महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:08 AM2020-07-27T11:08:44+5:302020-07-27T11:09:54+5:30

काळ आला होता... पण आम्ही सर्वांनी त्याला आत्मशक्तीच्या जोरावर पळवून लावले. कारण महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास करणाऱ्या जवळपास हजार, दीड हजार लोकांमध्ये एक दैवी शक्ती आलेली होती.

The catastrophic thrilling journey of the Mahalakshmi Express | महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास

Next
ठळक मुद्देमहालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास काळ आला होता... पण

दि. २६ जुलै २०१९, रात्री आठ वाजता जेवण करून हिरानंदांनी, ठाणे येथून स्टेशनसाठी निघालो. भाऊ सुभाष घरी नव्हता म्हणून आज वडील अगदी रिक्षापर्यंत पोहोचवायला आले होते. पाऊस असल्याने रिक्षा मिळायला अडचण येत होती. कुणी स्टेशनला यायला तयार होत नव्हते. स्टेशनचा रस्ता अरुंद असल्याने रिक्षाच लवकर पोहोचू शकत होती. त्यामुळे ओला-उबेरचा पर्याय नव्हता. थोड्या प्रयत्नाने एक रिक्षावाला मोठ्या मुश्किलीने तयार झाला.

वडिलांचा निरोप घेऊन मी निघालो. त्यांच्या मनात मी अजून दोन दिवस राहून पाऊस कमी झाल्यावर निघावे असे होते; पण ह्यतत्काळह्णमध्ये तिकीट काढल्याने व बसपेक्षा रेल्वेचा प्रवास सुरक्षित असतो, या भावनेने मी निघालो. जेवण करूनच निघालो होतो; तरीपर आईने चपात्या व पिठलेपोळी बांधून दिले होते. मी म्हणत होतो की, सकाळी उठले की कोल्हापूरला पोहोचणार, मग हा डबा मी कधी खाऊ? पण वडिलांनी आग्रह धरला. ते म्हणाले, की, पावसाचे दिवस आहेत. वाटेत ट्रेनला उशीर वगैरे झाला तर खाता येईल. बरोबर असावे.

दिवसभर पावसाची मुसळधार सुरूच होती. स्टेशनला पोहोचतो न पोहोचतो तोच विजा व गडगडाटासह मोठा पाऊस सुरू झाला. छत्री असूनही अर्धा भिजलो. कसेबसे सावरीत, उड्डाणपुलाचा आडोसा घेत, वरून कोसळणारे पाणी चुकवीत, प्लॅटफॉर्म नंबर पाचला पोहोचलो. अ‍ॅपवर एकदा प्लॅटफॉर्म व गाडीची वेळ तपासली. गाडी १५ मिनिटे उशिराने धावत होती.

सर्व चाकरमान्यांची लगबग व धावपळ सुरू होती. तीन-चार गाड्या गेल्यानंतर महालक्ष्मी एक्स्प्रेस आली. ठीक ९.१६ मिनिटांनी ठाणे येथून निघाली. मी एसी टू टीयरच्या ए-१ कोचमध्ये माझ्या लोअर बर्थवर विसावलो. काचेच्या खिडकीतून बाहेर बघितले. पाऊस अजूनही मुसळधार सुरू होता. माझ्या आजूबाजूच्या प्रवाशांनी एव्हाना झोपण्याची तयारी केली होती. मी अंग कोरडे केले व आरामात बसलो. सवयीप्रमाणे मोबाईलमध्ये मेसेजेस पाहिले; पण लक्ष सतत खिडकीबाहेर ट्रॅकवर होते.

गाडीने ९.४५ ला कल्याण स्टेशन सोडले. घरच्या सगळ्यांचे फोन झाले. गाडी सावकाश मार्गस्थ होत होती; पण माझे मन झोपण्यास राजी होत नव्हते. मी आडवा होऊन लाईव्ह न्यूज बघण्याचा प्रयत्न करीत होतो. तेवढ्यात साधारण दहाच्या दरम्यान गाडी उल्हासनगर सोडून थांबली. (लोकेशन १९.२१३६७५, ७३.१४४००). मी लगेच भावाला फोन केला; कारण मला बाजूच्या ट्रॅकवर पाणी दिसले. मनात शंकेची पाल चुकचुकली.

