संकल्प सिद्धीस जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:28 PM2018-06-02T13:28:41+5:302018-06-02T13:28:41+5:30
-विजयकुमार सैतवाल
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ३१ मे रोजी आरोग्य विषयक जनजागृती होऊन तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेण्यात आली. असे उपक्रम स्वागतार्हच आहे, मात्र ज्या ज्या कार्यालयांमध्ये अशी प्रतिज्ञा करण्यात आली तेथे यापुढे तंबाखूजन्य पदार्थांमुळे भिंती रंगणार नाही व ३१ रोजी केलेले संकल्प सिद्धीस जाता की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित शहरात सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ रोजी पहिल्या दिवशी सर्वांनी तंबाखू मुक्तीच शपथ घेतली. तंबाखू सेवनाने होणारे कर्करोग तसेच विविध हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, मोतीबिंदू इत्याही प्रमुख आजारांबरोबरच आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू नयेत यासाठी सर्वांनी तंबाखू सोडावी असे आवाहनही जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या वेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही शपथ देण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.
जि.प.मध्येही विविध विभागाच्या कर्मचाºयांनी तंबाखूमुक्तीबाबत प्रतिज्ञा घेतली. सोबतच जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह जि.प.चे कार्यालय तंबाखूमुक्त करण्याबाबतही चर्चा झाली. मात्र सर्वच ठिकाणचा अनुभव पाहता शासकीय कार्यालय, आरोग्य केंद्र, शाळा परिसर गुटख्याच्या थुंकीने रंगलेले आढळून येतात. संबंधितांवर कारवाईदेखील होऊ शकते, मात्र तसे चित्र जिल्ह्यात तरी दिसलेले नाही. त्यामुळे येणाºया काळात तंबाखूमुक्तीची अंमलबजावणी होऊ शकते की नाही, या बाबत प्रश्न निर्माण होतात.
तंबाखूमुळे ३० टक्के लोकांना कर्करोग होतो. सोबतच फुफ्फुसाचे आजार, पक्षाघात यासारखे आजार होतात. तंबाखूमधील ६९ प्रकारचे घटक हे शरीराला घातक असून त्यांचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होतात, असे मार्गदर्शन मान्यवरांनी या वेळी केले. अशा प्रबोधनासह दंडात्मक कारवाईबाबतही माहिती देण्यात आली. त्यामुळे आता या दंडात्मक कारवाईचा बडगा कर्मचा-यांवर कितपत उपायकारक ठरू शकतो, हे येणारा काळच सांगू शकेल.