दोन तास त्रेपन्न मिनिटं आणि तेहतीस सेकंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:33 PM2020-09-26T18:33:15+5:302020-09-26T18:35:16+5:30
शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या नात्यांमध्ये उद्भवणारी भांडणाची कारणे, या भांडणांचा कुटुंबातल्या मुलांवर होणारा विपरीत परिणाम यासाठी हा सिनेमा जाणीवपूर्वक पहावा.
सिनेमा पॅराडिसो ( 1988 ) 2 तास 4 मिनिटांचा सिनेमा . दिग्दर्शक - गुसेप टॉर्नटोर . ( इटली )
- यी यी ( वन अदर अनादर ) ( 2000 ) 2 तास 53 मिनिटं .
- दिग्दर्शक - एडवर्ड यांग . ( चीन / तैवान )
एका कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर काम करणारा एन.जे. प्रामाणिक एन.जे. ( Wu Nien Jen ) नावाच्या नायकाच्या तरुणपणाच्या प्रेमाची विफलता आणि 30 वर्षांनी पुन्हा भेटणारी प्रेयसी . त्याच्या मुलांच्या मनात नात्यांसंदर्भात असणारं कुतूहल आणि घालमेल. शहरी मध्यमवर्गीय कुटुंबातल्या नात्यांमध्ये उद्भवणारी भांडणाची कारणे, या भांडणांचा कुटुंबातल्या मुलांवर होणारा विपरीत परिणाम यासाठी हा सिनेमा जाणीवपूर्वक पहावा.
नैतिक, अनैतिक किंवा मालकी हक्कातून होणाऱ्या लैंगिक कोंडमाऱ्यावर उत्तर शोधताना चुकवावी लागणारी समाजाची नजर, सतत दोषी वाटत राहण्यातून येणारं वैफल्य. प्रत्येक अनुभवातून एक बाजू दिसत असते, त्या अनुभवाची दुसरी बाजू किंवा ' मला जे दिसतं ते तुम्हाला का दिसत नाही आणि तुम्हाला जे दिसतं ते मला का दिसत नाही ? ' , असा उद्बोधक प्रश्न विचारणारा एन.जे. चा मुलगा यांग यांग ( जोनाथन चँग )
' जग सुंदर आहे ', असं म्हणत जे आहे ते तसंच स्वीकारत वर्तमानाला सामोरी जाणारी ठख ची मुलगी टिंग टिंग ( केली ली ). आपल्या नातीला सकारात्मक दृष्टीनं फुलपाखरू होण्याची आशा देणारी आज्जी. कलेवर प्रेम करणाऱ्या लिली आणि तिचा बॉयफ्रेंडच्या हातून लिलीच्या आईशी अनैतिक संबंध असणाऱ्या शिक्षकाचा होणारा खून. नशिबावर भरवसा ठेवून आयुष्य कंठणारा आह - डी हे सगळं मिश्रण अगदी सहज गुंतवून ठेवतं. तैवानमधल्या तैपेई शहराच्या पार्श्वभूमीवर हे कथानक बेतलेलं आहे.
मी ' सिनेमा पॅराडिसोचा ' उल्लेख करण्याचं कारण म्हणजे सिनेमात 40 वर्षांनी भेटलेलं प्रेम आणि ' यी यी ' या सिनेमात 30 वर्षांनी भेटलेलं प्रेम. सिनेमा पॅराडीसो मध्ये 40 वर्षांनी भेटलेल्या प्रेयसीला प्रियकर म्हणतो की आपण पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया तेव्हा प्रेयसी म्हणते की , जे आपण जगलेलो आहोत ते क्षण महत्वाचे आहेत . आपण त्या क्षणांच्या आठवणीत वर्तमान जगायचा . आपण घडलेलं स्वीकारायचं !
यी यी या सिनेमात ' शेरी ' ( एन.जे. ची प्रेयसी ! ) एन.जे. ला म्हणते की , आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करूया . तेव्हा एन.जे. म्हणतो की , आपण हे परिवर्तन आणि वर्तमान स्वीकारूया ! मला या दोन्ही सिनेमातला हा समान धागा खूप भावला !
दोन्ही सिनेमात वाट बघणाऱ्या प्रेमाला विरह सोसावा लागला आहे . असं जरी असलं तरी आयुष्य थांबलेलं नाही . ती वेळ व्यवस्थेतल्या क्रूर कारणांनी हिरावून घेतलेली आहे. तो काळ पुन्हा येणार नाही ; पण ते क्षण अनुभवून आयुष्याला पुन्हा रंगीत करता येऊ शकतं . हां , हे खरं आहे की , त्या पहिल्या प्रेमाच्या रंग कधीच उतरत नाही ! पण नवीन प्रेमाला रंगण्याचा अवकाश असतो , हे अत्यंत सकारात्मक आहे !
प्रेम विफल होण्याला उत्तर आधुनिक समाजमानसिकता , शहरी - ग्रामीण पार्श्वभूमी , जात - धर्माच्या आधुनिक नेनिवा , गरीब - श्रीमंतीची भयाण दरी इत्यादींपैकी काहीही सत्ता - संपत्ती , मालकी हक्कांनी बाधित कारणं असता . दिवसागणिक उत्क्रांत, विकसित
( ! ) होत जाणारी समाजव्यवस्था मानवी भावनांच्या , सत्ता - संपत्तीची मालकी नसणाऱ्या माणसांच्या कत्तलीतूनच उभा रहात असते !
माणूस , प्राणी , पक्षी , झाडं यांचा शोक , कल्लोळ कानावर येऊ न देण्याची तजवीज व्यवस्थेनं केलेली असते . या तजवीजीमध्येच पुंजीपती , नोकरशहा आणि सरकारचं हित सामावलेलं असतं ! भ्रामक समाधान देणाऱ्या बाजारात आपण हरवलेलो आहोत , याचं भान अनेकांना नाही.
सामाजिक दबावानं मानसिक , शारीरिक , सांस्कृतिक , आर्थिक , राजकीयदृष्ट्या भरडल्या जाणाऱ्या आयुष्याला किमान फेस्टिव्हल्स आणि ओटीटीच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोहोचावा आणि असे सिनेमे निर्माण करणाऱ्या सगळ्या हातांना ताकत यावी एवढीच माफक अपेक्षा ! सिनेमात समाजव्यवस्था बदलण्याची, सत्ता - संपत्तीच्या मालक्या खिळखिळी करण्याची क्षमता असते !
- अमित प्रभा वसंत.