अर्धा तास झाला होता. बाजूच्या ट्रॅकवरून एकही गाडी गेली नव्हती. मी तसे त्याला सांगितले व म्हटले की, आजसुद्धा २६ जुलै आहे; ही २००५ ची पुनरावृत्ती नाही ना? सखल भाग असल्यामुळे कदाचित ट्रॅकवर पाणी आले असावे व ते ओसरले की गाडी सुरू करतील. साधारणपणे एक तासानंतर म्हणजे जवळपास ११ वाजता ट्रेन हळूहळू पुढे जाऊ लागली. मी खिडकीच्या काचेला डोके लावून बाहेर पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. मध्येच वीज चमकायची. त्यावेळी दिसायचे ते फक्त पाणीच.

काही दिवसांपूर्वी कुणीतरी पाण्यातून लोकल ट्रेन जातानाचा व्हिडिओ पाठविलेला आठवला. अगदी तशीच माझी ट्रेन निघाली होती. मी व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला; पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हते. मी शांतपणे बाहेरचे दृश्य बघत होतो. एव्हाना लोकांचा घोरण्याचा आवाज प्रखरपणे जाणवत होता.

गाडी थोडी पुढे येऊन अंबरनाथ स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला लागली. काही प्रवासी इथे उतरलेही. माझ्या मनात तसा विचार आला; पण मग परत ठाण्याला जायला अडचण होती. रात्री झालेली व सगळीकडे पाणी. तशात मला ती २६ जुलैची रात्र आठवली. भाऊ त्यावेळी कल्याणमध्ये पाण्यात अडकला होता आणि हा संपूर्ण परिसर त्यावेळी पाण्याखाली गेलेला मला ज्ञात होता. त्यामुळे मी गाडीतच शांतपणे पडून राहिलो.

थोड्या वेळाने गाडी थोडी पुढे सरकू लागली, तसे मला बरे वाटले. मनात म्हणालो की, आत्ताच उतरलेली मंडळी गाडी जाताना बघून कपाळावर हात मारत असावीत. मी स्वत:ला नशीबवान समजत होतो; पण नियतीने पुढे काहीतरी भयावह लिहून ठेवले होते आणि गाडी तशीच पुढे थांबली.

आता एसी डब्यामध्ये थोडे गरम वाटू लागले होते. मी पंखा चालू केला; पण झोप येत नव्हती. डोळे मिटून तसाच पडून राहिलो. ठीक ३.३८ ला ट्रेन सुरू झाली. मी लगेच भावाला मेसेज केला की, ट्रेन निघाली आहे; कारण वेगावरून वाटत होते की, आता मार्ग निर्धोक असावा.

मी काचेतून निसर्गाचे दिसणारे रौद्ररूप पाहत होतो. तशातच बदलापूरचे स्टेशन न घेता गाडी पाण्यातून पुढे मार्गाक्रमण करतानाचे दृश्य पाहून अवाक् झालो. मी विचार करीत होतो की, एवढा पाऊस जर इथे असेल तर घाटांमध्ये बोगदे सुरक्षित असतील का? एकसारख्या नाना शंका मला माझ्या मनामध्ये येत होत्या. जवळ कुणाशी बोलण्यासारखे कोणी जागेही नव्हते.

बाहेर काय चालू आहे हे कुणाच्याही गावी नव्हते. मी पटकन मोबाईलवर पुन्हा माझे करंट लोकेशन पाहिले व मला धडकीच भरली. पुढे पूर्ण डाव्या बाजूला नदी होती. मी उजव्या बाजूला ट्रॅकवर पाहिले. पूर्ण पाणी होते. गाडीचा ड्रायव्हर एवढे धाडस का करतो आहे, याचे मला आश्चर्य वाटत होते.

बहुधा तो एवढा पाण्याचा पट्टा ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असावा. काहीच आकलन होत नव्हते. बदलापूर स्टेशन ओलांडून चार किलोमीटर गाडी पुढे आली आणि थांबली. (वेळ : पहाटे ४.००, लोकेशन ९.१३७७९९, ७३.२५८७३९). बाहेर संपूर्ण पाणी होते. टॉर्चने पाहण्याचा प्रयत्न केला; पण काहीच दिसत नव्हते. कोचमध्ये कोणीच जागे नव्हते आणि माझ्या सगळ्या शंका वा कुशंका अगदी तंतोतंत खऱ्या ठरत होत्या.

