अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा अन् लबाडांवर कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 07:22 PM2018-06-03T19:22:17+5:302018-06-03T19:22:17+5:30
-हितेंद्र काळुंखे
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरप्रकारांना आळा बसावा या हेतूने शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली. यामुळे बदली प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना खूपच घोळ या प्रक्रियेत झाले असून याचा मनस्ताप अनेक शिक्षकांना सहन करावा लागत आहे. ही स्थिती अशी झाली आहे की, एखाद्या रोगावर इलाज केल्यावर त्याचा रोग बरा तर झालाच नाही, मात्र रोग आणखीनच वाढला. यामुळे इलाज केला नसता तर बरे झाले असते असे म्हणण्याची वेळ आॅनलाईन बदली प्रक्रियेबद्दल आली आहे. या प्रक्रियेत बरेच घोळ झाले असून एका शिक्षकाची बदली ज्या ठिकाणी शाळाच नाही, अशा ठिकाणी करण्यात आली आहे. यामुळे या शिक्षकापुढे रुजू होण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही शिक्षकांनी तर आॅनलाईन माहिती चुकीची भरुन आपली बदली सोयीस्करपणे करुन घेतल्या आहेत. यामुळे इतर ज्या शिक्षकांवर अन्याय झाला, त्या शिक्षकांनीच ही बाब उघड केली. अशा प्रकारे या प्रक्रियेतील त्रुटींचा फटका वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांना बसला आहे. याबाबत शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ७३७ शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारीत आदेश दिले आहे. मात्र या आदेशात देखील प्रचंड घोळ झाला असून पती-पत्नी एकत्रीकरणातील शिक्षकांचीच उचलबांगडी झाल्याने अनेक शिक्षक वैतागले आहे. त्यातच शिक्षकांना कुठेच दाद मिळत नसल्याने त्यांनी थेट पुण्याचे एनआयसी सेंटर गाठले. यामुळे राज्याचे बदली समन्वयक प्रदीप भोगले यांची डोकेदुखी वाढली असल्याने त्यांनी थेट शिक्षकांवर पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, यामुळे न्याय मागायचा तरी कोणाकडे अशी स्थिती जिल्ह्यातील शिक्षकांपुढे निर्माण झाली आहे. याबाबतीत लोकप्रतिनिधींनीच लक्ष घालणे आता गरजेचे झाले आहे. तर दुसरीकडे शिक्षकांवर चांगले नागरिक घडविण्याचे काम असताना स्वत: शिक्षकच योग्यरित्या वर्तन करीत नसतील तर ही बाबही खूपच गंभीर आहे. यामुळे ज्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेत खोटी माहिती देवून फसवणूक केली आहे, त्या शिक्षकांवरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे.