बघून झाल्यावर आपण स्टीव्हला धन्यवाद द्यायला विसरत नाही, पण समुद्रातील स्ट्रींग रे माशाच्या दंशाने त्याचा जीव गेल्याचे ऐकून आपण हळहळत बाहेर पडतो.
ब्रिस्बेन शहरापासून ९७ किमी अंतरावर वसलेले मलुुलुबा हे एक टुमदार टुरिस्ट रिसॉर्ट टाउनशिप. जगभरातील पर्यटक खास उसंत काढून इथे येतात. ज्यांना स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, पॅराशूटिंग आणि पोहण्याची आवड आहे, त्यांनी जरूर या स्थळाला भेट द्यावी. निळ्या समुद्रातील जलचरांची अनोखी रंगीबेरंगी अद्भुत दुनिया इथे पाहायला मिळते.
रूपेरी वाळूवर चालता-चालता समुद्रात डुबकी मारण्याचा आनंद काही औरच. सनशाइन कोस्टच्या जवळ असल्याने
एखादे वाहन भाड्याने घेऊन आपण ब्रिस्बेनहून इथे पोहोचू शकतो. सात
हजार लोकवस्ती असलेल्या या टुमदार शहरात जगभरातील व्यंजनांचा आस्वाद घेता येतो.
भारतीयांसाठी ‘हाती’सारखी रेस्टॉरंट्स आहेत. इथे साकारण्यात आलेले ‘सी
वर्ल्ड’ बघण्यासारखे आहे. जगभरातील जलचरांची ही अनोखी दुनिया अगदी
जवळून न्याहाळताना आपण हरखून जातो. समुद्राच्या पोटात वसलेल्या जगाची सफर या सी वर्ल्डमध्ये बघायला मिळते.
रेंबो बीचवरची सोनेरी वाट
क्वीन्सलँडमधील अनेक आकर्षणापैकी रेंबो बीचवरची सफर अशीच अनोखी. नोसा या टुमदार टुरिस्ट टाउनशिपवरून सुरू होणारी आणि ७० किमी लांबीच्या समुद्राच्या काठाने सोनेरी वाळूतून केली जाणारी ही सफर डोळ्यांचे पारणे फेडते. भगव्या, सोनेरी आणि पांढºया मातीचे डोंगर व या डोंगरावरून वाºयामुळे समुद्रात मिसळणा-या या मातीमुळे पाण्याचा रंगही बदलून गेलेला. समुद्राकाठी वाळूतून मोटारीने होणारा हा प्रवास मनाला नवी उभारी देऊन जातो. केवळ एसयूव्ही प्रकारातील वाहनेच या वाळूतून जाऊ शकता. शिवाय, ती चालविण्याचे कसब तुमच्याकडे असायला हवे. ब्रिस्बेन आणि परिसरातील मंडळी गाडीवर तंबू टाकून, खानपानाचे सर्व साहित्य घेऊन सुट्टीच्या दिवशी इकडे कूच करतात आणि समुद्राच्या काठी तंबू ठोकून देतात. डोंगरातून पाझरणारे गोड्या पाण्याचे झरे समुद्रात मिसळतात. मौल्यवान मोती, हिरे इथे आढळतात. तुम्ही भाग्यवान असाल, तर एखादा हिरा तुमच्या वाट्यालाही येऊ शकतो!