मला मनोमन उमगले, काहीतरी भयंकर घडत आहे. मी पुन्हा माझे लोकेशन पाहिले व अस्वस्थ झालो. अजून पाच-सहा किलोमीटर पुढे सरकलो असतो तर नदीची भीती टळली असती. बरोबर २०-२५ मिनिटांनी गाडी हळूहळू पुढे सरकली. पूर्ण पाण्यातूनच ती पुढे सरकत होती.

पुन्हा ड्रायव्हर मोठा धोका पत्करून गाडी नेतो आहे, असे वाटत होते. जेमतेम एक किलोमीटर गाडी पुढे आली असावी आणि पुन्हा थांबली. मी पुन्हा लोकेशन तपासले. वेळ : पहाटे ४.३० वा., लोकेशन १९.१२७८१९, ७३.२६१८६३. गुगलवर नदी २५-३० मीटरवर दिसत होती; पण पावसाच्या पाण्याने फुगून ती ट्रॅकवर येऊन पोहोचली होती. दरवाजा उघडून मोबाईल टॉर्चने मी पाणी पाहण्याचा प्रयत्न केला. खालच्या पायरीला पाणी लागल्याचा अंदाज येत होता. मी लगेच भावाला फोन केला. आम्ही पाण्याचा अंदाज बांधू लागलो.

एक जमेची बाब म्हणजे ट्रेन कुठे पुलावर उभी नव्हती किंवा आजूबाजूला कुठेही पूल नव्हता. मी इंटरनेटवरून भरती-ओहोटोची वेळ काढली व दर १५-२० मिनिटांनी दरवाजा उघडून पाण्याची पातळी बघत राहिलो. पाणी वाढतच होते. सुरक्षेच्या दृष्टीने कोचमधली सगळी उपकरणे बंद करण्यात आली.

एव्हाना टी. सी. व इतर तीन-चारजणांची ओळख झाली होती. जसजसे उजाडू लागले तसतसे कळून चुकले की आम्ही पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलो आहोेत. मी भावाच्या सतत संपर्कात होतो. पाणी झपाट्याने वाढत होते. सकाळचे सव्वासहा वाजले. मी लगेच तिथले व्हिडीओ, काही फोटो, लोकेशनसहीत भावाला पाठविले. तसेच एनडीआरएफ इमर्जन्सी कंट्रोल रूम, आरपीएफ कंट्रोल रूम यांनाही कळविले.

गाडीच्या दरवाजाजवळच मोबाईल रेंज येत होती. डेटा कनेक्टिव्हिटीही अंधुक असल्यामुळे फोटो व व्हिडीओ जाण्यास खूपच अडचण येत होती. पुष्कळ प्रयत्नांनी यश येत होते. भावाने पुढे ठाणे येथील कलेक्टर साहेबांना याची कल्पना व पूर्ण माहिती दिली. मीसुद्धा मंत्रालयामध्ये आमच्या डायरेक्टरांना कळवून फोटो, व्हिडीओ व इतर माहिती दिली, जी त्यांनी पुढे रेल्वे मंत्रालयामध्ये पाठवली. माझ्याजवळ जेवढे महत्त्वाचे कॉटॅॅक्टस होते, त्या सर्वांना मी मेसेज केले. इतरही माझे साथीदार आपापल्या परीने प्रयत्नशील होते.

आतापर्यंत बहुतेक प्रवासी जागे झाले होते व बाहेरचे दृश्य बघून हबकले होते. काहीजणांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. आम्ही सगळ्यांना धीर दिला. मी भरतीची ७:४९ ची वेळ सगळ्यांना सांगितली. कुठल्याही परिस्थितीत आठ वाजेपर्यंतच पाणी वाढेल, याची सगळ्यांना कल्पना दिली; पण पुढे पावसावर पूर्ण अवलंबून होते याचीही कल्पना येत होती.

पाऊस अजूनही वर्चस्व गाजवीत होता. डाव्या बाजूची उल्हास नदी प्रचंड वेगाने दुथडी भरून वाहत होती. मोठमोठे ओंडके वाहून जात होते. उजवीकडील नेरूल-बदलापूर दुपदरी हायवे हासुद्धा एक नदी बनला होता. पाण्याला प्रचंड वेग होता.

नदीचे पाणी ट्रेनखालून हायवेच्या दिशेने जात होते. ट्रेनची शेवटची वरची पायरी बुडाली होती. ट्रेनमध्ये पाणी घुसण्यास अगदी काही इंचच बाकी होते. सगळ्यांना फोन गेले होते. पलीकडून हीच माहिती मिळत होती की, आम्ही रेस्क्यू टीमची व्यवस्था करतोय. वाट पाहण्याव्यतिरिक्त काही गत्यंतर नव्हते.

ट्रेनजवळ पोहोचण्याचे सगळे रस्ते पाण्याखाली होते. तेवढ्यात ७.३० च्या दरम्यान काही अतिउत्साही तरुणांनी पाण्यात उडी घेतली होती; पण प्रचंड प्रवाहापुढे त्यांचा निभाव लागला नाही. हायवेवरच्या लोकांनी त्यांना दोर टाकून सुरक्षित स्थळी नेले. आमच्या सहनशीलतेचा कस लागत होता.

मी माझ्या जागेवर हताशपणे येऊन बसलो. थकलो होतो. घशाला कोरड पडली होती. माझ्या मन:चक्षूसमोरून एक भीषण प्रसंग सरकू लागला. पाणी वाढतच राहिले तर? पाऊस थांबलाच नाही तर? आजूबाजूच्या धरणांचे पाणी सोडले तर? ट्रेन एका बाजूला झुकली होती. ती कलंडली तर? असे नाना विचार येऊ लागले.

मला मागे एक व्हिडिओ पाहिलेला आठवला. ज्यामध्ये एक गृहस्थ झोपलेला उठून बसतो; पण तो स्वत:ला चटईवर झोपलेला बघतो. आजूबाजूला आई-वडील, मुले-बाळे, पत्नी धाय मोकलून रडताहेत. बाहेर लोक हळहळताहेत. तो सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो; पण त्याला कुणी पाहू शकत नाहीत व मग त्याला पटते की, आपली इहलोकीची यात्रा संपली आहे. अर्थात वेळ गेलेली असते व मग त्याला आठवते, अरेरे... ह्या गोष्टी राहिल्या, त्या गोष्टी राहिल्या, अजून थोडा वेळ पाहिजे होता. बऱ्याच गोष्टी अपूर्ण राहिल्या. तसे मला झाले.

घरच्यांचा टाहो दिसू लागला. पण... नाही... नाही... हे होणे नाही. कदापि नाही... मी सभोवती नजर फिरविली आणि मला कळून चुकले की, इथे माझी गरज आहे. ही परिस्थिती काही गंभीर नाही. आपण ह्यावर मात करू शकतो. या घडीला मी एक सोल्जर आहे व सोल्जर कधी हरत नसतो. स्वत:ला सावरले व पुन्हा दरवाजापाशी येऊन उभा राहिलो, नव्या उमेदीने. घरी पुन्हा एकदा सगळ्यांना फोन करून क्षेमकुशल कळविले व निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सज्ज झालो.

लगेच परिस्थितीची जाण ठेवून आम्ही पाच-सहाजणांनी एक ग्रुप करायचे ठरविले. सगळ्यांचे नंबर घेऊन पटकन् व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनविला. महालक्ष्मी ए-१ रेस्क्यू टीम. मग आजूबाजूच्या कोचमध्ये फिरून आम्ही लोकांना धीर दिला. ट्रेनमध्ये दोरी वगैरे काहीच नव्हती; तर एकाने शक्कल लढवली. ट्रेनमधल्या पांढऱ्या बेडशीट्स लांब, सरळ करून, एकमेकांना गाठी मारून सगळ्यांनी मिळून एक लांब दोर तयार केला, जो कठीण प्रसंगी वापरता यावा. सर्वांनी आपल्याजवळचे खाद्यपदार्थ एकमेकांना दिले; पण कुणाकडेच पाणी शिल्लक नव्हते.

ट्रेनमधील नळाचेही पाणी संपले होते. वॉशरूम्स तुडुंब भरल्याने तेही वापरायची सोय नव्हती. चहूबाजूंनी नियती फक्त परीक्षा घेत होती. लहान मुलांचे, आबालवृद्धांचे, रुग्णांचे हाल बघवत नव्हते. लहान मुले भेदरलेली होती. तशाही परिस्थितीत माझ्या कोचमधली आठवी इयत्तेत शिकणारी मुलगी हसत होती. तिला अजिबात भीती वाटत नव्हती. ती आता बोट येणार म्हणून आनंदी होती. मग मी तिला डोंगराकडे बोट दाखवून सांगितले की, जंगल ट्रेकिंगपण होणार आहे म्हटल्यावर तिला आणखी आनंद झाला. तिच्या धिटाईचे कौतुक करून मी पुढे गेलो.

माझ्या मित्रांना एक माता निर्वाणीचा फोन करताना दिसली. त्यांनी तिची समजूत काढली व धीर दिला. पुढे एक भगिनी जप करताना दिसली. त्याही पूर्ण भेदरलेल्या व घामाघूम झालेल्या दिसल्या. मी त्यांना दरवाजाजवळच्या सीटवर वाऱ्याला बसवले व घाबरण्याचे कारण नसल्याचे पटवून दिले.

तेवढ्यात वरिष्ठांचा फोन आला व आपत्ती व्यवस्थापनाची टीम निघाल्याचे कळविण्यात आले. वेळ पडल्यास शासनाने एअर लिफ्टचीही तयारी केल्याचे सांगण्यात आले. साधारणपणे दहा वाजता ठाणे कलेक्टर सरांचा मला फोन आला व त्यांनी आश्वस्त केले की, पूर्ण रेस्क्यू आॅपरेशन सुरू झालेले आहे व आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम्स पाठविण्यात आलेल्या आहेत. पलीकडच्या गावांमध्ये त्या पोहोचल्या आहेत. एक हॅलिकॉप्टरही पाठविलेले आहे आणि पूर्ण स्थितीवर आमचे नियंत्रण आहे.

आपण स्वत: तसेच मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. हे ऐकल्यावर फार बरे वाटले व स्फूर्ती आली. मी तत्काळ ही माहिती आमच्या ग्रुपला दिली. आम्ही सर्वांनी मिळून ती इतर प्रवाशांना दिली. आता सहप्रवासी बऱ्यापैकी शांत बसले होते. पाणी हळूहळू खाली उतरत होते.

तोपर्यंत काही स्थानिक तरुण पोहोचले होते. ते दोर बांधून हायवे ओलांडून पलीकडील डोंगराच्या दिशेने लोकांना नेण्याचा प्रयत्न करीत होते; पण पाणी खूपच असल्याने व काही ठिकाणी अगदी बुडून पुढे जावे लागत असल्याने फक्त धाडसी तरुणच हा मार्ग अवलंबत होते.

किंबहुना काहीच नसण्यापेक्षा हा पर्याय त्यांनी निवडला असावा; पण आम्ही सर्वांना निक्षून सांगत होतो की, रेस्क्यू टीम बोट घेऊन येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात लोक शांत बसून होते. ठाणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम प्रथम पोहोचली. तेही दोर लावून सुरक्षित पर्यायी मार्ग शोधून लोकांना सुरक्षित स्थळी नेऊन लागेल ती मदत करू लागले.

पाच-दहा मिनिटांत एक हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालू लागले. ते सगळ्या परिसराचा सर्व्हे करण्यासाठी आले असावे. नंतर एक नेव्हीचे हेलिकॉप्टर त्यांची पूर्ण टीम घेऊन आले आणि सगळीकडे पोशाखातले एनडीआरएफ, नेव्ही, आरपीएफचे जवान तसेच ठाणे कॉर्पोरेशन इमर्जन्सी रेस्क्यू फोर्स व स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे तरुण दिसू लागले. त्यांनी पूर्ण गाडी व परिसराचा ताबा घेतला होता.

आता बऱ्यापैकी पाणी उतरले होते व रेस्क्यू आॅपरेशन झपाट्याने सुरू होते. पाऊसही अधूनमधून येत होता. जणू सगळ्यांना सुखरूप राहिल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठीच!

प्रथम गरोदर स्त्रिया, लहान मुले, आजारी लोक व ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था सुरू झाली. दोन बोटींपासून बघता-बघता १०-१२ बोटी झाल्या व पटापट लोक पैलतीरी जाऊ लागले.

सुरुवातीला सांगण्यात आले होते की, सामान सोडून जायचे आहे; पण नंतर एनडीआरएफ व इतर जवानांनी सर्व सामानानिशी जाण्यास सांगितले. पण लोकांनी किंचितही गडबड, गोंधळ वा धावपळ केली नाही. सगळे कसे अगदी शिस्तबद्धरीत्या सुरू होते.

मी हे सर्व दृश्य पाहत होतो. न भूतो न भविष्यती असा तो जिवावर बेतलेला प्रसंग होता. कुणावरही असे संकट न येवो; पण आलेच तर ते संकट कसे परतवायचे व त्यातून सहीसलामत कसे सुटायचे याचे हे एक उत्तम उदाहरण होते. एक वेळ अशी होती की, काहीही होऊ शकले असते.

निर्णायक परिस्थिती निर्माण झाली होती; पण भावाने दिलेला उत्तम मानसिक आधार, वरिष्ठांनी दिलेला धीर, त्यामुळे अंगी संचारलेले बळ, दुसऱ्यांना मदत करण्याची तीव्र इच्छा याच्या बळावर दहा ते बारा तास काहीही न खाता, पिण्याच्या पाण्याच्या थेंबाविना अंगी आलेले सहस्र हत्तींचे बळ व धाडस ही खरोखरच दैवी शक्तीच असावी.

बहुतेक सर्व प्रवासी ट्रेनमधून बाहेर पडले होते. काही अतिउत्साही रेंगाळत होते; कारण मीडियाचे लोक कॅमेरे घेऊन पोहोचले होते. जवान सगळ्यांना ओरडून निघण्याच्या सूचना देत होते. साधारणपणे दुपारचे अडीच वाजले होते. मीही एका बोटीतून निघालो. नेव्हीची मोटरबोट होती.

दोन एकदम तरुण जवान डायव्हिंगच्या वेशात होते. त्यांना धन्यवाद देऊन मी पलीकडे डोंगराच्या दिशेने उतरलो. तिथे मला ‘आरपीएफ’च्या आॅफिसर्सनी जेवण व पाणी दिले; पण खाण्यात मन नव्हते. मी शांतपणे पाण्यातील ट्रेन पाहत उभा होतो. आयुष्यातील सगळ्यांत कठीण, रोमांचकारी, थरारक प्रसंग अनुभवून, संकटावर मात करून, पुढे कुठल्याही प्रसंगाला समर्थपणे टक्कर देण्यास पाय रोवून उभा होतो.

शेवटी एक बोट तीन-चार स्थानिक लोकांना घेऊन आली. बोटीतील जवानांनी काठावर उभ्या असलेल्या त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितले की, आता प्रवासी कोणीही मागे नाहीत; पण पुन्हा एकदा संपूर्ण ट्रेन तपासून येण्यासाठी त्यांनी मोटरची दोरी खेचली व ट्रेनच्या रोखाने दिसेनासे झाले.

मी मात्र वळून-वळून ट्रेनच्या दिशेने बघत डोंगर चढत होतो. पाऊस मध्येच फिरकी घेत होता. डोंगरातून खळखळत वाहणारे पाणी बघत, एक वेगळा आनंद अनुभवत डोंगर चढत होतो. पायांत लेदर शूज होते. त्यामुळे चिखलात पाय रुतत होते.

लोकांच्या तुटक्या चपला वाटेत दिसत होत्या. म्हणजे पुढे काहींनी अनवाणी वाट तुडवली होती. डोंगरमाथ्यावर आल्यावर पुन्हा एकदा ट्रेनचे व अवतीभोवतीचे रौद्ररूप दिसले. ते मी कॅमेऱ्यात कैद केले व झपाझप चामतोली गावाच्या दिशेने पावले टाकू लागलो, तो जणू पुनर्जन्म घेऊनच!...

काळ आला होता... पण आम्ही सर्वांनी त्याला आत्मशक्तीच्या जोरावर पळवून लावले. कारण ट्रेनमधील जवळपास हजार, दीड हजार लोकांमध्ये एक दैवी शक्ती आलेली होती. निसर्गाच्या नियतीच्या विरुद्ध झगडण्याची शक्ती निर्माण झालेली होती; आणि म्हणूनच हार्टचे आॅपरेशन झालेले, हात-पाय, मणक्यांचे आॅपरेशन झालेले लोक चालत गेले.

ह्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये स्थानिक लोकांची जिवापाड मेहनत, आपत्ती व्यवस्थापनातील जवानांची चपलता व साथ होती,  प्रवाशांची सहनशीलता होती आणि प्रशासनाची पराकाष्ठा होती.

जगदंब !!!!

- दीपक पाटील, कोल्हापूर
ए-१ कोच, महालक्ष्मी एक्स्प्रेस.
मो. : ९२२५९०५४०३

Web Title: The catastrophic thrilling journey of the Mahalakshmi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.